Trekker Died Of Hypothermia Causes : मुसळधार पावसात धाडसी आणि थरारक अनुभव घेण्यासाठी अनेक ट्रेकर्स गड-किल्ल्यांवर गर्दी करतात. अशाच प्रकारचा अनुभव घेण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोला येथील हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका ट्रेकरचा १ ऑगस्ट रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. तर, दोन दिवसांहून अधिक काळ पाच ट्रेकर अडकून पडले होते; ज्यांची वन विभाग आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी सुखरूप सुटका केली.
या एकूण सहा जणांच्या टीमने पुणे जिल्ह्यातील तोलार खिंड येथून ट्रेकला सुरुवात केली. परंतु, मुसळधार पाऊस व घनदाट जंगल यामुळे ते रस्ता भरकटले आणि दोन दिवसांहून अधिक काळ जंगलात अडकून पडले. अशा परिस्थितीत टीममधील बाळू नताहराम गित्ते यांची प्रकृती खालावली आणि २ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांचा हायपोथर्मियामुळे मृत्यू झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे अनुभवी ट्रेकर्स नव्हते म्हणून कोणतीही सुरक्षा उपकरणे, अन्न व कपडे ते घेऊन गेले नव्हते. तसेच नेटवर्क सिग्नल नसल्याने मोबाईलवर कोणाशीही संपर्क होऊ न शकल्याने त्यांना जंगलात अन्नाशिवाय रात्र काढावी लागली. यावेळी अंगावर ओले कपडे आणि त्यात मुसळधार पाऊस व थंड वारा यामुळे गित्ते यांची प्रकृती अधिक खालावली आणि गित्ते हायपोथर्मियाचे बळी ठरले.
या घटनेमुळे आता हायपोथर्मिया आजार नेमका काय आहे? त्याची लक्षणे काय आहेत? आणि ट्रेकर्सनी पावसाळ्यात गड-किल्ल्यांवर जाताना काय काळजी घेतली पाहिजे याबाबत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. याच आजाराविषयी महाराष्ट्र राज्य शासनातील माजी मुख्य सार्वजनिक आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी ‘लोकसत्ता डॉट.कॉम’ला सखोल माहिती दिली आहे.
हायपोथर्मिया म्हणजे काय?
आपले शरीर ज्या वेगाने उष्मा तयार करते, त्यापेक्षा अधिक वेगाने जेव्हा शरीरातील उष्मा कमी होऊ लागतो तेव्हा हायपोथर्मिया हा प्रकार उदभवतो. अशा परिस्थितीत शरीरातील उष्णता त्वचेतून बाहेर फेकली जाते आणि बाकीची उष्णता फुप्फुसांद्वारे बाहेर निघते. त्यामुळे व्यक्तीच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. विशेषत: शरीरातील उष्णता घटते आणि हायपोथर्मियाचा धोका वाढतो.
शरीराचे तापमान किती असायला हवे?
आपल्या शरीराचे सामान्य तापमान ३७ डिग्री सेल्सिअस एवढे असते; परंतु अत्यंत थंड वातावरणात किंवा थंड पाण्यामध्ये पडल्यामुळे जर शरीराचे तापमान हे ३५ डिग्रीपेक्षा कमी झाले, तर त्याचा स्वाभाविकपणे मानवी शरीरावर परिणाम होऊ लागतो. अशा परिस्थितीत शरीराचे संतुलन बिघडते आणि हायपोथर्मिया होतो.
हायपोथर्मियाची लक्षणे काय?
हायपोथर्मियामध्ये हृदय, चेतासंस्था यांची कार्यशक्ती मंदावते. श्वसन मंद होऊ लागते. थंडी वाजून येते, शरीर दुर्बल झाल्याने नाडीच्या ठोक्यांचा वेग कमी होतो. गोंधळलेली मानसिक अवस्था निर्माण होऊन, झोपाळल्यासारखी अवस्था होते. बोलण्यात तोतरेपणा येतो. हालचालींमधील को-ऑर्डिनेशन हरवते.
जर अशा रुग्णाला त्याच्या शरीराचे तापमान वाढण्याकरिता योग्य उपाययोजना करण्यामध्ये विलंब झाला, तर हृदय बंद पडून त्यामध्ये त्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो.
हायपोथर्मियावर उपचार पद्धती
१) रुग्णाच्या अंगावरील थंड किंवा ओले कपडे काढणे, अंग खसाखसा घासून कोरडे करणे.
२) रुग्णाला गरम उबदार जागी घेऊन जाणे.
३) तळपाय आणि तळहातावर वेगावेगाने हाताने घासून उष्णता निर्माण करण्याचा प्रयत्न करणे.
४) गरम केलेल्या कपड्यांनी मान, काख, छाती, जांघ या ठिकाणी शेक देणे, यामुळे रुग्णाच्या शरीराचे तापमान वाढण्यास मदत होते.
ट्रेकर्सनी काय काळजी घ्यावी?
अनेकांना ट्रेकिंगची सवय नसते. अशा परिस्थितीत अचानक एका उंचीवर पोहोचतो; पण त्यासाठी शरीराची तयारी नसते. तर दुसरे म्हणजे काही जण उंचीवरील थंडी गांभीर्याने घेत नाहीत आणि तिसरे म्हणजे एकाच दिवसात हवामानात मोठा चढ-उतार होतो. या कारणामुळे कुणालाही हायपोथर्मिया होऊ शकतो. त्यामुळे हायपोथर्मियापासून वाचण्यासाठी ट्रेकरने सर्व गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
१) ट्रेकिंगला जाताना एक जोड उबदार कपडे किंवा एखादी चादर सोबत ठेवा.
२) पावसाळ्यात जास्त तहान लागत नसली तरीही थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे. पुरेसे अन्न सोबत घ्या.
३) प्रथमोपचार पेटी घ्या.
४) मोबाईलची बॅटरी वाचवा. कारण- रात्रभर राहण्याची वेळ आल्यास तेव्हा मोबाईल कामी येईल.