Navratri Fast: नवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण असून या नऊ दिवसांत देवीची उपासना केली जाते. या काळात अनेकजण उपवास धरतात. उपवासामुळे शरीर आणि मनाची शुद्धी तर होतेच, पण यामुळे शरीराला एक प्रकारे ‘डिटॉक्स’ करण्याची संधी मिळते. पण, उपवास सोडणे हा एक महत्त्वाचा क्षण असतो. शरीराने हलके वाटत असले तरी चुकीचा आहार घेतल्यास तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. मात्र, उपवास संपल्यावर अचानक जड किंवा तिखट आहार घेतल्यास पोट बिघडू शकते, गॅस, पित्त किंवा अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात; त्यामुळे उपवास सोडताना योग्य आहार पद्धतीचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
उपवास सोडताना काय खावे?
उपवासानंतर सुरुवातीला पोटावर भार न टाकणारे सौम्य पदार्थ खाणे योग्य ठरते. पाणी, कोमट पाणी, नारळाचे पाणी, फळांचा रस किंवा हलके सूप यांपासून सुरुवात करावी. हे पदार्थ शरीराला आवश्यक पाण्याची कमतरता भरून काढतात, तसेच पचनसंस्था सुरळीत चालू करण्यास मदत करतात. त्यानंतर सफरचंद, पपई, केळी, मोसंबी यांसारखी पचायला सोपी फळे खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते. यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे असतात, जी उपवासानंतर शरीराला विशेषतः उपयुक्त ठरतात.
हळूहळू हलका पण पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे. दलिया, खिचडी, ओट्स, दही-भात यांसारखे पदार्थ उत्तम पर्याय आहेत. हे पदार्थ पचायला हलके असून शरीराला ऊर्जा देतात आणि पोटावर ताणही येत नाही. उपवासानंतर ताक किंवा दही घेतल्यास पचन सुधारते आणि थकवा कमी होतो.
उपवास सोडल्यावर काय खाऊ नये?
उपवासानंतर लगेच तेलकट, तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. अशा पदार्थांमुळे आम्लपित्त वाढू शकते. फास्ट फूड, शीतपेये, पॅकेज्ड ज्यूस यांसारख्या गोष्टी टाळाव्यात. तसेच सुरुवातीच्या दिवशी कॉफी व चहा टाळणे आवश्यक आहे, कारण ते पचनसंस्थेवर विपरीत परिणाम करू शकतात. एकूणच नवरात्रीचा उपवास सोडल्यानंतर आहार हळूहळू सामान्य करावा. सुरुवात हलक्या, पौष्टिक पदार्थांनी करावी आणि नंतरच नेहमीच्या आहाराकडे वळावे, यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य चांगले राहते.