Long time seating vs Smoking habits: धूम्रपान हे आरोग्यासाठी धोकादायक तर आहेच, मात्र बरेच लोक शारीरिक निष्क्रियतेच्या काही महत्त्वाच्या धोक्यांकडे दुर्लक्ष करतात. जेवणानंतर फिरायला जाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. मात्र, जेवण झाल्यानंतर लगेच बसल्याने तुमच्या ह्रदयाच्या आरोग्याला धूम्रपानापेक्षाही जास्त मोठे नुकसान होऊ शकते पण हे खरं आहे का? यावर काही ह्रदयरोग तज्ज्ञांनी याबाबत त्यांचे मत व्यक्त केले आहे.
किमशेल्थ त्रिवेंद्रम इथल्या कार्डिओलॉजी विभागाचे सल्लागार डॉ. दिनेश डेव्हिड यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “जेवणानंतर लगेच बसणे हे तुमच्या धमन्यांसाठी धूम्रपानापेक्षा वाईट आहे असं सांगणारे पुरावे तर नाहीत. खरं तर शारीरिक हालचालीशिवाय दिवसातून ८ तासांपेक्षा जास्त वेळ बसणे हे खूपच वाईट आहे. कारण त्यामुळे धूम्रपानासारखेच ह्रदयरोगाचे धोके उद्भवतात.”
“उभे राहून किंवा चालण्यापेक्षा बसून चयापचय जवळपास ३० टक्क्यांनी कमी होते. यामुळे वजन वाढू शकते आणि धमन्यांमध्ये चरबी जमा होऊ शकते. त्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस होऊ शकतो”, असे त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी सांगितले की, घरून काम करणारे व्यावसायिक बहुतेकदा बराच वेळ सलग बसून राहतात. त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली मर्यादित होतात आणि चयापचय बिघडलेले कार्य, लठ्ठपणा, बिघडलेले ग्लुकोज सहनशीलता आणि जळजळ होते. हे सर्व ह्रदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचे पूर्वसूचक आहेत.
जास्त वेळ बसल्याने काय होते?
फरीदाबाद इथल्या अमृता हॉस्पिटलअंतर्गत औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मोहित शर्मा यांनीही दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, संशोधनातून असे दिसून आले की दिवसातून ६ ते ८ तासांपेक्षा जास्त वेळ बसल्याने अकाली मृत्यूचा धोका वाढतो. त्यांनी अॅनाल्स ऑफ इंटरनल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या मेटा-विश्लेषणाचा उल्लेख केला. दीर्घकाळ बसल्याने सर्व कारणांमुळे होणारे मृत्यूदर, ह्रदयरोग, कर्करोग आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका जास्त असतो. डॉ. शर्मा यांनी सांगितले की, दिवसातून ८ तासांपेक्षा जास्त वेळ बसल्याने मृत्यूदरात ३४ टक्के वाढ होते, तर दररोज सिगारेट ओढल्याने धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत ह्रदयरोगाचा धोका सुमारे ४० ते ५० टक्के वाढतो.
धूम्रपान केल्याने तात्काळ आणि गंभीर आरोग्य परिणाम होतात, तर दीर्घकाळ बसल्याने दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवतात. दोन्ही आरोग्याला हानीकारकच ठरते. आणखी एक मोठी समस्या म्हणजे दीर्घकाळ शारीरिक निष्क्रियतेमुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल, ज्याला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात त्यात वाढ होणे. वाढलेले एलडीएल कोलेस्ट्रॉल ह्रदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांसाठी एक प्रमुख घातक घटक आहे. जास्त वेळ बसून राहिल्याने स्नायू कडक होतात. रक्ताभिसरण कमी होते.
जास्त वेळ बसणं कसं टाळू शकता?
“तुमचे काम कितीही महत्त्वाचे असले तरी दर दोन तास बसल्यानंतर हालचाल करणे महत्त्वाचे आहे. किमान १५ मिनिटे फिरायला जा. तुम्ही उठून पाण्याची बाटली भरू शकता. तुमची पाठ आणि पाठीचा कणा सरळ राहील याची काळजी घ्या. हालचाल न केल्याने मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रेरणा कमी होते, लक्ष केंद्रित करण्यात समस्या येते आणि चिंता निर्माण होते”, असे डॉ. शर्मा यांनी सांगितले.