Early Warning Signs of Cancer: “सायलेंट किलर” म्हणून ओळखला जाणारा स्वादुपिंडाचा कॅन्सर (Pancreatic Cancer) हा अत्यंत धोकादायक आणि झपाट्याने वाढणारा आजार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणं फारशी दिसत नाहीत, त्यामुळे त्याचा शोध उशिरा लागतो. एकदा हा कॅन्सर वाढू लागला की तो पोटातील इतर अवयवांपर्यंत वेगाने पसरतो.

वैद्यकीय तज्ज्ञांनी आता असा धक्कादायक खुलासा केला आहे की, या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं तोंडात किंवा पोटात नव्हे, तर ‘पायांमध्ये’ दिसू शकतात, त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या छोट्या-छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

पायातील ही चिन्हं कॅन्सरचे संकेत देऊ शकतात!

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर पायात सतत वेदना, सूज, लालसरपणा किंवा उष्णता जाणवत असेल आणि त्याचे कारण समजत नसेल, तर हे स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे आरंभीचे संकेत असू शकतात. पायांमध्ये रक्ताच्या गाठी (Deep Vein Thrombosis – DVT) तयार होण्याची शक्यता या कॅन्सरमुळे वाढते. शरीरातील रक्तप्रवाहावर याचा परिणाम होतो आणि त्यामुळे पाय सूजतात, दुखतात किंवा गरम वाटतात.

१. सततची पायदुखी किंवा जडपणा:

जर पायांमध्ये सतत वेदना होत असेल, विशेषतः चालताना किंवा आरामात बसल्यावर, तर ते रक्ताच्या गाठीचं लक्षण असू शकतं.

२. अचानक सूज येणे:

एका किंवा दोन्ही पायांत अचानक सूज आल्यास आणि ती सहज जात नसेल तर रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाला असण्याची शक्यता असते.

३. लालसरपणा किंवा त्वचेचा रंग बदलणे:

त्वचेचा भाग लाल, गरम किंवा ताठर वाटू लागला तर तो शरीरात दाह किंवा संसर्ग वाढत असल्याचे संकेत असू शकतो.

४. पायांमध्ये उष्णता जाणवणे:

जर पाय गरम, जळजळीत वाटत असतील तर ती शरीरात सुरू असलेल्या सूज किंवा रक्तगाठीची प्रतिक्रिया असते.

ही लक्षणं दुर्लक्ष केल्यास धोका वाढतो!

तज्ज्ञांच्या मते, या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आजार ओळखण्यात विलंब होतो आणि उपचार कठीण बनतात. स्वादुपिंडाचा कॅन्सर बहुधा शेवटच्या टप्प्यावरच आढळतो, म्हणूनच त्याला “सायलेंट किलर” म्हटलं जातं.

इतर सुरुवातीची लक्षणं अशी ओळखा:

  • पोटात किंवा पाठीमध्ये सतत वेदना
  • डोळे आणि त्वचा पिवळी होणे (कावीळ)
  • अचानक वजन कमी होणे आणि भूक न लागणे
  • मळमळ किंवा उलट्या होणे

सावध राहा आणि तपासणी करा!

तज्ज्ञ सांगतात, शरीरात कोणताही असामान्य बदल जाणवल्यास, विशेषतः पायांशी संबंधित असे संकेत दिसल्यास, तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या. स्वादुपिंडाचा कॅन्सर लवकर ओळखला तर उपचार शक्य आहेत आणि जगण्याची शक्यता वाढते.

लक्षात ठेवा:

पायातील सूज, वेदना किंवा लालसरपणा हे फक्त थकव्याचं लक्षण नसून, गंभीर आजाराच्या आरंभीचे संकेत असू शकतात. वेळेत तपासणी करा, कारण “सायलेंट किलर” शरीरात शांतपणे काम करतो आणि वेळ गेली तर पश्चात्ताप उरतो.