एमजी मोटार इंडियाने नव्याने बाजारात आणलेल्या ‘अ‍ॅस्टर’

पेट्रोल कारसाठी २१ ऑक्टोबर रोजी नोंदणी सुरू केली होती. पुढील वर्षभरात त्यांनी ५ हजार कारची डिलिव्हरी करण्याचे ठरविले होते. मात्र आश्चर्य म्हणजे त्याच दिवशी अवघ्या काही मिनिटांतच सर्व कारची विक्री झाली. त्यामुळे त्यांना पुढील वर्षभरासाठी नोंदणी बंद करावी लागली.

सध्या पेट्रोलच्या किमती शंभरीपार करून पुढे गेल्या आहेत. याबाबत वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. असे असताना या काळात एका पेट्रोल कारला मिळालेला प्रतिसादही दुर्लक्षित करता येणार नाही. बाजारात सीएनजी, विद्युत कार हे पर्याय उपलब्ध होत असले तरी पेट्रोल कारवर असलेले प्रेम आजही कायम आहे. खरेदीदार आजही चांगल्या पेट्रोल कारच्या शोधात आहेत, मात्र बाजारात अनेक पर्याय असल्याने आपल्यासाठी योग्य पर्याय निवडताना ते गोंधळतात.  नुकतीच दिवाळी संपली. या काळात वाहन बाजारात चैतन्य होते. अद्याप कंपन्यांनी या काळात झालेली कारची विक्री जाहीर केली नाही. मात्र चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या विक्रीतही टॉप टेनमध्ये टाटाची पंच (८४५३) , नेक्सान (१०,०९६), किआची सेल्टॉस (१०४४८) या पेट्रोल कार आहेत. त्यामुळे पेट्रोल कारला आजही चांगली मागणी आहे. तर मारुतीच्या बलोनो दुसऱ्या स्थानावर असून या कारची १५५५३ युनिटची विक्री झाली आहे. साधारणत:  ५ ते १० लाखांदरम्यान किंमत ही साधारण सर्वसामान्य कार खरेदीदारांना परवाडणारी असते. त्यामध्ये पहिल्यांदाच कार घेणाऱ्यांचा समावेश असतो. त्यामुळे आज, आपण ५ ते १० लाखांदरम्यान मिळणाऱ्या उत्तम पेट्रोल कारची माहिती देणार आहोत आणि उत्तम मूल्य प्रस्तावसुद्धा बघणार आहोत.

न्यू होंडा अमेझ

होंडा अमेझ ही पाच आसनी सेदान कार आहे. आतापर्यंत ४.५ लाखांपेक्षा जास्त ग्राहकांनी तिला पसंती दिली आहे. उत्तम प्रवासासाठी व पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्यांसाठी अमेझ ही चांगली निवड आहे. मध्यम आकारातील या कारमधील दालनाची जागा प्रशस्त असून कार चालविताना आरामदायीपणा जाणवतो. कंपनीने आता या कारची सुधारित आवृत्ती बाजारात आणली आहे. एलईडी दिवे, १५ इंची ड्वेल टोन अलॉय व्हील्स दिली आहेत. मनोरंजनासाठी अत्याधुनिक संगीत प्रणाली दिली असून त्यात अ‍ॅपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटो आणि नवीन कनेक्टिव्हिटी आहे. शक्तिशाली १.२ एल आय- व्हीटीइसी पेट्रोल इंजिन आहे. ज्यात मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशनची निवड आहे. ही कार ६ लाख ३२ हजारांपासून ९ लाख ०५ हजारांपर्यंत उपलब्ध आहे. सर्व किमती या दिल्ली येथील शोरूमबाह्य आहेत. अमेझ डिझेल प्रकारातसुद्धा उपलब्ध आहे.

हुंदाई ग्रँड आय १० निऑस

हुंदाई ग्रँड आय १० निऑस ही प्रीमियम हॅचबॅक असून त्यामध्ये प्रीमियम दालन आणि नवीन वैािशष्टय़ दिली आहेत. त्यामध्ये मोठी सिग्नेचर ग्रील आणि बूमरंग-आकाराचे डीआरएलएस आहे. एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि प्रोजेक्टर फॉग लँप्ससुद्धा आहेत. यासोबतच, ग्रँड आय १० निऑसमध्ये १५ इंची अलॉय व्हील्स आणि रूफ रेल्स आहेत.   अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोला सपोर्ट करणारा स्मार्ट डिस्पले आहे. वायरलेस चार्जर, यूएसबी पोर्ट्ल, ब्लुटूथ कनेक्टिविटी, कूल्ड ग्लोव बॉक्स, रियर पार्किंग सेंसर्स आणि कॅमेरा ही वैशिष्टय़ेसुद्धा आहे. या कारमध्ये १.२ एल कप्पा व्हीटीव्हीटी पेट्रोल इंजिन आणि तिची किंमत ५.२८ ते ७.९९ लाख यादरम्यान आहे (दिल्ली येथील शोरूमबाह्य किंमत). ही कार प्रतितास १७ ते २२ किलोमीटर पर्यंतचे अ‍ॅव्हेरज देते.

