Early Signs of Pancreatic Cancer: कर्करोग आजच्या काळात सर्वांत घातक आणि वेगाने पसरणारा विकार बनला आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे स्वादुपिंड किंवा अग्नाशयाचा कर्करोग (Pancreatic Cancer), जो पोटाच्या खालच्या भागातील मागील बाजूस असलेल्या अग्नाशयात सुरू होतो. हा कर्करोग इतका धोकादायक असतो की, सुरुवातीला सहजपणे त्याची लक्षणे लक्षात येत नाहीत.
सामान्य कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वजन कमी होणे हे प्रमुख लक्षण असते; पण अग्नाशयाच्या कर्करोगामध्ये तसे दिसून येत नाही. असह्य वेदना नसते, वजनदेखील जास्त बदलत नाही. त्यामुळे सुरुवातीला रुग्णांना या आजाराची कल्पनाही येत नाही. जागतिक आरोग्य संस्थेनुसार जगात होणाऱ्या मृत्यूंच्या आकडेवारीत अग्नाशयाचा कर्करोग चौथ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, हा कर्करोग पुरुष आणि स्त्री अशा दोहोंनाही होणाऱ्या सर्वांत धोकादायक कर्करोगापैकी एक आहे. या विकारामुळे ग्रस्त झालेला रुग्ण फक्त एक ते पाच वर्षांपर्यंतच जिवंत राहू शकतो.
अग्नाशयाचा कर्करोग कसा तयार होतो?
अग्नाशयाचा कर्करोग त्या वेळी उद्भवतो जेव्हा अग्नाशयातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात. सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांमध्ये लक्षात येणारी लक्षणे फारच सूक्ष्म असतात. डॉ. विकी लियाओ, प्रायमरी हेल्थ केअर सायन्सेस, Nuffield Department, यांच्या मते, या कर्करोगाच्या सुरुवातीला शरीरात दोन प्रमुख लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे कर्करोगाचे निदान होण्यापूर्वी सुमारे एक वर्ष आधी दिसू लागतात, ज्यामुळे योग्य वेळी खबरदारी घेणे शक्य होऊ शकते.
अग्नाशयाच्या कर्करोगाची सुरुवातीची दोन लक्षणे
- अत्यधिक तहान लागणे – रुग्णाला सतत पाणी पिण्याची इच्छा होते. शरीराची सामान्य स्थिती असतानाही सातत्याने पाण्याची आवश्यकता जाणवते, ज्याकडे सुरुवातीला सामान्य बाब समजून दुर्लक्ष केले जाते.
- मूत्राचा पिवळसर रंग – मूत्राच्या रंगात बदल होतो, पिवळसर होतो, जो रुग्ण किंवा नजरेस येणाऱ्या लोकांना एक सावधगिरीचा असतो.
या दोन लक्षणांचा रुग्णांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण- तशी लक्षणे असलेल्या रुग्णांना डॉक्टरांकडे वेळेत तपासणीसाठी पाठवता येते. डॉ. लियाओ यांच्या मते, या लक्षणांचा वेळेत शोध घेणे रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरते.
सतर्कता का आवश्यक?
सामान्यपणे हे संकेत लोक साध्या त्रासाचे मानून दुर्लक्ष करतात; पण अग्नाशयाच्या कर्करोगाच्या सुरुवातीला ही लक्षणे खूप महत्त्वाची असतात. आयसीएमआरच्या अहवालानुसार डायबेटीजदेखील या कर्करोगाचे संभाव्य लक्षण असू शकते. अग्नाशयातील कर्करोग शरीरात इन्सुलिनसाठी प्रतिकार निर्माण करतो, ज्यामुळे डायबेटीजसारखी स्थिती तयार होते. त्यामुळे या लक्षणांची वेळीच माहिती घेऊन, योग्य त्या तपासण्या करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
(टीप : वरील माहिती वैज्ञानिक संशोधनावर आधारित शक्यता दर्शवते; ते निश्चित निदान किंवा उपचाराचा सल्ला नाही. त्यामुळे लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.)