भारतात प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केला जात आहेत. यासाठी कोणत्याही रेस्टॉरंट, हॉटेल, ज्यूस सेंटरमध्ये तुम्हाला ज्यूस, कॉफी पिण्यासाठी पेपर स्ट्रॉ दिला जातो. अगदी पॅकेज केलेल्या ड्रिंक्समध्येही प्लॅस्टिकऐवजी पेपर स्ट्रॉचा वापर केला जात आहे. सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी हा एक चांगला उपाय मानला जात आहे. याचदरम्यान आता एक नवा अभ्यास समोर आला आहे, ज्यातून पेपर स्ट्रॉबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेपर स्ट्रॉ बनवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर केला जात असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे इको फ्रेंडली मानली जाणारी पेपर स्ट्रॉ आता जीवघेणी ठरत आहे.

पेपर स्ट्रॉमधील रसायनाचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही होत आहे. यामुळे पेपर स्ट्रॉ आरोग्यासाठी धोकादायक मानले जात आहेत.
पण समोर आलेल्या अभ्यासात काय सांगितले गेले आहे जाणून घेऊ…

स्काय न्यूजनुसार, बेल्जियमच्या काही संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, पेपर स्ट्रॉने कोणतेही ड्रिंक पिणे हानिकारक ठरु शकते. या पेपर स्ट्रॉमध्ये काही विषारी रसायने असतात, जी माणसांच्या आरोग्यासाठी धोकादायक असण्यासोबतच इतर जीव आणि पर्यावरणालाही धोका निर्माण करू शकतात. जेव्हा अनेक पेपर स्ट्रॉच्या कागदी लगद्यावर संशोधन केले गेले तेव्हा असे समोर आले की, कागद आणि बांबूपासून बनवलेल्या लगद्यामध्ये पॉली- आणि परफ्लुरोआल्काइल अॅसिड (पीएफएएस) आढळून आले. ही रसायने दीर्घकाळ टिकतात जे मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहेत.पेपर स्ट्रॉच्या २० पैकी १८ ब्रँडच्या स्ट्रॉमध्ये परफ्लुरोआल्काइल अॅसिड (पीएफएएस) आढळले आहे. या रसायनावर जगभरात बंदी आहेत कारण यातील परफ्लुरोआल्काइल अॅसिड मानवी शरीरात अनेक वर्षे टिकून राहते, जे कालांतराने घातक ठरते.

अँटवर्प युनिव्हर्सिटीचे डॉ. थिमो ग्रोफन यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही स्ट्रॉमध्ये पीएफएएस आढळून आलेले नाही. पण शास्त्रज्ञांच्या मते, पीएफएएस शरीरात अनेक वर्षे जमा राहू शकते. या रसायनामुळे थायरॉईड, कोलेस्ट्रॉल वाढणे, यकृताचा त्रास, किडनीचा कर्करोग, जन्मजात वजन कमी असणे, लसींचा कमी परिणाम अशा समस्या उद्भवू शकतात.