भारतीय कॅब कंपनी Ola आणि ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart भारतात क्रेडिट कार्ड लाँच करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही कंपन्या मोठ्या बॅंकांसोबत भागीदारी करुन लवकरच क्रेडिट कार्ड लाँच करणार असल्याचं वृत्त आहे.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ओला कंपनी स्टेट बँक ऑफ इंडियासोबत भागीदारी करुन क्रेडिट कार्ड आणणार आहे. पुढील आठवड्यात हे क्रेडिट कार्ड लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. पहिल्या वर्षामध्ये 10 लाख क्रेडिट कार्ड जारी करण्याचा ओला कंपनीचा विचार आहे. तर, फ्लिपकार्ट कंपनी एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेशी हातमिळवणी करुन क्रेडिट कार्ड लाँच करणार असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. या तिमाहीच्या अखेरपर्यंत फ्लिपकार्टकडून क्रेडिट कार्ड लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप दोन्ही कंपन्यांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सामान्य क्रेडिट कार्डच्या तुलनेत ओला आणि फ्लिपकार्टच्या क्रेडिट कार्डमध्ये ग्राहकांना अधिक ऑफर्स दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सुरूवातीला या कंपन्या अनेक ऑफर्स देऊ शकतात, मोठ्या प्रमाणात रिवार्ड्स पॉइंट क्रेडिट कार्डसह दिले जाऊ शकतात. आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड जारी करुन याद्वारे ग्राहक कशाप्रकारे आपला खर्च करतो, कोणत्या प्रकारची खरेदी करतो किंवा कुठल्या गोष्टींमध्ये जास्त खर्च होतो अशाप्रकारच्या अनेक गोष्टी समजून घेण्याचा या कंपन्यांचा प्रयत्न असू शकतो. याद्वारे कंपन्यांना ‘टारगेट बेस्ड बिजनेस’ (लक्ष्य निश्चित ठेवून व्यापार) करण्यास मदत होईल. यापूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये ‘अॅमेझॉन पे’ ने आयसीआयसीआय बँकेशी भागीदारी करुन एक क्रेडिट कार्ड लाँच केलं होतं, याद्वारे अॅमेझॉनच्या ग्राहकांना विविध ऑफर्स मिळतात.