कोणत्याही व्यक्तीसाठी तीक्ष्ण स्मरणशक्ती अत्यंत महत्त्वाची असते. कमकुवत स्मरणशक्तीमुळे दैनंदिन कामांमध्ये मोठ्या अडचणी येऊ शकतात. तीक्ष्ण स्मरणशक्ती दैनंदिन कामं सोपी करते. प्रत्येक व्यक्तीची लक्षात ठेवण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. पुरूषांची किंवा स्त्रियांची स्मरणशक्ती जास्त तीक्ष्ण असते की नाही यावर लोक अनेकदा वाद घालतात. तर मग जाणून घेऊया कोणाची स्मरणशक्ती जास्त चांगली असते, पुरूषांची की महिलांची…

कोणाची स्मरणशक्ती चांगली?

या विषयावरून अनेकदा वाद झाले असतील किंवा होत असतील. बहुतेकदा महिलांची स्मरणशक्ती जास्त चांगली असते असे मानले जाते. कारण त्यांना वाढदिवसाच्या तारखा, लग्नाचे वाढदिवस किंवा इतर महत्त्वाच्या तारखा लक्षात राहतात, तर पुरूष या तारखा विसरतात. असं असताना अलिकडच्या संशोधनाने हे खोटं ठरवलं आहे. जाणून घेऊया संशोधनात नेमकं काय आढळलं आहे.

महिलांमध्ये विसरण्याची प्रवृत्ती जास्त?

लखनऊच्या केजीएमयू आणि पीजीआयमधील तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, महिलांमध्ये पुरूषांपेक्षा विसरण्याची प्रवृत्ती तिपटीने जास्त आहे. संशोधनातून असे दिसून आले की, प्रत्येक १०० पुरूषांपैकी १३ पुरूषांना विसरण्याची समस्या होती, मात्र महिलांच्या बाबतीत ही संख्या १०० पैकी ३९ होती. संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांनी महिलांमध्ये विसरण्याच्या सवयीमागे काही कारणेदेखील नमूद केली आहेत.

पहिलं कारण म्हणजे प्रचंड ताणतणाव, दुसरं म्हणजे आहाराकडे दुर्लक्ष आणि तिसरे प्रमुख कारण म्हणजे एकटेपणा. ज्या महिला अविवाहित आहेत किंवा ज्यांचे जोडीदार या जगात नाहीत त्यांना विसरण्याच्या समस्यांना जास्त प्रमाणात तोंड द्यावे लागते.

ताणतणावाचा स्मरणशक्तीवर परिणाम

शारीरिक किंवा मानसिक ताणतणावाचा थेट स्मरणशक्तीवर परिणाम होतो. लोक अनेकदा त्यांचं पाकीट विसरतात, काहीजण गाडी कुठे पार्क केली आहे हे विसरतात. अशाप्रकारच्या गोष्टीच जास्त प्रमाणात विसरल्या जातात. तुमची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी तुमच्या आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिडचा समावेश करा. बदाम आणि अक्रोड खाणे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले आहे.