How To Reduce High Uric Acid: वय जसजसं वाढतं, तसतसं शरीर अनेक आजारांच्या सापळ्यात अडकू लागतं. विशेषतः सांधेदुखी, चालताना त्रास, बोटे आखडणे ही आता वयोवृद्धीची सामान्य लक्षणं ठरू लागली आहेत. पण, ही लक्षणं केवळ वय वाढल्यामुळेच जाणवतात, असं नसून, शरीरात युरिक अॅसिड वाढल्याचेही ते संकेत असू शकतात. युरिक अॅसिड म्हणजे शरीरात प्युरीन नावाच्या घटकाचं विघटन झाल्यावर तयार होणारा पदार्थ, जो सामान्यतः लघवीद्वारे बाहेर टाकला जातो. पण जेव्हा हे नीट बाहेर पडू शकत नाही, तेव्हा ते रक्त आणि सांध्यांमध्ये साचून सांधेदुखी, सूज, गाठ आणि अगदी संधिवात यांसारख्या विकारांना कारणीभूत ठरतं.
आजकाल अनेक लोकांना युरिक अॅसिडची समस्या सतावत आहे. बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोक युरिक अॅसिडच्या समस्येने त्रस्त होत आहेत. कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेप्रमाणेच शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढणे हेही आरोग्यासाठी धोकादायक आहे. शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. युरिक अॅसिड वाढल्यामुळे बहुतेक लोकांना सांधेदुखीचा त्रास होतो. शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर शरीरावर अनेक गंभीर परिणाम दिसून येतात. शरीरातील युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही तुमचा आहार आणि जीवनशैली बदलली पाहिजे. त्याशिवाय काही घरगुती उपायांनीही युरिक ॲसिडवर नियंत्रण ठेवता येते.
तीर्थंकर महावीर विद्यापीठ, मुरादाबाद येथील रेसिडेंट डॉक्टर डॉ. मनीष जैन यांनी यावर एक प्रभावी उपाय सांगितला आहे. तोही स्वस्त, घरगुती व नैसर्गिक डॉ. जैन यांच्या मते, फक्त पाच रुपयांमध्ये सहज मिळणारी ओट्स (दलिया) व आले (अद्रक) या दोन गोष्टी मिळून युरिक अॅसिडवर जबरदस्त परिणाम करू शकतात. ओट्समध्ये नैसर्गिक अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे सांध्यांमधील सूज आणि वेदना कमी करतात. तर आले म्हणजे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्याचं नैसर्गिक औषध आहे.
दोन्ही घटक मिळून शरीर शुद्ध करतात, पचन सुधारतात व युरिक अॅसिडचं प्रमाण नैसर्गिकरीत्या कमी करतात. ओट्स आणि आलं यांच्या एकत्र सेवनामुळे संधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी यांवरही चांगला परिणाम होतो. विशेष म्हणजे यांमुळे मूत्रपिंडे आणि यकृताच्या कार्यक्षमतेतही सुधारणा होते, जे युरिक अॅसिड बाहेर टाकण्यासाठी अत्यावश्यक आहे.
डॉ. जैन सांगतात की, विषारी घटक बाहेर टाकणं आणि शरीर शुद्ध ठेवणं हे युरिक अॅसिड नियंत्रणाचं मुख्य सूत्र आहे. म्हणूनच हे स्वस्त; पण प्रभावी उपाय घरातच सुरू करून, आरोग्य सुधारू शकतं. जर तुम्हालाही सांधेदुखी, सूज किंवा युरिक अॅसिडचा त्रास जाणवत असल्यास हा सोपा उपाय नक्की करून पाहा.