कुणाच्या तरी घरी ब्रह्मकमळ फुललंय हे समजलं की ते बघायला मध्यरात्री हीऽ गर्दी होते. पण खरं तर ते असतं एका निवडुंगाचं फूल. खरं ब्रह्मकमळ फुलतं ते उत्तरांचलच्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये..
गेली कित्येक र्वष भाग्यवंतांच्याच घरी मध्यरात्री फुलणारी ती पांढरी ब्रह्मकमळं अनेकांच्या असूयेचा आणि कौतुकाचा विषय राहिली आहेत. मला आठवतंय, एका परिचितांच्या घरी ती फुलं फुलण्यावेळी चक्क फुलोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या मध्यरात्री फुललेल्या ब्रह्मकमळांचे फोटो काढण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी तिथे अगदी झुंबड उडाली होती. तो प्रकार बघून खरंच अवाक् व्हायला झालं होतं, कारण मध्यरात्री फुललेली ती पांढरी फुलं ब्रह्मकमळाची नसतातच हे सत्य पचवणं खूप अवघड असतं. निवडुंगाच्या प्रजातीतलं हे फूल गेली अनेक वष्रे ब्रह्मकमळ म्हणून अनेक ठिकाणी पुजलं जातंय. वस्तुस्थिती अशी आहे की खरं ब्रह्मकमळ दूर उत्तरेकडे पसरलेल्या हिमालय नामक नगाधिराजाच्या उंच अंगाखांद्यावरच उगवतं. आणि हा उंच खांद्याचा भाग म्हणजे गेली काही वष्रे निसर्गाच्या कोपामुळे चच्रेत राहणारं उत्तराखंड हे राज्य. ते देशभरच्या भाविकांच्या हृदयात घर करून राहिलं आहे.
दोन हजार सालातल्या थंडीच्या मोसमाच्या सुरुवातीला नऊ नोव्हेंबर रोजी, भारतातलं सत्ताविसावं राज्य म्हणून उत्तराखंड अस्तित्वात आलं. उत्तर प्रदेशचा हा पर्वतीय भाग, ज्याला देवभूमी म्हणून ओळखलं जायचं, त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. या देवभूमीशी श्रद्धाळू मनं पिढय़ानपिढय़ा जुळलेली राहिली आहेतच. पण स्वातंत्र्योत्तर काळात साहसी क्रीडा प्रकारांकडे, गिर्यारोहणाकडे वळणाऱ्यांची पंढरी म्हणूनही ही देवभूमी हळूहळू ओळखली जायला लागली. हिमालयात घडणाऱ्या विविध नसíगक घटना, स्थानिक उत्सव, जनमेळे याच जोडीला निसर्गाच्या नसíगक बहराच्या काळात हिमालयाकडे, विशेषत: या देवभूमीकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रचंड असते. यातील बहुतांश पर्यटक, धार्मिक भेटींसाठी देवभूमीकडे वळत असतात. त्यांना अर्जुनाला दिसणाऱ्या पोपटाच्या डोळ्याप्रमाणे, निव्वळ धार्मिक स्थळंच दिसत असतात. बाकी सभोवतालची पर्यावरण संस्था म्हणजेच इको सिस्टीम, निसर्गाचं जाळं, त्या जाळ्याची आणि तिथल्या स्थानिकांची एकमेकांना पूरक असलेली जीवनशैली, स्थानिक झाडझाडोरा, पशुपक्षी वगरेंचा विचार करावा, अभ्यास करावा किंवा पुढे जाऊन त्यांबद्दल माहिती करून घेऊन स्वत:ला अपडेटेड ठेवावं असं बहुतांशी वाटत नाहीच. परिणाम म्हणजे देवभूमीसारख्या निसर्गसंपन्न प्रदेशात जाऊन अनेकांनी फुलोंकी घाटीच पाहिलेली नसते किंवा त्यांना तिथे जावंसं वाटत नाही.