हुंदाई ऑरा

हुंदाई  ऑरा ही पाच आसनी सेदान कार असून त्यामध्ये कासकेडिंग ग्रील आणि बूमरंग-आकाराचा ट्विन-एलईडी डीआरएलएस आहे. मागील-पुढील दिवे  आकर्षक असून स्पोर्टी लूक आहे. अंतर्गत रचनाही व्यवस्थित आहे. आठ इंच टचस्क्रीन डिस्प्लेमध्ये अँड्रॉईड ऑटो, अ‍ॅपल कारप्ले, आवाज ओळख आणि ब्लुटूथ कनेक्शन, आणि सोयीसाठी वायरलेस चार्जिंगची व्यवस्था आहे. ऑरा पेट्रोलमध्ये १.२  एल आणि १ एल पेट्रोल इंजिन आहे. तिची किंमत ५.९९ लाख ते ८.७२ लाखांदरम्यान आहे (दिल्ली येथील शोरूमबाह्य किंमत) ही कार प्रतितास २० ते २८ किलोमीटर पर्यंतचे अ‍ॅव्हेरज देते.

मारुती सुझुकी बलेनो

भारताच्या प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये सध्या सर्वात प्रसिद्ध असणारी कार म्हणजे मारुती सुझुकी बलेनो. ऑक्टोबर २०१५ मध्ये ती बाजारात आली असून ती  सर्वोत्तम विक्री होणाऱ्या पहिल्या दहा कारमध्ये आहे. कारच्या वैशिष्टय़ांमध्ये स्मार्ट प्ले सिस्टीमचा समावेश आहे. ज्यामुळे तुम्ही कॉल, नेव्हिगेट, आणि संगीत ऐकणे या गोष्टी करू शकता. रंगीत माहिती देणारा डिस्प्ले ही आणखी एक व्यवस्था आहे. ज्यामुळे तुम्ही कारमध्ये जे काही घडत आहे त्या प्रत्येकाकडे पूर्ण लक्ष देऊ  शकता.

बलेनो पेट्रोलमध्ये उपलब्ध असून १.२ एल व्हीव्हीटी पेट्रोल इंजिन आणि १.२ एल ड्वेलजेट, ड्वेल व्हीव्हीटी इंजिन कॉन्फिगरेशन आहे. ज्याची किंमत रुपये ५,९९,००० ते ९,४५,००० दरम्यान आहे (दिल्ली येथील शोरूमबाह्य किंमत). ही कार प्रतितास २१ ते २४ किलोमीटर पर्यंतचे अ‍ॅव्हेरज देते.

निसान मॅग्नाईट

निसान मॅग्नाईट दोन वेगवेगळ्या प्रकारच्या १.० लिटर पेट्रोल पॉवरट्रेन्समध्ये उपलब्ध आहे. नॅचरली स्पिरेटेड युनिट जो ७२ पीएस अधिकतम पॉवर आणि ९६ न्यूटर्न मीटर टॉर्क निर्माण करतो, आणि टबरेचार्ज युनिट जो १०० पीएस  पॉवर आणि १६० न्यूटनं मीटर टॉर्क निर्माण करतो (सीव्हीटीसह १५२ न्यूटर्न मीटर टॉर्क). दोन्ही इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह आहेत, परंतु टबरे पेट्रोल इंजिनला पर्यायी सीव्हीटी ऑटोमेटिक ट्रान्समिशनसुद्धा असू शकते. ती चार प्रकारात उपलब्ध आहे. मॅग्नाईट पेट्रोल प्रकार १ लिटर इंजिनमध्ये असून तिची किंमत ५.५९ लाख ते ९.७४ लाखांदरम्यान आहे (दिल्ली येथे शोरूमबाह्य किंमत). ही कार प्रतितास १८ ते २० किलोमीटर पर्यंतचे अ‍ॅव्हेरज देते.

बाजारात नवीन काय?

