व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मेसेजिंग अॅप आहे. अगदी ऑफिसचं काम असो वा ऑनलाइन क्लास सर्वकाही व्हॉट्सअॅपवरून केलं जातं. व्हॉट्सअॅपमध्ये वेळोवेळी नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स येत असतात. आता Whatsapp लवकरच मेसेज एडिटींगचं फीचर आणणार आहे. यासाठी व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनवर एडिट बटणाबाबत चाचणी केली जात आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर एकदा पाठवलेला मजकूर फक्त डिलीट करता येत होता. पण तो ए़डिट करता येत नव्हता. पण आगामी फीचरमुळे मेसेज एडिट करणं शक्य होणार आहे.
व्हॉट्सअॅप ट्रॅकिंग वेबसाइट Wabetainfo ने याबाबतची माहिती दिली आहे. पाच वर्षांपूर्वी व्हॉट्सअॅपने या फीचरवर काम करायला सुरुवात केली होती. पण त्यानंतर मध्येच कंपनीकडून या फीचरवरील काम बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पाच वर्षांनंतर व्हॉट्सअॅपने पुन्हा एकदा एडिट फीचरवर काम करण्यास सुरुवात केली आहे. Wabetainfo ने याबाबतचे काही स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज सिलेक्ट केल्यानंतर कॉपी आणि फॉरवर्ड पर्यायांसोबतच वापरकर्त्यांना एडिट हा पर्याय देखील उपलब्ध होणार आहे. या एडिट पर्यायाच्या माध्यमातून पाठवलेला मजकूर, टायपिंग करताना झालेली चूक दुरुस्त करता येणार आहे. सध्याच्या व्हॉट्सअॅपमध्ये एकदा पाठवलेला मेसेज केवळ डिलीट करू शकतो पण तो एडिट करू शकत नाही.
व्हॉट्सअॅपकडून सध्या बीटा व्हर्जनवर या फीचरची चाचणी केली जात आहे, असं संबंधित अहवालात म्हटलं आहे. व्हाट्सअॅप iOS आणि डेस्कटॉपसाठी व्हॉट्सअॅप बीटामध्ये देखील अशीच वैशिष्ट्ये असणार आहेत. पण याचा अधिक तपशील नंतर उपलब्ध होईल.