गोंदणे अर्थात शरीरावर कधीही न मिटवता येणारे नक्षीकाम किंवा अक्षरलेखन करणे, ही कला भारतात तशी जुनी आहे. पूर्वीच्या काळी लहान वयातच मुलींच्या कपाळावर टिकली लावण्याच्या ठिकाणी गोंदवले जात होते किंवा नवविवाहितेच्या हातावर पतीचे नाव गोंदवण्याची पद्धत होती. कालांतराने ही पद्धत काहीशी मागे पडली. पण हे होत असताना ‘टॅटू’ ही नवी कला प्रचलित होऊ लागली. ‘टॅटूज’ हा आताच्या तरुण मुला-मुलींमध्ये आकर्षणाचा विषय बनला आहे. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची भावना आणि आपण कुठे तरी इतरांपेक्षा वेगळं दिसावं हा कदाचित त्यामागचा हेतू असावा. अंगावर टॅटू गोंदवणे हे आत्मप्रकटनाचे किंवा स्वत:ला व्यक्त करण्याचे साधन समजले जाते. शरीर रंगवण्याची कला अनेकांना भुरळ घालते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राहणी विचारात घेऊन टॅटू निवडावा. आधुनिक लुक करत असलेल्यांसाठी कोणताही रफ अँड टफ लुक देणारा टॅटू शोभून दिसेल. पण राहणी पारंपरिक बाजाकडे झुकणारी असेल तर साधे टॅटू काढले जातात. महिलांसाठी एंजल टॅटू, क्रॉस, पोटर्र्ेट, स्टार टॅटू, फ्लॉवर टॅटू, जिवलगाचं नाव आदी ट्रेंड लोकप्रिय आहेत. टॅटू दोन प्रकारे रेखता येतात. काही दिवस हौस भागवून घ्यायची असेल तर तात्पुरते टॅटू काढून घ्या आणि दीर्घकाळ हवा असल्यास मशिनच्या साहाय्याने टॅटू रेखून घेण्यात येतात. मात्र यासाठी अंगात सहनशक्ती हवी. कारण मशीनच्या साहाय्याने टॅटू काढून घेताना बऱ्याच वेदना होतात. पण एकदा हा टॅटू रेखला की स्टाइल हीच ओळख बनते, असे मत टॅटूप्रेमींनी नोंदवतात.
तरुणाई टॅटूच्या सध्या प्रेमात आहे. आणि अंगावर टॅटू मिरवण्यासाठी हजारो रुपये मोजायलाही तयार आहे. हाय प्रोफाइल तरुणांमध्ये टॅटूचे भलतेच वेड असले तरी मध्यमवर्गीय महाविद्यालयीन तरुणांमध्येही टॅटूचे फॅड दिसू लागले आहे. कायमस्वरूपी टॅटू काढण्यासाठी प्रत्येक इंचाला १५०० रुपये खर्च येतो. विविध प्रकारचे कायमस्वरूपी टॅटू अंगावर गोंदवून घेताना प्रचंड वेदना तर होतेच, परंतु कित्येक तासही खर्ची होतात. पैसाही खूप लागतो. एवढय़ा मेहनतीनंतर आकारास येणारा टॅटू आयुष्यभर अंगावर राहतो. टॅटू त्वचेच्या सात थरांपैकी तीन थरांना मशीनने भेगा करून काढले जातात. कुठलेही डिझाइन आणि आपल्याला हवा तो फोटो टॅटू म्हणून अंगावर काढता येऊ शकतो. तोही आपल्याला हव्या त्या रंगात. शरीराच्या कुठेही टॅटू काढता येतो. त्यातही हात, दंड, मान, मणका आणि पोट या अवयवांवर टॅटू जास्त प्रमाणात काढले जातात. कायमस्वरूपी टॅटूबरोबर तात्पुरते टॅटूही बाजारात मिळतात. हे ८-१० दिवस अंगावर राहतात. प्रत्येक-वेळी आपल्याला हवा तो टॅटू तात्पुरत्या स्वरूपात काढून घेता येत असल्याने अशा टॅटूंना तरुण अधिक पसंती देतात. टॅटू काढण्यासाठी जितका खर्च येतो त्यापेक्षा जास्त तो पुसून टाकायचा असेल तर खर्च करावा लागतो. म्हणूनच कायमस्वरूपी टॅटू काढण्यापेक्षा तात्पुरते टॅटूज काढण्याकडे महाविद्यालयीन तरुणांचा ओढा अधिक आहे. तात्पुरते टॅटू काढण्यात राशीचे चिन्ह, ड्रॅगन, गुलाब, स्वत:च नाव असे टॅटू काढून घेतले जातात. टॅटूसाठी विशेष रंग वापरले जातात. लहान मोठय़ांपासून सर्वाना आकर्षित करणाऱ्या टॅटूबरोबर आरोग्याची सुरक्षितता आणि त्यामागील धोक्याचे आकलन हे महत्त्वाचे आहे.
