तुम्ही कधी दुर्बीण वापरली आहे का? दुर्बीणीच्या लेन्स अॅडजेस्ट करुन तुम्हाला दूरच्या वस्तू जवळ दिसतात. मात्र आता शास्त्रज्ञांनी एक भन्नाट लेन्स तयार केली आहे. केवळ डोळ्यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या लेन्स दोनदा पापण्या मिटल्यावर झूम इन आणि झूम आऊट करु शकतात. म्हणजेच डोळे उघडून बंद केल्यानंतर लांबची वस्तू जवळ आणि जवळची लांब दिसू शकते.

अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामधील वैज्ञानिकांनी या भन्नाट कॉनटॅक्ट लेन्स तयार केल्या आहेत. ‘द इंडिपेंडट’ने दिलेल्या वृत्तानुसार आजपर्यंत केवळ रोबोट्समध्ये अशाप्रकारे डोळ्यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या प्री प्रोग्राम लेन्स वापरल्या जायच्या. मात्र आता कॅलिफोर्नियामधील सॅन डियागो येथील वैज्ञानिकांनी मानवी डोळ्यांमधील नैसर्गिक इलेक्ट्रीक सिग्नलवर काम करणाऱ्या या लेन्स तयार करण्यात यश मिळवले आहे.

डोळ्यामधील इलेक्ट्रो ऑक्युलोग्राफी सिग्नल्सच्या माध्यमातून या लेन्सवर नियंत्रण मिळवता येणार आहे. आपले डोळे बंद असतानाही डोळ्यांमध्ये एक नैसर्गिक इलेट्रीक चार्ज असतो, याचाच वापर करुन डोळ्यांच्या हलचालींच्या माध्यमातून या लेन्सवर नियंत्रण ठेवता येणार आहे. याबद्दल या संशोधकांपैकी एक असणाऱ्या शांगचॅन यांनी ‘न्यू सायन्टीस्ट’ या वेबसाईटशी चर्चा केली. ‘अनेकदा तुम्ही डोळे बंद केल्यानंतर डोळ्यांमधील बुबळं फिरवू शकतात. याच हलचालीमधून इलेक्ट्रो ऑक्युलोग्राफी सिग्नल्स तयार होतात,’ असं शांगचॅन म्हणाले. पॉलीमरपासून बनवण्यात आलेल्या या लेन्सवर डोळ्यातील हे इलेक्ट्रीक सिग्नल पडल्यास त्या प्रसरण पावतात. डोळ्याच्या आजूबाजूला असणाऱ्या पाच महत्वाच्या स्थायूंच्या माध्यमातून या लेन्सच्या प्रसरणावर नियंत्रण ठेवले जाते.

‘अॅडव्हान्सड फंक्शनल मटेरियल्स’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार या लेन्स ‘नियर व्हिजन मोड’ म्हणजेच जवळचं पाहण्यासाठी आणि ‘डिस्टंस व्हिजन मोड’ म्हणजेच लांबचं पाहण्यासाठी अशा दोन प्रकारे वापरता येतात. विशेष केवळ दोनदा डोळे बंद करुन उघडले की फोकल लेंथ बदलल्याने लेन्स एका मोडवरुन दुसऱ्या मोडवर जातात. बुबुळांच्या हलचालीनुसार हे मोड निवडले जाऊ शकतात असंही ‘अ बायोमीमीटीक सॉफ्ट लेन्सेस कंट्रोल्ड बाय ऑक्युलोग्राफीक सिग्नल्स’ या नावाने प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये म्हटलं आहे. ‘डोळ्यांच्या चारी दिशेने होणाऱ्या हलचालींच्या मदतीने लेन्सवर नियंत्रण मिळवता येते. तर डोळे उघड बंद केल्याने लेन्सची फोकल लेंथ बदलल्याने वस्तू जवळ अथवा दूर दिसता,’ असं या लेखात नमूद करण्यात आलं आहे.

भविष्यामध्ये हेच तंत्रज्ञान वापरून डोळ्यांच्या हलचालीवर काम करणारे कॅमेरा किंवा कृत्रिम डोळे तयार करण्यात यश मिळेल अशी अपेक्षा शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. १८८७ पासून सुरु झालेला कॉनटॅक्ट लेन्सेसचा वापर या नवीन शोधामुळे एका मोठ्या टप्प्यावर येऊन पोहचला आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.