नवी दिल्ली : चहा आरोग्यासाठी चांगला की धोकादायक अशी चर्चा वारंवार होते. वेगवेगळय़ा अभ्यासातही वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार चांगल्या आरोग्याचा विचार केल्यास ‘ग्रीन टी’ला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
‘ग्रीन टी’च्या एका कपाची सवय अनेक प्रकारच्या आजाराचा धोक कमी करतो. यामध्ये कर्करोगाचाही समावेश आहे. या चहामध्ये आढळणारे ‘अँटिऑक्सिडंटस’ आणि ‘बायोअॅक्टीव्ह कंपाऊंडस’ हे शरीराव चांगला प्रभाव करतात.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार ‘ग्रीन टी’मुळे ह्रदय रोग, मधुमेह आणि अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
कर्करोगाला रोखण्याला मदत..
‘ग्रीन टी’मध्ये आढळणाऱ्या ‘अँटिऑक्सिडंटस’मुळे अनेक प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी होण्यास मदत होते. रोज एक कप हा चहा घेणाऱ्या महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका २० ते ३० टक्क्यांनी कमी होतो. या चहामध्ये पॉलीफेनोल अँटिऑक्सिडंटस मुबलक असते. त्याचा आरोग्यावर विविध प्रकारचा लाभदायी प्रभाव पडू शकतो. या चहाचा एक कप नियमित घेणाऱ्या पुरुषांना प्रोस्टेट कर्करोग होण्याचा धोक अन्य लोकांच्या तुलनेत कमी होतो. तर कोलोरेक्टर कर्करोग होण्याचा धोका ४२ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.
मधुमेहींसाठीही लाभदायी..
ग्रीन टीचा प्रभाव समजण्यासाठी केलेल्या अभ्यासात टाइप – २ प्रकारचा मधुमेह असलेल्या व्यक्तीसाठी हा चहा उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासही मदत करतो. जपानी नागरिकांच्या एका अभ्यासात ‘ग्रीन टी’ नियमित घेतल्याने टाइप – २ प्रकारच्या मधुमेहाचा धोका ४२ टक्क्यांनी कमी होतो.
पण, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ‘ग्रीन टी’चे नियंत्रित सेवन आरोग्यासाठी लाभदायी असले तरी अधिक सेवन हे नुकसान करू शकते.