पेंटिंग टॅटूमध्ये एअरब्रशच्या साहाय्याने रंग भरून रेखला जातो. यासाठी सुरुवातीला नक्षीचे स्टिकर त्वचेवर चिकटवतात. एकदा हे स्टिकर चिकटवले की एअरब्रशच्या साहाय्याने रंग भरले जातात. स्टिकर टॅटू हा प्रकार मुलांमध्ये जास्त प्रिय आहे. पण एखादे चांगले डिझाइन असेल तर महिलासुद्धा स्टिकर टॅटू चिटकवू शकतात. शरीराच्या ज्या भागावर टॅटू हवा असेल तिथे थोडा वेळ हे स्टिकर चिकटवून ठेवावं. त्यावर थोडं पाणी शिंपडावं. झाला स्टिकर टॅटू तयार. मेहंदी टॅटू ही तर खास महिलांची फॅशन. सध्या मानेवर, मनगटावर, दंडावर अगदी पोटावरही मेहंदी टॅटू बनवून घेता येतो. धार्मिक टॅटू हा प्रकारही सध्या ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये आवडत्या देवतेचं चित्र, मंत्र अथवा सुचिन्ह टॅटूस्वरूपात रेखले जातात.
मुलींना खास करून सॉफ्ट म्हणजे फुलपाखरू, एखादे फूल अशा प्रकारचा टॅटू काढून घ्यायला आवडतं तर मुलांची आवड थोडी वेगळी असते. म्हणजे ड्रॅगनसारखे टॅटू आवडतात. काही जणांना आध्यात्मिक टॅटू म्हणजे ओम किंवा एखाद्या देवाची प्रतिकृती काढून घ्यायला आवडते. बहुतेक वेळेला तरुण-तरुणी कायमस्वरूपी टॅटू काढून घ्यायला येतात, तर बरेच जण फक्त हौस म्हणून किंवा उत्सुकता म्हणून टॅटू काढायला येतात. शिवाय यात आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे कापडावर टॅटूसारखे डिझाईन काढलेले असते, ते आपण आपल्याला हवे तेव्हा वापरू शकतो. या टॅटूची फॅशन सध्या जास्त लोकप्रिय आहे. कारण ज्याला कायम स्वरूपी टॅटू काढून घ्यायचा नसेल त्यांना हा पर्याय उपयोगाचा आहे. हे टॅटू काढण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे हीसुद्धा एकदा वापरून फेकून द्यायची असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्याची शक्यता नसते. आजकाल सगळे जण याबाबतीत जागरूक झाल्यामुळे ही काळजी घ्यावीच लागते. ही फॅशन आता चित्रपटातील अभिनेता, अभिनेत्री आणि रॅम्प वॉक करणाऱ्या मॉडेल्सपासून सगळ्यांना टॅटू कलेने आपलेसे केले आहे. टॅटू बरोबरीने सध्या बॉडी पेंटिंगलाही खूप मागणी आहे. खास डिझाइनरकडून काढून घेतले जातात. फक्त फॅशन स्टेटमेंटच नव्हे तर सामाजिक संदेश देण्यासाठीही टॅटूचा वापर केला जातो. लहान मुलांमध्येही चॉकलेट्स मधून मिळणाऱ्या तात्पुरत्या टॅटू स्टिकर्समुळे टॅटू प्रसिद्ध झाला आहे.
टॅटूची प्रतीके
’ फुलपाखरू :- आनंद, तारूण्य व्यक्त करण्याचे चिन्ह म्हणून वापरतात.
’ गुलाब :-प्रेम आणि सौंदर्य
’ ड्रॅगन :- भीतीवर मात केल्याचे,संकटातून पुढे जाणे.
’ पक्षी :- प्रेम, शांतता, आशा
’ सिंह:-शौर्य, विजय, शक्ती
’ सर्प :- शक्ती.
’ कुठे- ठाण्यातील प्रतिष्ठीत मॉलस्मध्ये टॅटू स्टुडीयो उपलब्ध आहेत.
’ किंमत-टॅटूच्या लांबी रुंदी व प्रकारावर अवलंबुन असते. साधारण १००० रुपये १ इंच एवढी किंमत सध्या बाजारात सुरु आहे.