Dhanteras 2025: दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात, आनंदाने सर्वजण साजरा करत आहेत. धनत्रयोदशीच्या सोने आणि चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. सोने आणि चांदी खरेदी केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते असं मानले जाते. मात्र, सोन्या-चांदीची खरेदी म्हटलं की मोठी आर्थिक गुंतवणूक आली. तेव्हा जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खरेदीवेळी या काही टिप्स नक्की लक्षात ठेवा.
स्वत: सोन्या-चांदीचा रेट तपासा
धनत्रयोदशीला सोने आणि चांदीचे दर शहरानुसार बदलतात. बाजारात जाण्यापूर्वी २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर व्यवस्थित जाणून घ्या. तसंच चांदीचा दरदेखील जाणून घ्या. अनेकदा दुकानदार जास्त दराने विक्री करतात.
खरेदीनंतर बिल घ्या
बऱ्याचदा लहान दुकानांमधून सोने आणि चांदी खरेदी केली जाते आणि बिल घेणे काहींना गरजेचे वाटत नाही. मात्र, ही तुमची मोठी चूक ठरू शकते. सोने आणि चांदीचे बिल हे या वस्तूंच्या शुद्धतेचा आणि वजनाचा पुरावा आहे.
चांदीचा दर्जा तपासा
सरकारने चांदीची नवीन हॉलमार्किंग प्रणाली सुरू केली आहे. चांदीच्या शुद्धतेचे सात स्तर आहेत, ज्यामुळे चांदीची शुद्धता कळते. म्हणून तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणत्याही दर्जाच्या चांदीची खरेदी करू शकता. प्रत्येक दर्जाबद्दल माहितीसाठी तुमच्या व्यापाऱ्याचा सल्ला घ्या.
हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा
जर तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करत असाल तर नेहमी हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा. हॉलमार्क सोने आणि चांदीच्या शुद्धतेची हमी देतात. दागिन्यांवर BIS चिन्ह असणे आवश्यक आहे.