वयाच्या पन्नाशीनंतर खूपदा पायाला सूज येणे, पायात गोळे येणे, थकवा जाणवणे, पाय चालल्यावर दुखणे या तक्रारी जाणवतात. या तक्रारी मुख्यत: पायांच्या रक्तवाहिन्यांतील आजारामुळे असू शकतात. ‘व्हेरिकोज व्हेन्स’ आणि पायातील धमन्यांच्या आजारामुळे (पेरिफल आर्टेरिअल डिसिज) रुग्णांना ह्या तक्रारी जाणवू शकतात. व्हेरिकोज व्हेन्सच्या आजारात पायातील अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या नीलांमध्ये रक्तप्रवाह नीट होत नाही म्हणून रुग्णांना त्रास होतो तर ‘पेरिफल आर्टेरिअल डिसिज’मध्ये पायांतील शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजे धमन्यामध्ये रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण झाल्यामुळे रक्तपुरवठा पुरेसा होत नाही आणि रुग्णांना त्रास होतो. या दोन्ही प्रकारच्या आजारांचे निदान लवकर केल्यास पुढे होणारे गंभीर दुष्परिणाम टाळू शकतात.
व्हेरिकोज व्हेन्स
आपल्या पायांतील व्हेन्समध्ये अनेक झडपा असतात, ज्या रक्तप्रवाह नियंत्रित करत असतात. या झडपा वयोमानानुसार अकार्यक्षम होत जातात आणि त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. रक्तप्रवाह गोठल्यामुळे या फुगतात, त्यालाच व्हेरिकोज व्हेन्स असे म्हणतात.
आणखी वाचा- टाचदुखीचा त्रास होतोय?
कारणे –
* वयोमानामुळे होणारी शिरांमधील झडपांची झीज
* खूप वेळा उभे राहण्याचे किंवा बसून काम करण्याच्या सवयी
* आनुवांशिकता
* स्थूलता, अनियमित व्यायाम
* पायाला लागलेला मार
* स्त्रियांमध्ये हा आजार पुरुषांपेक्षा अधिक आढळतो. कारण स्त्रियांच्या शरीरातील हार्मोन्स शिरा रिलॅक्स म्हणजे प्रसारित करतात.
लक्षणे –
* पायांमध्ये वेदना होणे, पाय जड होणे, पायांना सूज येणे.
* खूप वेळ उभं राहिल्यावर पायांतील वेदना वाढतात.
* पायांतील शिरा फुगल्याचे दिसून येणे.
* पायांवरील त्वचा काळवंडणे, खाज येणे.
* पायावर अल्सर किंवा व्रण होणे.
आणखी वाचा- थायरॉइडची लक्षणे आणि उपचार
उपाययोजना
या आजाराचे निदान ‘सोनोग्राफी’ आणि ‘डॉप्लरने ’ होऊ शकते. या आजारावर वेळीच उपाययोजना केली नाही तर पायावर अल्सर होऊ शकतो किंवा रक्ताची गुठळी होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. हे गंभीर दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे-
* वजन नियंत्रित ठेवा.
* नियमित व्यायाम करा.
* पाय वर करून बसा.
* खूप वेळा एका जागेवर बसू नका किंवा खूप वेळ उभे राहाणे टाळा.
* उंच टाचेच्या चपला घालू नका.
* कंप्रेशन स्टॉकिंग्जचा वापर करा.
* गरज पडल्यास लेझर, स्लेरोथेरपी यांसारख्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत.
पायातील धमन्यांचे आजार किंवा ‘पेरिफिरल आर्टेरिअल डिसीज’
हृदय आणि मेंदूतील रक्तवाहिन्या सोडून शरीरातील इतर धमन्यांमध्ये जेव्हा चरबीच्या गाठींमुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो तेव्हा त्याला ‘पेरिफरल आर्टेरिअल डिसीज’ असे म्हटले जाते. या आजारात पायातील रक्तवाहिन्यांमध्ये गुठळय़ा निर्माण होण्याचे प्रमाण जास्त आहे. ज्याप्रमाणे हृदयात चरबींच्या गाठीमुळे हृदयरोग होतो किंवा मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील चरबीच्या गाठींमुळे पक्षाघात होतो, त्याचप्रमाणे या गाठी पायांमधील रक्तवाहिन्यांमध्ये तयार होतात आणि पायातील रक्तप्रवाहाचा अडथळा निर्माण करतात.
कारणे
* स्थूलपणा ल्ल मधुमेह
* उच्च रक्तदाब ल्ल हृदयरोग
* कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण
* अतिधूम्रपान
(- डॉ. नीलम रेडकर)