Why you should never heat Honey: मध हा आयुर्वेदाचा अविभाज्य भाग आहे. आजारांवर उपचार करण्यासाठी पेय, गोड पदार्थ तसंच घरगुती उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात मध वापरली जाते. आपण मध जरी रोज काही ना काही कारणाने वापरत असलो तरी ती आपण कधीही गरम करत नाही हे तुमच्या कधी लक्षात आलं आहे का? किंवा मध गरम केल्यावर ती हानीकारक ठरू शकते का? याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
आयुर्वेदिक आरोग्य प्रशिक्षक डिंपल जांगडा यांनी अलिकडेच इंस्टाग्रामवर एक रीलमधून मध घालून स्वयंपाक करण्याविरूद्ध इशारा दिला आहे. या रीलमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, “मध गरम केल्याने मेलार्ड रिअॅक्शनद्वारे तिची रासायनिक रचना बदलते. त्यामुळे ५-हायड्रॉक्सीमेथिलफरफ्युरल (HMF) नावाचे विष तयार होते.” चरक संहिता यासारख्या आयुर्वेदिक ग्रंथांनी गरम केलेल्या मधाबाबत पूर्वीपासूनच इशारा दिला आहे. पण मग याचा अर्थ असा होतो का तुम्ही सकाळी घेतलेले मध हानीकारक आहे? जांगडा यांच्या रीलचा संदर्भ घेत रामकृष्ण केअर हॉस्पिटलमधील डायटेटिक्सच्या एचओडी आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रियंका शुक्ला यांच्याशी दि इंडियन एक्सप्रेसने संवाद साधला.
मध गरम केल्याने ते हानिकारक ठरते का?
डॉ. शुक्ला यांनी जांगडा यांच्या सांगण्यामध्ये तथ्य असल्याचे म्हटले. “मध उच्च तापमानात गरम केल्याने HMF तयार होऊ शकते”, असे त्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात HMFचे विषारी परिणाम होऊ शकतात. मध गरम केल्याने मधातील फायदेशीर एंझायम, अँटीऑक्सिडंट्स आणि जैविक संयुगेदेखील नष्ट होतात. त्यांनी असे सांगितले की, उत्तम सुरक्षितता आणि पौष्टिक फायद्यासाठी, उकळत्या द्रवांमध्ये मध घालणे किंवा हाय फ्लेमवर शिजवणे टाळा. ४० डिग्रीपेक्षा कमी तापमानात, सौम्य तापमानात, स्फटिकीकृत मध द्रवीकरण करणे सुरक्षित आहे.
मध विषारी बनवणारे दुसरे कारण कोणते?
फक्त गरम होणे हीच चिंता नाही. कच्च्या मधात नैसर्गिकरित्या एंझायम, अँटीऑक्सिडंट्स आणि परागकण असतात आणि ते अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. असं असताना त्यात क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम स्पोर्सदेखील असू शकतात, जे एक वर्षाखालील बाळांसाठी धोकादायक असतात आणि परागकणांची अॅलर्जी असलेल्या लोकांना याचा त्रास होऊ शकतो. मध वातावरणातील जड धातू आणि कीटनाशकांचे अवशेषदेखील शोषून घेऊ शकते. त्यामुळे दूषित होण्याचा धोका वाढतो.
डॉ. शुक्ला पुढे सांगतात की, “प्रक्रिया केलेले मध पाश्चरायझेशन आणि फिल्टर केला जातो. त्यामुळे बहुतेक जंतू आणि बॅक्टेरिया काढून टाकून ते अधिक सुरक्षित होते. मात्र, या प्रक्रियेत काही फायदेशीर पोषक घटक नष्ट होतात. त्यामुळे कच्चा मध अधिक आरोग्य फायदे देऊ शकतो. मात्र, त्यात दूषित होण्याचा किंवा अॅलर्जीक प्रतिक्रियांचा धोका थोडा जास्त असतो.”
मधाचा सुरक्षित वापर कसा करावा?
- मध जास्त तापमानाला गरम करू नये
- चहा, कॉफी किंवा गरम पाण्यात घालताना पेय उकळल्यानंतर काही मिनिटे थंड झाल्यावर मध टाकावे.
- दही, स्मूदी किंवा सॅलड ड्रेसिंगमध्ये मधाचा नैसर्गिक गोडवा म्हणऊन वापर करा.
- सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर मार्ग म्हणजे ते कच्चे खाणे.
- दही, ओटमील, टोस्ट किंवा फळांवर ते मध टाकून खा. अशाप्रकारे त्यातील एंझायम आणि अँटीऑक्सिडंट्स टिकवून ठेवता येतात.
जास्त मध किंवा पदार्थांत मिसळून खाल्ल्याने धोका आहे का?
साखरेऐवजी तुम्ही अन्नात मध वापरत असाल तरी त्यात फारसा फरक नाही. मध जास्त प्रमाणात वापरत असाल तरी वजन वाढू शकते, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते आणि दातांच्या समस्या उद्भवू शकतात असे डॉ. शुक्ला स्पष्ट रतात. मधाचं सेवन मध्यम प्रमाणात करावं. मधुमेह असलेल्या लोकांनी मधाचे सेवन काळजीपूर्वक करावे. कारण त्यात फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असल्याने ते आयबीएस किंवा फ्रुक्टोज मालाब्सॉर्प्शन असलेल्या लोकांमध्ये पोटफुगी, गॅस आणि पेटके निर्माण करू शकते असा इशाराही डॉ. शुक्ला यांनी दिला.