वॉल्वोच्या दोन लक्झरी सेदान कार

वॉल्वो कार इंडियाने लक्झरी सेडान प्रकारातील ‘एस ९०’ आणि ‘सी  ६०’ या मिड-साइझ एसयूव्ही कारची पेट्रोल माइल्ड-हायब्रिड मॉडेल्स आणली आहेत. न्यू पेट्रोल माइल्ड-हायब्रिड वॉल्वो एस ९० आणि एस ६० या दोन्ही कारची किंमत एक्स-शोरूम ६१ लाख ९० हजार रुपये इतकी आहे. या दोन्ही कारमध्ये अत्याधुनिक वैशिष्टय़े आहेत. गूगल अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस देणारी डिजिटल सव्‍‌र्हिस, गूगल असिस्टिंट्सह हँड्स फ्री मदत देणारी इतर अ‍ॅप्स व सेवांचा, गूगल मॅप्सच्या माध्यमातून मिळणारे या विभागातील सर्वोत्तम नॅव्हिगेशन दोन्ही मॉडेल्सवर उपलब्ध आहे.

नव्या पेट्रोल माइल्ड-हायब्रिड कार आणि नव्या तंत्रज्ञानाव्यतिरिक्त कंपनीने ३ वर्षांचे वॉल्वो सेवा पॅकेज दिले आहे. गूगल अ‍ॅप्स व सेवांसह अँड्रॉइडचे पाठबळ लाभलेली इन्फोटेन्मेंट यंत्रणा इंटिग्रेट करण्यासाठी वॉल्वो कार ग्रुपने गूगलशी हातमिळवणी केली आहे. वॉल्वो सुरक्षितता आणि शाश्वततेसाठी कटिबद्ध आहे आणि आपल्या कार युझर्सना त्यांच्यातर्फे आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.

‘एस ९०’ ही वॉल्वोची प्रीमिअम ४ दरवाजे, ५ आसने असलेली सेडान कार आहे. ही गाडी प्रगत मॉडय़ुलर व्हेईकल प्लॅटफॉर्मच्या आधारे तयार करण्यात आली आहे. एसपीए प्लॅटफॉर्ममुळे आजपर्यंतच्या सर्वात भक्कम वॉल्वो कार तयार झाल्या आहेत.

‘एस ६०’ कारमध्ये आधुनिक अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम (एडीएएस) सेन्सर प्लॅटफॉर्म या विविध प्रकारचे रडार, कॅमेरे व अल्ट्रासॉनिक सेन्सर्स तसेच सुरक्षा यंत्रणा अधिक देण्यात आली आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

अपोलोकडून वड्रेस्टाइन टायर

अपोलो टायर्सने भारतामध्ये प्रीमिअम युरोपियन ब्रॅण्ड वड्रेस्टाइन बाजारात आणला आहे. वड्रेस्टाइन ब्रॅण्डचे टायर उत्पादन भारतात करण्यात येणार असून प्रवासी कारमधील प्रीमिअम व लक्झरी विभागाच्या गरजांची पूर्तता करणार आहे. वड्रेस्टाइन दुचाकी टायर सुपरबाइकिंग विभागाच्या गरजांची पूर्तता करतील, असे कंपनीने म्हटले आहे. डिझाइन व उच्च दर्जा ही वड्रेस्टाइन टायरची ओळख असून प्रवासी वाहन विभागामध्ये १५ इंच ते २० इंच आकाराच्या टायरचे उत्पादन भारतात केले जाणार आहे. प्रीमिअम लक्झरी सेडान कार आणि प्रीमिअम हॅचबॅक व सेडान कारसाठी लागणाऱ्या टायरची पूर्तता याद्वारे केली जाणार आहे. त्याशिवाय स्पोर्ट्स श्रेणीतील सुपरबाइक दुचाकींसाठी लागणाऱ्या टायरची पूर्तताही वड्रेस्टाइन टायर करू शकतील, असा कंपनीचा दावा आहे.

भारतामध्ये वड्रेस्टाइन ब्रॅण्डच्या अनावरणावेळी बोलताना अपोलो टायर्स लिमिटेडचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नीरज कंवर म्हणाले, भारतातील कार्सच्या प्रीमिअम व लक्झरी विभागाप्रती तसेच सुपरबाइकिंग विभागाप्रती मागणी प्रचंड वाढत आहे. यामुळे आम्हाला भारतीय ग्राहकांसाठी हा १०० वर्षांहून अधिक काळ जुना ब्रॅण्ड वड्रेस्टाइन भारतात आणण्यास  प्रोत्साहन मिळाले आहे.