उत्तराखंड राज्याचं तेरा जिल्ह्यंमध्ये वर्गीकरण झालेलं आहे. अर्थातच, हे सर्व जिल्हे पर्वतीय असून त्यांच्यावर निसर्गाने भरभरून संपदा उधळलेली आहे. या तेरा जिल्ह्यंमधील आकाराने सर्वात मोठय़ा असलेल्या उत्तर काशी या जिल्ह्यपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा असलेला चामोली हा जिल्हा अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. धर्मिक यात्रा करणाऱ्यांना बद्रिनाथ, वृद्ध बदरी, हेमकुंड साहीब, गोपेश्वर महादेवसारखी स्थळं खुणावत असतात तर साहसी पर्यटनाला प्राधान्य देणारे पर्यटक इथल्या औली, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, नंदादेवी पार्क ट्रेक, वसुंधरा ताल ट्रेक, मान बॉर्डर ट्रेकसारख्या ठिकाणी आवर्जून रमताना दिसतात. उत्तराखंड आणि साहसी पर्यटन हे शब्द उच्चारले की ज्या गोष्टी ठळकपणे समोर येतात त्यातलं अग्रभागी असलेलं नाव म्हणजे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ऊर्फ फुलोंकी घाटी. नावातच फुलांची दरी हे विशेषण मिरवणारी ही स्वर्गीय जागा चामोली जिल्ह्यला थेट जागतिक नकाशावर घेऊन गेली आहे. जागतिक वारसा स्थळ, अर्थात वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून पर्यटनाचा विशेष दर्जा लाभलेलं हे ठिकाण, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखलं जातं. नंदादेवी बायोस्फिअर्सच्या महत्त्वाच्या बेचक्यात जेमतेम ८८ चौरस किलोमीटर्स परिसरात पसरलेली ही फुलांची दरी १९३१ साली प्रकाशात आली. प्रसिद्ध ब्रिटिश गिर्यारोहक फ्रँक एस स्मिथ हा माउंट कामेट या शिखराच्या चढाईदरम्यान वाट चुकून या दरीत आला आणि त्याने लिहिलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ह्य पुस्तकामुळे जगाला या स्वर्गीय ठिकाणाचा पत्ता कळला.
उत्तराखंडाच्या प्रख्यात अलकनंदा नदीत भर घालणाऱ्या भ्युंदर गंगा ऊर्फ लक्ष्मण गंगा नदीच्या खोऱ्यात समुद्रसपाटीपासून साडेसहा हजार मीटर्स उंचीवर फुलणारी ही फुलोंकी घाटी म्हणजे निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवा. पुराणातल्या कथेप्रमाणे, राम-रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडल्यावर, थेट लंकेतून उड्डाण करून मारुतीराया इथेच अवतीर्ण झाले होते. कुंटखाल आणि रतबन पर्वताची पाश्र्वभूमी लाभलेल्या या दरीत अनेक दुर्मीळ वनौषधी सापडत असल्याने, या पुराणकथेवर विश्वास ठेवावासा वाटतो. १९८२ साली, स्थानिक जीवसंपदा वाचवण्यासाठी तसंच इथे होणाऱ्या अमर्याद गुरं चराईवर बंदी आणण्यासाठी हा ८८ किलोमीटर्सचा भाग राष्ट्रीय उद्यान म्हणून संरक्षित केला गेला आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यानाचा जन्म झाला.
या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यानाला जाण्यासाठी हृषीकेशहून बद्रिनाथच्या रस्त्यावर श्रीनगर, रुद्रप्रयागसारख्या प्रख्यात ठिकाणांना पाहात सुमारे तीनशे किलोमीटर्सचं अंतर कापत त्याच रस्त्यावर असलेल्या गोिबदघाट इथे यावं लागतं. गोिबदघाटपासून अगदी एक किलोमीटर अंतरावर वन खात्याने उभी केलेली मोठी कमान फुलोंकी घाटीत आपलं भले स्वागत करत असली तरीही साधारण चौदा किलोमीटर्सच्या अंतरावर असलेल्या घांगरिया या ठिकाणापर्यंत चालत जाणे अथवा तट्टांच्या पाठीवर बसून जाणे हे दोनच पर्याय आपल्यासमोर असतात. घांगरिया हे व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या अगदी मुखाजवळ असलेलं शेवटचं मानवी वस्तीचं ठिकाण आहे. या घांगरिया गावात गढवाल निगमने जगभरातून येणाऱ्या पर्यटकांची राहायची उत्तम सोय केली असून त्याच जोडीला खाजगी हॉटेल्सही आहेत. घांगरियातून एक लहानसा लाकडी पूल ओलांडला की दोन लहान रस्ते फुटतात. समोर पसरलेल्या रतबन पर्वताकडे तोंड करून उभे राहिल्यास उजव्या हाताला जाणारा रस्ता हेमकुंडसाहेब या शिखांच्या प्रख्यात धर्मस्थळाकडे जातो, तर डाव्या हाताला जाणारा रस्ता आडवा येणारा वाहता नाला ओलांडला, की नर पर्वताला अंगाखांद्यावर खेळवणारी जगप्रसिद्ध पुष्पघाटी समोर येते.
