Early Signs of Cervical Cancer: महिलांच्या शरीरात एक असा आजार शांतपणे वाढत असतो… कोणताही मोठा आवाज नाही, कुठलाही अचानक झटका नाही, पण आतून शरीर कुरतडत नेणारा सायलेंट किलर. होय… हा आजार म्हणजे गर्भाशयमुखाचा कर्करोग. हा कर्करोग इतका धोकादायक आहे, कारण तो सुरुवातीला कोणतेही ठसठशीत लक्षण देत नाही. शरीर हलक्या संकेतांनी ओरडत असते, पण बहुतेक वेळा महिलांचे लक्ष तिकडे जात नाही आणि हेच दुर्लक्ष भविष्यात मोठी आपत्ती बनू शकते.

गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयातील स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सभ्यता गुप्ता सांगतात, “गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा वेळीच शोध लागला तर तो पूर्णपणे बरा करता येतो!” मात्र, समस्या हीच… महिलांमध्ये या आजाराबद्दल जागरूकता अत्यंत कमी. म्हणूनच दरवर्षी १ लाख २७ हजारांपेक्षा अधिक नवीन रुग्ण समोर येतात.

गर्भाशयमुखाचा कर्करोग म्हणजे काय? तो होतो कसा?

हा कर्करोग गर्भाशयाच्या खालच्या भागात ज्याला गर्भाशयमुख म्हणतात इथे सुरू होतो. सुरुवातीला पेशींमध्ये सूक्ष्म बदल घडतात. हे बदल म्हणजे भविष्यकाळातील कर्करोगाची पहिली पायरी! या बदलांचे मूळ कारण बहुतेकवेळी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) हा संक्रमणजन्य विषाणू असतो. हा विषाणू एकदा शरीरात प्रवेशला की गर्भाशयमुखाच्या पेशींमध्ये असामान्य वाढ करू लागतो.

तज्ज्ञांच्या मते, खालील कारणांमुळे धोका प्रचंड वाढतो

  • असुरक्षित लैंगिक संबंध
  • वारंवार संसर्ग किंवा सूज
  • अतिशय कमजोर रोगप्रतिकारक शक्ती
  • दीर्घकाळ स्टेरॉइड औषधांचे सेवन
  • धूम्रपान
  • आणि अनुवांशिक कारणे

आजकाल कर्करोग ‘ताबडतोब’ होत नाही. हा आजार हळूहळू आणि शांतपणे वाढतो, म्हणूनच त्याला Silent Killer म्हटले जाते.

वेळीच ओळख केली तर जीव वाचतो – कसे ओळखाल?

  • गर्भाशयमुखाचा कर्करोग ओळखण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट.
    महिलांनी २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर ३ वर्षांनी पॅप स्मिअर टेस्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. ही स्क्रीनिंग टेस्ट गर्भाशयमुखातील बदल कितीही सूक्ष्म असले तरी लगेच पकडते आणि कर्करोग होण्याआधीच त्याला रोखते.

शरीर देत असलेले धोक्याचे ‘सायलेंट सिग्नल’ – दुर्लक्ष केलं तर उशीर!

  • असामान्य योनीतील रक्तस्राव

पीरियडच्या दिवसांव्यतिरिक्त रक्तस्राव, लैंगिक संबंधानंतर रक्त येणे किंवा मेनोपॉज़नंतरही ब्लीडिंग… हे सर्व मोठे लाल संकेत

  • असामान्य योनी स्त्राव

पाण्यासारखा, दुर्गंधीयुक्त किंवा वेगळ्या रंगाचा स्त्राव… हे कर्करोगाचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.

  • पेल्विक भागात सतत वेदना

दुखणे पीरियडशी संबंधित नाही, पण सतत आहे तर ही चेतावणी नक्कीच लक्षात घ्या.

  • लैंगिक संबंधादरम्यान वेदना

बहुतांश महिला हे लक्षण सामान्य समजून दुर्लक्ष करतात… पण, हे दुर्लक्ष भविष्यात गंभीर ठरू शकतं.

  • अचानक पीरियड पॅटर्न बदलणे

जड रक्तस्राव, लांब चालणारे पीरियड्स किंवा अचानक अनियमितता यामागे गंभीर कारणे लपलेली असू शकतात.

गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून बचाव – तुमच्या हातात!

  • HPV लस या विषाणूपासून सर्वोत्तम संरक्षण.
  • दर ३-५ वर्षांनी पॅप स्मिअर आणि HPV टेस्ट.
  • सुरक्षित लैंगिक संबंधांचे पालन.
  • शरीरातील लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे.
  • कोणतेही अनियमित बदल दिसले की तात्काळ तपासणी.

शेवटी एक महत्त्वाची गोष्ट…

गर्भाशयमुखाचा कर्करोग हा वैज्ञानिक भाषेत जरी ‘कर्करोग’ असला, तरी वेळेवर ओळखल्यास हा टाळता येण्यासारखा आणि पूर्ण बरा होऊ शकणारा आजार आहे. शरीर तुमच्याशी बोलतं… फक्त त्या संकेतांना दुर्लक्ष करू नका!