लॉकडाउन आणि अर्थचक्रामुळे देश जवळपास ठप्प आहे. पण अशा समयी देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आजवरचा सर्वात मोठा थेट विदेशी गुंतवणुकीचा व्यवहार बुधवारी घडून आला. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्म्समधील ९.९९ टक्के हिस्सा फेसबुकने ५.७० अब्ज डॉलर मोजून खरेदी केला आहे. प्रति डॉलर ७० रुपये या दराने झालेल्या (४३,५७४ कोटी रुपये) या व्यवहारामुळे आघाडीच्या दोन समाजमाध्यमांना एकमेकांच्या मजकूर तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करता येणार आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिलायन्स इडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी बुधवारी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते म्हणाले की, ‘दीर्घकालिक जोडीदाराच्या रूपात मी फेसबुकचं स्वागत करतोय. फेसबुक-रिलायन्स यांची भागीदारी देशात डिजिटल व्यवहारात क्रांती निर्माण करेल. फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग आणि मी भारताच्या डिजिटल क्षेत्रात अमुलाग्र बदलाव घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. दोन्ही कंपन्या मिळून भारताची डिजिटल अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करू.’

रिलायन्स-फेसबुकच्या कराराबद्दल माहिती देताना मुकेश अंबानी म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम भारतामधील प्रत्येक घराघरांत पोहचलं आहे. जियोची जागतिक कनेक्टिव्हिटी आणि फेसबुकचं भारतीय ग्राहकांमधील जवळचे संबंध भारतातील युजर्सला समाधान करण्यास नवी दिशा देईल.

ते म्हणाले की, जियोचं नवीन ई-कॉमर्स प्लेटफॉर्म जियो मार्ट (Jio Mart) आणि व्हॉट्सअॅप जवळपास तीन कोटी छोट्या किराना दुकानदारांना फाददा मिळवून देईल. दोन्ही मोठ्या कंपन्यांच्या करारांमुळे छोट्या किराणा दुकानदारांना ग्राहकांसोबतचे डिजिटल व्यवहार आणखी मजबूत करू. छोट्या दुकानदारांना आपला व्यवसाय वाढवण्यास मदत होईल आणि डिडिजल उद्योगांच्या साह्यानं रोजगारही उपलबद्ध होईल.

येणाऱ्या काही दिवसांमध्ये या करारांचा शेतकऱ्यांना विद्यार्थांना आणि छोट्या कामगारांना मोठा फायदा होणार आहे. जियो आणि फेसबुक मिळून पंतप्रधान मोदी यांची दोन लक्षं ‘ईज ऑफ लिविंग’ आणि ‘ईज ऑफ डूइंग बिजनेस’ पूर्ण करण्यास मदत होईल.  जिओचे भारतात ३.८८ कोटी मोबाइलधारक आहेत, तर फेसबुकचे ३.२८ कोटी मासिक सक्रिय वापरकत्रे, तर त्यांचेच अंग असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपचे भारतात चार कोटींच्या आसपास वापरकत्रे आहेत. या इतक्या प्रचंड मोठय़ा वापरकर्त्यांच्या ‘विविध प्रकारच्या सेवा-वस्तूंचे ग्राहक’ म्हणून रूपांतरणाचे माध्यम म्हणून जिओ प्लॅटफॉर्म हा डिजिटल मंच कार्य करेल.

दरम्यान, फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केल्यानंतर याचा जिओला मोठा फायदा झाला आहे. या गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मची व्हॅल्यू ४.६२ लाख कोटी रूपये झाली आहे. कंपनीच्या व्हॅल्यू प्रमाणे पाहिलं तर शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या कंपन्यांपैकी केवळ ४ कंपन्या या रिलायन्स जिओच्या पुढे आहेत. त्यापैकी एक रिलायन्स जिओची पॅरेंट कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज हीदेखील आहे. त्याव्यतिरिक्त टीसीएस, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्या जिओच्या पुढे आहेत. तर दुसरीकडे जिओनं इन्फोसिस आणि एचडीएफसी लिमिटेड यासारख्या दिग्गज कंपन्यांना मात्र मागे टाकलं आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambani on facebook reliance deal kirana shops to digitally transact with customers nck
First published on: 23-04-2020 at 09:03 IST