घांगरियापासून तीन किलोमीटर्स आतून सुरू होणारी ही घाटी पुढे ८७ किलोमीटर्स विस्तारत जाते. घाटीच्या आत, चिमुकली पुष्पावती नदी वाहाते जिच्या काठावर लाखो फुलांचे असंख्य ताटवे फुलतात. या पुष्पावतीच्या खळाळत्या पात्रामुळे परिसरात अनेक लहानसहान धबधबे बनलेले दिसतात. एकदा का या पुष्पघाटीत शिरलं की स्वर्ग म्हणजे हाच तो असा भास होतो. समोरच्या पर्वतांवरून खाली येणारं ढगसदृश धुकं, पुष्पावतीचं खळाळतं पाणी, विविधरंगी असंख्य फुलं आणि त्यात घोंगावणारी फुलपाखरं, किडे, कीटकमंडळी, मधूनच उडणारा एखादा पक्षी, सतत सुखावणारा ऊन शिरव्याचा सुखद खेळ अगदी शब्दातीतच असतो. या आनंदाला अनुभवायला या पुष्पदरीत जायलाच हवं. साधारण मे महिन्याच्या अखेरीस इथलं बर्फ वितळायला सुरुवात झाली की लहान लहान रानफुलं फुलायला सुरुवात होते. निसर्गाचा इथला सर्वोत्तम काल म्हणजे जुल ते सप्टेंबरदरम्यानचे महिने. दर पंधरा दिवसांनी इथे नवीन फुलं फुलतात आणि जमिनीला अक्षरश: विविध रंगांत माखून टाकतात. वनस्पती अभ्यासकांनी इथे पाचशेहून जास्त वनौषधींच्या जोडीला तिनशेहून जास्त प्रकारच्या फुलांच्या नोंदी केल्या आहेत. डेझी, ऑíकड्स, प्रिनुला, मार्श मेरिगोल्ड, इनुला, पेडिक्युलारिस अशी मोठी मोठी जडजंबाळ नाव मिरवणारी चिमुकली रानफुलं पाहताना देहभान हरपून जायला होतं. घाटीतल्या लहानसहान पायवाटांवर, टेकडीवर, दगडधोंडय़ांच्या अवतीभोवती नजर टाकू तिथे वेगवेगळी फुलं उमलण्याच्या विविध अवस्थांमधे दिसत राहतात. जणू काही परिसरात फुलांच्या व्हेकेशन बॅचेस फुलत राहतात. मे अखेरीची फुलं जून अखेरीस दिसत नाहीत, की जून महिनोत्पन्न फुलं जुलत दिसत नाहीत असं चक्र अगदी सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत सुरूच राहतं. त्यानंतर कधीतरी भुरुभुरु बर्फ पडायला सुरुवात होते आणि ही शेवटची बॅच अंगावर बर्फाची चादर ओढून हिमनिद्रिस्त होते ती थेट पुढच्या मे महिन्यापर्यंत.
