High Blood Pressure Symptoms: उच्च रक्तदाब (हाय ब्लडप्रेशर) किंवा हायपर टेन्शन ही एक अशी आरोग्य समस्या आहे, जिला सायलेंट किलर म्हटलं जातं. चुकीचं आहारपद्धती, बिघडलेला जीवनशैली, सततचा ताणतणाव आणि काही वैद्यकीय कारणं या त्रासाला आमंत्रण देतात. उच्च रक्तदाबाची सर्वांत मोठी धोकादायक बाब म्हणजे तो शरीरातील अनेक महत्त्वाचे अवयव हळूहळू, कोणतीही लक्षणं न देता खराब करतो. विशेषतः हृदयावर याचा घातक परिणाम होतो. जीवनशैली आणि आहारात बदल करून, तसेच योग्य ती काळजी घेऊन, या आजाराला नियंत्रणात ठेवता येतं.

जेव्हा रक्तदाब सतत जास्त राहतो, तेव्हा रक्तवाहिन्यांवर प्रचंड दबाव पडतो. त्यामुळे धमन्यांच्या भिंती जाड, अरुंद व कडक होतात आणि रक्तप्रवाहात अडथळा जातो. परिणामी शरीरातील अवयवांना ऑक्सिजन व पोषणाची पुरवठा कमी होतो. हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे हृदयाचा आकार वाढतो आणि हृदयविकाराचा झटका, हृदय निकामी होणे किंवा कोरोनरी आर्टरी डिसीजचा धोका निर्माण होतो.

परळ येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार-इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. समीर व्ही. पगड म्हणाले की, जर उच्च रक्तदाबाची काही मूक चेतावणी देणारी चिन्हे समजून घेतली, तर या आजाराचा धोका टाळता येतो. उच्च रक्तदाबामुळे शरीराच्या कोणत्या भागांना नुकसान होऊ शकते ते जाणून घेऊ.

उच्च रक्तदाबाची गुपचूप शिकार होणारे पाच अवयव

१. हृदय (Heart)

सततचा उच्च रक्तदाब हृदयाच्या स्नायूंना जाड करतो. त्यामुळे पंपिंग क्षमता कमी होते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. धमन्यांमध्ये ब्लॉकेज होण्यामागे हेच कारण असतं.

२. किडनी (Kidney)

दीर्घकाळ उच्च रक्तदाब राहिल्यास मूत्रपिंड निकामी होऊ शकते. लघवीत प्रथिने आल्यास ही स्थिती गंभीर ठरते.

३. मेंदू (Brain)

ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. मेंदूतील नस ब्लॉक झाली किंवा ती फुटली, तर ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो आणि मेंदूतील पेशी मरू लागतात.

४.डोळे (Eyes)

डोळ्यांतील सूक्ष्म रक्तवाहिन्या फुटतात किंवा अरुंद होतात आणि त्यामुळे दृष्टी धूसर होते.त्यामुळे कधी कधी अंधत्व येऊ शकते.

५. फुप्फुसे (Lungs)

फुप्फुसांच्या धमन्यांवरील दबाव वाढून ‘पल्मोनरी हायपर टेन्शन’चा त्रास होतो. श्वास घेण्यास त्रास, थकवा आणि छातीत वेदना जाणवतात.

बचावाची उपाययोजना

  • नियमित रक्तदाबाची तपासणी करा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या.
  • मीठ आणि जास्त चरबीयुक्त अन्न टाळा; फळे, भाज्या जास्त खा.
  • दररोज चालणे, योग किंवा हलका व्यायाम करा.
  • तणाव टाळा आणि पुरेशी झोप घ्या.

लक्षात ठेवा: उच्च रक्तदाब दिसायला साधा वाटतो; पण हा शांतपणे शरीराच्या आत विध्वंस घडवणारा रोग आहे. वेळेत पावले उचला, नाही तर परिणाम भयंकर होऊ शकतात.