What Happens When You Stop Sugar: आजकाल साखर म्हणजे प्रत्येक अन्नपदार्थाचा अविभाज्य भाग झाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, फक्त १४ दिवस साखर पूर्णपणे सोडली तरी शरीरात आश्चर्यकारक बदल घडतात? अमेरिकेतील प्रसिद्ध आरोग्यतज्ज्ञ डॉ. एरिक बर्ग यांच्या मते, अगदी अल्पकाळासाठी ‘शुगर डिटॉक्स’ केल्याने शरीर, त्वचा आणि मेंदूवर विलक्षण परिणाम दिसू लागतात. हे फक्त मिठाई किंवा डेझर्ट्स टाळण्याबद्दल नाही, कारण नाश्त्याचे सीरियल, फळांचे ज्यूस, बिस्किटं, सॉस, पांढरा ब्रेड, दही, मसाला ओट्स आणि अगदी काही नमकीन पदार्थांमध्येही साखर लपलेली असते. चला पाहूया फक्त दोन आठवड्यांत साखर सोडल्यावर शरीरात नेमकं काय घडतं…

साखर बंद केल्यावर शरीरात काय घडतं?

१. मेंदूतील ‘क्रेविंग मॉन्स्टर’ शांत होतो

साखर खाल्ल्यावर मेंदूत डोपामाइन नावाचं ‘फील-गुड’ केमिकल झपाट्याने वाढतं, म्हणूनच ती व्यसनासारखी वाटते. पण, फक्त दोन आठवडे साखर बंद केली की डोपामाइन रिसेप्टर्स स्थिर व्हायला लागतात, त्यामुळे गोड खाण्याची तीव्र इच्छा कमी होते. म्हणजे मन मजबूत झालं म्हणून नाही, तर मेंदूच शांत होतो.

२. वारंवार भूक लागणं थांबतं

साखर खाल्ल्यानंतर इन्सुलिन वारंवार वाढतं आणि त्यामुळे शरीराला वारंवार भूक लागते. पण, साखर बंद केली की इन्सुलिनची पातळी संतुलित होते, शरीर जास्त वेळ ऊर्जावान राहतं आणि नाश्त्यानंतर थेट दुपारपर्यंत भूक लागत नाही.

३. ऊर्जा होते नैसर्गिक आणि टिकाऊ

साखरेमुळे मिळणारी ऊर्जा अल्पकाळ टिकते आणि नंतर अचानक कमी होते. पण जेव्हा साखर सोडली जाते, तेव्हा शरीर चरबी जाळून ऊर्जा निर्माण करायला शिकतं जी अधिक स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारी असते. दुपारच्या झोपेचा कंटाळा कमी होतो आणि दिवसभर उत्साह टिकतो.

४. वजन कमी होऊ लागतं, तेही न खाताना त्रास न होता

डॉ. बर्ग सांगतात की, साखरेमुळे शरीरात पाणी धरलं जातं, त्यामुळे साखर सोडल्यावर सर्वात आधी ब्लोटिंग म्हणजे सूज कमी होते. इन्सुलिन कमी झाल्याने फॅट बर्निंग सुरू होतं, विशेषतः कंबरेभोवतीचा चरबीचा थर घटतो. भूक स्थिर राहिल्याने वजन आपोआप कमी होतं, डाएटिंगची गरजच राहत नाही.

५. त्वचा बनते तेजस्वी, जणू काही स्पा ट्रीटमेंट घेतल्यासारखी

साखर कोलेजन नष्ट करते आणि त्वचेवर ग्लायकेशन नावाची प्रक्रिया घडवते, ज्यामुळे चेहरा निस्तेज, कोरडा आणि वृद्ध दिसू लागतो. पण, साखर सोडल्यावर त्वचेचं दुरुस्तीचं काम सुरू होतं. दोन आठवड्यांत पिंपल्स कमी होतात, डोळ्यांखालील सूज कमी होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक उजळपणा दिसू लागतो.

६. विचार होतो अधिक स्पष्ट, मेंदूचा धूसरपणा नाहीसा

साखरेमुळे येणाऱ्या शुगर क्रॅशमुळे अनेकांना ‘ब्रेन फॉग’ म्हणजे विचारांमध्ये धुसरपणा जाणवतो. पण, साखर बंद केल्यावर मेंदूला चरबीपासून तयार होणारी केटोन ऊर्जा मिळते, त्यामुळे लक्ष केंद्रित होतं, स्मरणशक्ती सुधारते आणि मूड स्विंग्स कमी होतात.

७. शरीरातील सूज, वेदना आणि थकवा कमी होतो

साखर म्हणजे इन्फ्लेमेशनचं प्रमुख कारण. ती संधिवात, त्वचेवरील पुरळ आणि अंगदुखी वाढवते. पण, साखर टाळल्यावर रक्तातील सूज निर्माण करणारे घटक कमी होतात. फक्त दोन आठवड्यांत डोकेदुखी, सांधेदुखी आणि सूज कमी झाल्याची जाणीव अनेकांना होते; जणू शरीरात एक नवीन शांतता निर्माण झाल्यासारखं वाटतं.

थोडक्यात सांगायचं तर साखर सोडणं म्हणजे शिक्षा नाही, तर शरीराला दिलेली सर्वात मोठी भेट आहे. फक्त दोन आठवडे स्वतःवर प्रयोग करा… आणि बदल स्वतः अनुभवा.