आता नावातच ठिकाणाचं वैशिष्टय़ मिरवणारं हे फुलांचं जंगल फक्त फुलांसाठीच संरक्षित केलं गेलंय असं नाही. शेजारच्या नंदादेवी बायोस्फिअरच्या परिसरात आढळणारे कस्तुरी मृग, आशियाई अस्वल, हिम बिबळ्या, भुरं अस्वल, भारल बकऱ्या, लाल कोल्ह्य़ासारखे दुर्मीळ प्राणी इथेही चक्कर मारताना आढळून आल्याने या संरक्षित भागाचं महत्त्व ठळक झालंय. उत्तराखंड राज्याचा पक्षी हिमालयन मोनाल फेजन्ट या परिसरात सुखेनव नांदत असल्याने इथल्या समृद्ध जीवसाखळीचा अनुभव सतत जाणवत राहतो. जागतिक वारसा स्थळ जाहीर झाल्याने वन खात्याने स्थानिकांच्या मदतीने घाटीच्या संरक्षणार्थ पर्यावरण संघटन समिती अर्थात, इको कमिटीज स्थापन केल्या असून कुणीही घाटीत प्लास्टिक, काचा वगरेचा कचरा टाकणार नाही याची काळजी स्थानिक समिती घेत असते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ही घाटी पर्यटकांसाठी खुली असते मात्र इथे रात्रीचे वास्तव्य करायला, आग पेटवायला, अन्न शिजवायला, फुलं तोडायला, बिया गोळा करायला, गुरं चारायला वन खात्याने बंदी घातली आहे. पूर्वी अमर्याद पद्धतीने होणाऱ्या वनस्पतींच्या अवैध तोडीला या सगळ्यामुळे चाप बसला आहे. या पुष्पघाटीत १९३९ साली, रॉयल बॉटनिकल गार्डन्सने अभ्यासासाठी पाठवलेली जोआन मार्गारेट लेगी ही ब्रिटिश अभ्यासक दरीत फुलांचे काही दुर्मीळ नमुने गोळा करत असताना पडून मृत्यू पावली. दोन वर्षांनी, तिला शोधत तिथे पोहोचलेल्या तिच्या मेरी या बहिणीने जोआनच्या स्मरणार्थ आणि घाटीवर असलेल्या तिच्या प्रेमाखातर, तिथेच तिची कबर बनवली ज्यावर जोआनचे प्रसिद्ध वाक्य लिहिले आहे, ‘आय विल लिफ्ट अप माइन आइज अनटू द हिल फ्रॉम व्हेन्स कम्थ माय हेल्प’ अर्थात, ‘मेरी दृष्टी हिमालय के उन शिखरोंपर जाएगी जहाँसे मुझे शक्ती आयी है’.. ‘ घाटीत शिरल्यावर साधारण आठ ते दहा किलोमीटर्स अंतरावर फुलांच्या ताटव्यात पहुडलेल्या जोआनच्या या कबरीपुढे उभे राहिले की समोर दिसणारा नगाधिराज आपल्या खुजेपणाची आणि क्षणभंगुर आयुष्याची जाणीव करून देतो आणि नतमस्तक व्हायला लावतो.
ज्या फुलासाठी हा लेखप्रपंच केलाय ते पुष्पघाटीत फुलणारं अद्भुत फूल म्हणजे खरं ब्रह्मकमळ. आपल्यापकी बहुतांशजणांना खरं ब्रह्मकमळ कसं दिसतं हे माहीतच नसल्याने भलत्याच फुलाला आपण ब्रह्मकमळ म्हणण्याची चूक करत असतो. ज्या फुलाला आपण शहरात ब्रह्मकमळ म्हणून पुजतो ते दुसरं तिसरं काही नसून चक्क एक प्रकारच्या निवडुंगाचं फूल आहे. या निवडुंगाला इंग्लिशमध्ये नाइट ब्लूिमग फायलो कॅक्टस किंवा ऑíकड कॅक्टस असं म्हणतात. या फुलाला मध्यरात्री फुलताना पाहणे खरंच सुंदर असतं. तळहाताएवढे हे मंद पांढऱ्या रंगाचं फूल अनेक पाकळ्यापाकळ्यांचं असतं नि सकाळी मिटून गेलेलं असतं. याला फुलं यायला भरपूर वेळ लागतो हे मात्र खरं आहे नि कुठल्याही कुंडीत हे लागू शकतं. मात्र खरं ब्रह्मकमळ भारताच्या पश्चिमेच्या हिमालयात साडेचार हजार मीटर उंचीवर म्हणजे साधारण १४/१५ हजार फूट उंचीवर फुलतं. उत्तराखंडचं राज्यीय फूल असलेल्या आणि सॉसुरेआ ओबवाल्टा असं किचकट वनस्पतिशास्त्रीय नाव मिरवणाऱ्या या फुलाला स्थानीय भाषेत कोन, कोप्फू असंही म्हणतात. फुलोंकी घाटी, हेमकुंडसाहीब, बद्रिनाथचे डोंगर अशा फुलं फुलणाऱ्या उंच डोंगरांच्या उतारांना इथले स्थानिक लोक ‘बुग्याल’ म्हणतात.
