रिलायंस जिओने काही दिवसांपूर्वीच आपल्या ग्राहकांना नॉन-जिओ कॉलिंगसाठी दणका देणारा निर्णय घेतला. जिओव्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या क्रमांकावर फोन केल्यास सहा पैसे प्रति मिनिट IUC (इंटरकनेक्ट युजेस चार्ज) दर आकारण्याची घोषणा जिओने केली. त्यानंतर व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल यांसारख्या कंपन्यांकडून जिओला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला. त्यावर आता जिओनेही सोशल मीडियाद्वारे आपल्या विरोधकांवर निशाणा साधला आहे.

एकामागोमाग केलेल्या अनेक ट्विट्समध्ये रिलायंस जिओने व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलवर निशाणा साधला आहे. सहा पैसे प्रतिमिनिट दर आकारण्यासाठी याच कंपन्यांना जिओने जबाबदार ठरवलं आहे. ‘6 पैसे/मिनिट आम्ही मागत नाहीत, तर ते मागत आहेत’ असं ट्विट जिओने केलं आहे.

या तिन्ही कंपन्यांवर निशाणा साधण्यासाठी जिओने वेगवेगळे तीन फोटो ट्विट केलेत. प्रत्येक ट्विटमध्ये त्या कंपनीशी संबंधित रंग आणि त्याप्रमाणेच टॅगलाइनचा वापर करण्यात आला आहे. आयडियाला लक्ष्य करताना ‘6 पैसे/मिनिट…अशी Idea का सरजी ?’ या फोटोसह कॅप्शनमध्ये ‘झिरो IUC, ही Idea तुमचं जीवन बदलू शकते’ असं लिहिलं आहे.

तर, एअरटेलसाठी जिओने लाल रंगाचा फोटो पोस्ट करुन त्यावर, ‘6 पैसे/मिनिट… Air Toll’ असं लिहिलंय. तसंच व्होडाफोनला देखील जिओने अशाचप्रकारे खोचक टोमणा मारला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे IUC चार्ज :- 
IUC म्हणजे इंटरकनेक्ट युजेस चार्ज. ‘ट्राय’कडून दुसऱ्या नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या कॉल्ससाठी 6 पैसे प्रतिमिनिट आययूसी चार्ज निश्चित करण्यात आला आहे. हा दर आउटगोइंग कॉल करणाऱ्या ऑपरेटरला कॉल उचलणाऱ्या ऑपरेटरला द्यावा लागतो. उदाहरण म्हणजे जर एखाद्या जिओ युजरने व्होडाफोनच्या नंबरवर कॉल केल्यास जिओला 6 पैसे प्रतिमिनिट दराने व्होडाफोनला पैसे द्यावे लागतील.