आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिला, तसेच तरुणींमध्ये पीसीओडी आणि पीसीओएसचं प्रमाण वाढत चाललं आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ज्याला पॉलीसिस्टिक ओव्हरी डिस-ऑर्डर, असेही म्हणतात. हा एक सामान्य हार्मोनल विकार आहे. हा हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होतो, ज्यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवतात.
परिणामी महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक बदल होतात, जे त्यांच्या मानसिक आरोग्यावरदेखील परिणाम करू शकतात. यावर चांगली बातमी अशी आहे की, योग्य प्रकारचे अन्न खाल्ल्याने ते नियंत्रित केले जाऊ शकते. काही पदार्थ इतरांपेक्षा पीसीओएस असलेल्या लोकांसाठी अधिक योग्य असतात आणि ते कधी खातात याची वेळदेखील. अलीकडेच, पोषणतज्ज्ञ शिखा गुप्ता कश्यप यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर पीसीओएस / पीसीओडीचा त्रास असणाऱ्या महिलांनी रिकाम्या पोटी खाणे टाळावे, असे पदार्थ सांगितले आहेत. पण प्रथम, पीसीओएस म्हणजे काय? आणि प्रमुख लक्षणे पाहूया.
PCOD / PCOS म्हणजे काय?
पीसीओएस / पीसीओडी हा एक सामान्य हार्मोनल विकार आहे, ज्यामध्ये मासिक पाळीत अनियमितता, वाढलेली एंड्रोजन पातळी (पुरुष संप्रेरक) आणि अंडाशयात लहान द्रवाने भरलेल्या पिशव्या विकसित होतात. हे हानिकारक नसलं तरी ovulation वर परिणाम करू शकतात आणि पीसीओएस / पीसीओडीशी संबंधित हार्मोनल असंतुलनास हातभार लावू शकतात.
PCOD/ PCOS ची लक्षणं काय?
PCOS किंवा PCOD ची लक्षणे प्रत्येक स्त्रीमधे वेगवेगळी असू शकतात. जसे की,
अनियमित मासिक पाळी
चेहऱ्यावर पुरळ येणे
वजन वाढणे
डोक्यावरचे केस गळणे
चिडचिडेपणा वाढणे
PCOS असल्यास रिकाम्या पोटी हे पदार्थ खाऊ नका-
१. चहा/कॉफी – तुम्हाला तुमचा दिवस चहा किंवा कॉफीने सुरू करायला आवडतो का? जर असेल, तर आता पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. कारण- या दोन्ही पेयांमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त आहे आणि ते पोषक घटकांच्या शोषणात व्यत्यय आणू शकतात. म्हणून जर तुम्हाला PCOS असेल, तर रिकाम्या पोटी चहा/कॉफी पिणे टाळणे चांगले.
२. बिस्किटे/नमकीन – तुम्ही सकाळी बिस्किटे आणि नमकीन टाळले पाहिजे. सकाळच्या चहासोबत बिस्किटे खाण्याचा मोह होऊ शकतो; परंतु संयम बाळगा. पोषणतज्ज्ञ स्पष्ट करतात की, बिस्किटे आणि नमकीनमध्ये ट्रान्स फॅट्स आणि रिफाइंड पीठ असते, जे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम करू शकते आणि शरीरात जळजळदेखील निर्माण करू शकते, ज्यामुळे तुमची स्थिती बिघडू शकते.
३.फळे – सकाळी एक वाटी फळे खाणे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे, असे तुम्हाला वाटते का? मात्र थांबा… एक सामान्य गैरसमज आहे की, तुम्ही तुम्हाला हवी तितकी फळे खाऊ शकतात. कारण- ती निरोगी असतात. मात्र, हे विसरू नका की, फळांमध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोजदेखील भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे सेवनाने रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम होतो.
पीसीओएस असल्यास रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खावेत हे तुम्हाला माहीत आहे का?
आता तुम्हाला कोणते पदार्थ टाळावे हे माहीत झाले आहे. मात्र, तर तुम्ही कोणते पदार्थ खाऊ शकता याचा विचार करीत असाल. तर जाणून घेऊ…
१ चमचा नारळ तेल किंवा तूप, ८-१० काजू रात्रभर भिजवलेले आणि ५० ग्रॅम नारळाचे तुकडे खाण्याचा सल्ला दिला जातो. हे सर्व पर्याय इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास आणि तुमची साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतील. याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात प्रथिने आणि निरोगी चरबीयुक्त नाश्त्याने करू शकता. पोषणतज्ज्ञ दोन संपूर्ण अंडी आणि एक वाटी शिजवलेल्या भाज्या किंवा भाज्यांनी भरलेले मूग डाळ/बेसन चिल्ला, असे पर्याय सुचवतात.
पीसीओएससह जगणे आव्हानात्मक असू शकते; परंतु योग्य प्रकारच्या आहाराने दिवसाची सुरुवात करून, ते व्यवस्थापित केले जाऊ शकते.