लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. लग्नानंतर दोन व्यक्ती नव्या आयुष्याची सुरुवात करतात. सध्या अनेकांना अरेंज मॅरेजपेक्षा लव्ह मॅरेज करायला आवडते. लव्ह मॅरेज करण्याचे अनेक फायदे आहेत. लव्ह मॅरेजमध्ये जोडीदाराला समजून घेणे खूप सोपे जाते; पण तरीसुद्धा काही कारणांमुळे लव्ह मॅरेज अयशस्वी होऊ शकतात. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरच्या मोठ्या व्यक्तींचे सहकार्य न मिळणे

अनेकदा लव्ह मॅरेज करताना घरच्या लोकांचे सहकार्य लाभत नाही. हे लोक लव्ह मॅरेजच्या विरोधात असतात. अशा वेळी लग्नानंतर ते जोडपे स्वत:ला एकटे समजू लागते. नात्यात आलेली कोणतीही अडचण असे जोडपे त्यांच्याबरोबर शेअर करू शकत नाही. त्यामुळे अनेकदा त्यांना समजून सांगणारे कोणी नसल्यामुळे ते दाम्पत्य विभक्त होण्याचा विचार करू लागते.

हेही वाचा : आपण चक्क महिनाभर साठवू शकतो पनीर; जाणून घ्या ‘या’ सोप्या ट्रिक्स …

खरेपणा समोर येतो

लव्ह मॅरेजनंतर आयुष्य पूर्णपणे बदलते. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड लग्नानंतर नवरा-बायको होतात. लग्नानंतर एकमेकांबरोबरचा सहवास वाढतो, जोडीदाराविषयी चांगल्या-वाईट गोष्टी कळू लागतात, खरेपणा समोर येतो. अशा वेळी मतभेदांचे प्रमाण वाढून वारंवार खटके उडण्याची शक्यता जास्त असते. मग नात्यात समजूतदारपणा कमी असेल, तर नात्यात तेढ निर्माण होऊ शकते.

घाईत लग्नाचा निर्णय घेणे

लग्न ही आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची बाब आहे. लव्ह मॅरेज करताना कधीही घाईत निर्णय घेऊ नका. जोडीदाराला व्यवस्थित समजून घ्या. अनेकदा कित्येक जण आकर्षणाला प्रेम समजतात आणि लग्नानंतर पश्चात्ताप करतात. लव्ह मॅरेज करण्यापूर्वी जोडीदार आपल्यासाठी योग्य आहे का, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : तुमची जोडी राम-सीतेसारखी आहे का? या गोष्टींवरून लगेच ओळखा…

अति अपेक्षा ठेवू नका

जोडीदाराकडून भरपूर अपेक्षा ठेवणे, हे लव्ह मॅरेज अयशस्वी होण्यामागील सर्वांत मोठे कारण असू शकते. लव्ह मॅरेजनंतर आयुष्य पूर्णपणे बदलते. जबाबदाऱ्या वाढतात आणि त्यामुळे जोडीदार तुम्हाला पूर्वीप्रमाणे वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे दोघांनीही परस्परांकडून अति प्रमाणात अपेक्षा ठेवणे खूप चुकीचे आहे.

एकमेकांविषयी आदर नसणे

कोणत्याही नात्यात एकमेकांविषयी आदर असणे खूप गरजेचे आहे. लव्ह मॅरेजमध्ये दोघेही एकमेकांना चांगले ओळखतात. त्यामुळे ते एकमेकांबरोबर मनमोकळेपणाने वागतात. अशा वेळी एकमेकांचा अनादर होणार नाही याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love marriage failure reasons relationship tips husband wife boyfriend girlfriend relation ndj
First published on: 05-09-2023 at 12:06 IST