ही अखंड बुग्यालं वेगवेगळ्या फुलांनी फुलून जातात. आपल्याकडचा पावसाळा हिमालयात अनेक फळाफुलांचा बहरण्याचा काळ असतो. साधारण जून महिन्यात जिथे मानवी हस्तक्षेप नाही अशा बुग्यालांवर ही खरी ब्रह्मकमळांची चिंटुकली झुडपं उगवतात. जुल महिन्यात ही पोटरीपर्यंत आलेली झुडपं आपल्या पोपटी हिरव्या पानांमधून मूठभर जाडे कळे मिरवायला सुरुवात करतात नि अमकातमका बुग्याल कोप्फूसे भरा है ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. मग स्थानिक वन खातं या फुलांच्या संरक्षणासाठी सरसावतं. कारण त्यांची अवैध तोड होते. श्रावणात शंकराला वाहण्यासाठी याची खूप तोड व्हायची. हे एक फूल तोडलं तर पुढे दहा फुलं येत नाहीत, कारण एकाच फुलात स्त्री आणि पुरुष केसर असतात जे कीटकांद्वारे वहन केले जातात. धार्मिक महत्त्वाखेरीज, तिबेटियन औषधांमध्ये या संपूर्ण फुलाचा नि झाडाचा उपयोग केला जातो म्हणूनदेखील याची अवैध तोड होते. आपल्या हिमालयाखेरीज, बर्मा, चीनच्या दक्षिण हिमालयातदेखील ही फुलं फुलतात. स्थानिक लोकांमध्ये हा समज आहे की मूत्रमार्गाच्या आजारांवर याचा गुण येतो. हे असलं काही कळलं की आपला ‘जंगलीपणा’ जागा होतो नि अशा वनस्पती हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर जातात, जे या ब्रह्मकमळाबाबतीत व्हायला लागलंय. डेहराडूनमध्ये शिकत असताना डॉक्टर चंद्रप्रकाश काला नावाच्या स्थानिक गढवाली संशोधक तज्ज्ञांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं होतं. त्यांनी फुलोंकी घाटीवर केलेलं संशोधन आज प्रमाण मानलं जातं. डॉक्टर काला नेहमी सांगायचे की एक दिवस असा येईल की आपल्याला खरं ब्रह्मकमळ बघायला मिळणार नाही इतकी हानी आपण या फुलाच्या परिसराला पोहोचवतोय. आज दुर्दैवाने तसंच झालंय. हेमकुंडसाहेबला जाणारे यात्रेकरू प्रचंड प्रमाणात कचरा यात्रा मार्गावर टाकतात. शीतपेयांच्या बाटल्या, खाण्याचे रॅपर्स, बिस्किटांचे कागद, लपवून आणलेल्या प्लास्टिक बॅग्स स्थानिक संघटन समितीने दिलेल्या कुंडय़ांमध्ये न टाकता ते कुठेही कसेही फेकतात, जे नदीच्या पाण्याबरोबर खाली येतात. हेमकुंडला जाणारे बहुतांश पर्यटक फुलोंकी घाटीला भेट देतच नाहीत. एखादा कुणी जेमतेम प्रवेशाचं तिकीट काढून आत शिरून एखादं किलोमीटर चालून परत येतो. हजारोंच्या संख्येने येणारे हे पर्यटक तिथल्या मर्यादित सोयी-सवलतींवर प्रचंड ताण आणतात. त्यांच्यामुळे तिथल्या आवश्यक गोष्टीच्या किमती अवाच्यासव्वा वाढतात. जगभरातून पुष्पघाटीसाठी येणारे अभ्यासक आणि पर्यटक यांना या गोष्टीचा बराच त्रास होतो.
आता मार्च संपत आलाय. फुलोंकी घाटीत बर्फाखाली झोपून गेलेल्या रानफुलांची चुळबुळ सुरू झाली असेल. मे महिन्यापासून ही फुलं फुलायला सुरुवात होईल आणि त्यासाठी तिथे असलेल्या सुविधांचंही बुकिंग आता सुरू होईल. या वर्षी खरं ब्रह्मकमळ बघायला जायचा संकल्प करायला हरकत नाही. लख्ख ऊन असो की किरमिरणारा पाऊस, गार धुकेदार ओलावा असो की सुनहरा मौसम, खरं ब्रह्मकमळ ताठ मान करून आकाशाकडे पाहात असतं. कुणाला वाटेल की कोबीचा लहान गड्डा हळूहळू फुलतोय. मी स्वतला खूप नशिबवान समजते कारण की अनेक वेळेस मी हे फूल पाहिलंय, हातात घेतलंय नि हुंगलंय. म्हणूनच कुणीही त्या मध्यरात्रीच्या निवडुंग फुलाला खरं ब्रह्मकमळ म्हटलं की माझा जीव खालीवर होतो नि थेट बद्रिनाथच्या पर्वतराजीमध्ये रेंगाळतो जिथून मला जगण्याची नवी शक्ती मिळते.
रूपाली पारखे देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा