Jugaad To Dry Clothes: पावसाळा म्हणजे केवळ थंडावा, पाऊस आणि गरम गरम भजीचाच काळ नाही, तर या काळात ओल्या कपडे कसे लवकर सुकवायचे हा प्रश्नही सर्वांना सतावतो. त्यामुळे हा ‘डोकेदुखी सीझन’ही आहे. या दिवसांत धुतलेले कपडे वेळेत वाळत नाहीत, त्यातून येणारा दमट वास, घरात सतत अडकवलेले कपडे आणि त्यावरून होणारी चिडचिड हा अनुभव जवळपास सगळ्यांनाच येतो. कारण- पावसाळ्यातलं दमट हवामान कपड्यांना व्यवस्थित वाळू देत नाही. अशा वेळी अनेक जण घरच्या पंख्याच्या मदतीने कपडे वाळवतात; मात्र त्यामुळे कपड्यांचा दुर्गंध काही जात नाही. त्यामुळे अनेकांची चिडचिड वाढते. हे सर्व खूपच त्रासदायक वाटते. मित्रांनो, आपण ऋतू बदलवू शकत नाही; मात्र, यावर घरगुती जुगाड करून कपड्यांची दुर्गंधी आणि कपडे लवकर वाळवण्याची सोपी पद्धत आम्ही तुमच्यासाठी हुडकून काढलीय, ज्यामुळे ओले कपडे काही मिनिटांत वाळवता येतील. पाहा मग ‘ही’ साधी सोपी ट्रिक…
पावसात कपड्यांना दुर्गंधी का येते?
पावसाळा या ऋतूत तुम्ही कितीही वेळा कपडे धुतले तरी त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही आणि कपड्यांत ओलावा राहतो. त्यामुळे कपड्यांमध्ये जीवाणू आणि बुरशी वाढू लागते आणि कपड्यांना दुर्गंधी येते. काळजी करू नका, खालील ट्रिक तुमची समस्या दूर करील.
पंखा नव्हे, तर लसणाने वाळवा कपडे
साधारणपणे, पावसात कपडे वाळवायचे म्हटले की, आपण पंख्याची मदत घेतोच. घरात स्टँड लावून त्यावर कपडे टाकून, ते पंख्याच्या हवेवर वाळवतो. पण, पंख्याशिवायही तुम्ही कपडे वाळवू शकता आणि तेसुद्धा लसणाच्या मदतीने. आता लसणाद्वारे कपडे कसे काय वाळणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता सोशल मीडियावर ‘लसूण’ वापरून कपडे वाळवण्याचा भन्नाट जुगाड व्हायरल होतोय आणि लोक म्हणतायत – “हे काय खरंच असं होतं?” चला तर मग पाहूयात सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ…
व्हिडीओच्या माहितीनुसार…
या व्हिडीओमध्ये एका महिलेने पावसाळ्यात लवकर कपडे सुकवण्यावर घरगुती उपाय सांगितला आहे. तिने सांगितल्यानुसार, हे कपडे पूर्णपणे सुकलेले नाहीत, थोडे ओले, दमट आहेत. आता तुम्हाला करायचं काय आहे तर सर्वप्रथम, लसणाच्या साली घेऊन, त्या तव्यावर गरम करून घ्यायच्या आहेत. आता एक कपडा घ्या, तो जमिनीवर पसरून घ्या आणि त्यावर लसणाच्या साली पसरवा. त्यावर दुसरा कपडा ठेवा. त्यावर साली पसरवा. असे करत करत सर्व कपडे एकावर एक ठेवून, त्यावर लसणाच्या साली पसरवा. लसणाच्या गरम साली कपड्यांतील ओलावा, दमटपणा खेचून घेतात. त्यामुळे पावसाळ्यात ओले, दमट राहिलेले कपडेही नीट सुकतात, असा दावा या गृहिणीने केला आहे.
लसूण जीवाणू संसर्गावर गुणकारी
पावसाळ्यामध्ये वातावरणात ओलावा असल्यामुळे कपड्यांमध्ये जीवाणू आणि बुरशी, असे त्रास वाढू लागतात. त्यामुळे जीवाणूंचे संक्रमण रोखण्यासाठीही लसणाची मदत होते. त्यामध्ये असलेले अँटीव्हायरल, अँटी-फंगल व अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत, जे जीवाणू आणि विषाणू अशा दोन्ही संसर्गापासून संरक्षण करतात.
येथे पाहा व्हिडीओ
Ankitanoop यूट्यूब चॅनेलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओनुसार तुम्ही हा उपाय करून बघा. तुम्हालादेखील याचा नक्की फायदा होऊ शकतो.
(सूचना- ही माहिती सोशल मीडियावरील व्हिडीओवर आधारित आहे. ‘लोकसत्ता’ या व्हिडीओची पुष्टी करीत नाही.)