नोकिया-3310 हा फोन आठवतोय का?…नोकियाच्या या लोकप्रिय क्लासिक फोनला आता 20 वर्ष पूर्ण झालेत. 1 सप्टेंबर रोजी या फोनने 20 वर्ष पूर्ण केली. जवळपास एक पूर्ण पिढी नोकिया-3310 या फोनचा वापर करत मोठी झाली आहे. यानिमित्ताने नेटकरी आपल्या या फोनच्या आठवणी शेअर करत आहेत.

लोकांच्या मनात आजही या फोनच्या आठवणी कायम आहेत. याची झलक बुधवारी ट्विटरवर दिसली. एका युजरने या फोनबाबत माहिती देताना, ‘नोकिया-3310 लाँच झाल्यानंतर याची विक्री जबरदस्त होती…जगभरात 12.6 कोटी फोनची विक्री झाली होती, त्यानंतर सर्वात लोकप्रिय फोनमध्ये याची गणना व्हायची… आजही या फोनचं कौतुक होतं… आणि हा फोन किती दणकट होता याबाबत तर काय बोलावं…”, असं ट्विट केलं. त्याच्या ट्विटखाली अनेकांनी आपल्या या फोनबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. काही वेळातच 700 पेक्षा जास्त जणांनी या ट्विटला रिट्विट केलं, तर 1700 पेक्षा जास्त लाइक मिळाले. अनेक नेटकऱ्यांनी , ‘वर्ष 2000 मध्ये आजच्याच दिवशी नोकिया-3310 लाँच झाला होता. आमच्यामते हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम फोनपैकी एक आहे’, असं म्हटलं आहे.

नोकिया-3310 हा फोन 1 सप्टेंबर 2000 लाँच करण्यात आला होता. फोनची बॉडी गडद निळ्या रंगाची होती. यामध्ये एक छोटी स्क्रीन आणि खूप कमी ब्राइटनेस असायची. या फोनमधील ‘स्नेक’ गेमबाबत त्यावेळी लोकांमध्ये जबरदस्त क्रेझ असायची. अत्यंत दणकट असलेला हा फोन ग्राहकांमध्ये चांगलाच लोकप्रिय होता. यानंतर नोकियाने 2003 मध्ये एक नवीन फोन ‘नोकिया 1100’ आणला. यामध्ये एक छोटी टॉर्च होती, त्यामुळे हा फोनही चांगलाच लोकप्रिय ठरला होता. नोकियासाठी तो सुवर्ण काळ होता. कारण बाजारात नोकियाला स्पर्धा देण्यासाठी जवळपासही कोणती कंपनी नव्हती.