Nighttime Health Symptoms: रात्रीची शांत झोप शरीरासाठी पुनर्जन्मासारखी असते. मेंदू, अवयव आणि पेशींना विश्रांती देणारी. पण, काही वेळा हीच रात्र आपल्या शरीरातील धोक्याची घंटा ठरते. झोपेत छातीत दडपण जाणवणं, श्वास घ्यायला त्रास होणं, घामाने भिजून उठणं, अंगात खाज सुटणं किंवा वारंवार लघवी लागणं ही लक्षणं साधी नाहीत. वैद्यकीय संशोधन सांगतंय की, ही चिन्हं तुमच्या हृदय, यकृत (लिव्हर) आणि मूत्रपिंडांच्या (किडनी) आरोग्याशी थेट संबंधित असू शकतात.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, “रात्री शरीरातील कार्यप्रणाली मंदावते, हार्मोन्सचा समतोल बदलतो आणि त्याच वेळी अवयवांवरील दडपण अधिक स्पष्ट दिसू लागतं, म्हणूनच रात्री उद्भवणारी ही लक्षणं शरीरात सुरू असलेल्या आजारांचा पहिला इशारा ठरू शकतात.”
हृदयाचे रात्रीचे संकेत :
जर तुम्हाला रात्री झोपेतून छातीत दुखणं, जडपणा किंवा घामाने उठणं जाणवत असेल, तर ते हृदयविकाराचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. डॉक्टर सांगतात, “काही वेळा रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे रात्री झोपेतच अँजायना (छातीत दुखणं) होतं.”
तसेच झोपेत अचानक श्वास अडकणं किंवा धापा टाकत उठणं हे हृदय कमजोर झाल्याचं चिन्ह असू शकतं. झोपेत वारंवार घोरणं, दम लागणं किंवा झोप पूर्ण झाल्यावरही थकवा जाणवणं हे हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणामाचं द्योतक आहे.
लिव्हरचे लपलेले संकेत :
रात्री अंगभर खाज सुटणं किंवा त्वचेत जळजळ होणं हे यकृताच्या आजाराचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. लिव्हरने नीट काम न केल्यास शरीरात पित्ताचे खडे साचतात आणि त्यामुळे रात्री तीव्र खाज येते. याशिवाय रात्री पायात गोळा येणं, स्नायूंमध्ये कडकपणा जाणवणं किंवा झोप न लागणं हे सगळं लिव्हरच्या कमकुवत कार्यक्षमतेचं द्योतक आहे.
किडनीचे रात्रीचे संकेत :
रात्री वारंवार लघवीला लागणं, पायांमध्ये सूज येणं किंवा झोपेत अस्वस्थता जाणवणं हे किडनीच्या आजाराचं पहिलं चिन्ह असू शकतं. डॉक्टर सांगतात, “मूत्रपिंड योग्य प्रकारे काम करत नसतील तर शरीरात पाणी आणि मीठ साठतं, ज्यामुळे रात्री सूज व जडपणा वाढतो.”
PMC मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, रेस्टलेस लेग्स सिंड्रोम (RLS) हे क्रॉनिक किडनी डिसीज मध्ये जास्त प्रमाणात दिसते, जे शरीरात विषारी पदार्थ साचल्यामुळे आणि झोपेत व्यत्यय आल्यामुळे होते.
रात्री उद्भवणारी लक्षणं हलकी समजू नका. हृदय, यकृत किंवा किडनीचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखले तर उपचार सोपे होतात आणि आयुष्य वाचू शकतं.
थोडक्यात सांगायचं तर झोपेत शरीर बोलतंय, फक्त ऐकायचं आहे. रात्रीची अस्वस्थता, खाज, श्वासोच्छवासातील बदल, घाम किंवा वारंवार लघवी ही सगळी लक्षणं तुमच्या शरीराचा इशारा आहेत. त्यांना दुर्लक्षित केलं तर किंमत मोठी मोजावी लागू शकते.