मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये असलेले  अँमिनो अ‍ॅसिड मेंदूच्या सामान्य विकासासाठी उपयुक्त असल्याचे शास्त्रज्ञांनी सिध्द केले आहे.
नैसर्गिकरीत्या शरीरामध्येच निर्मिती होत असल्यामुळे अद्याप पर्यंत अ‍ॅस्पाराजिनला जास्त महत्त्व दिले जात नव्हते. मॉन्ट्रियल विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न असलेले सीएचयू सॅँटे-जस्टीन रुग्णालयातील संशोधकांनी शरीरात निर्माण होणाऱ्या ‘अ‍ॅस्पाराजिन’ संयुगाचा मेंदूतील पेशींच्या कार्याशी संबंध असल्याचे सिध्द केले आहे.
“अ‍ॅस्पाराजिनशिवाय शरीरातील पेशी सक्षमपणे कार्य करत नाहीत. या वेळी आहारातून मिळणा-या या घटकामुळे या पेशींना कार्य करण्यास सहकार्य मिळते. मात्र आहारातून मिळणारे अ‍ॅस्पाराजिन हे रक्ताच्या साहाय्याने थेट मेंदूपर्यंत पोहोचत नाही,” असे या संशोधनातील एक वरिष्ठ अभ्यासक डॉ. जॅक्वेस मिचॉड यांनी सांगितले.
‘अ‍ॅस्पाराजिन’ संयुगाचे सूत्र उलगडताना संशोधकांनी त्याचा जनुकांवर होणा-या परिणामांचा अभ्यास केला. त्यामध्ये अँमिनो अ‍ॅसिडचे महत्त्व उलगडले. या संशोधकांनी सुदृढ बालकाच्या मेंदूचा अभ्यास केला. यात चेतापेशींच्या माध्यमातून अ‍ॅस्पाराजिनचा पुरवठा सुरळीत होत असल्याचे दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे.