Winter Skincare Routine : हिवाळा सुरू होताच त्वचेचा मुलायमपणा कमी होऊन त्वचा रुक्ष होते. थंडीत पाण्यात खूप वेळ राहिल्याने किंवा मातीमुळे पायांच्या टाचांना भेगा पडतात. अनेकदा टाचांमधून रक्त येऊ लागते आणि चालताना खूप त्रास होतो. अशावेळी तुम्ही बऱ्याच क्रीम, औषधांचा वापर करता, पण तेवढ्यापुरतं बरं वाटतं. मात्र, हा त्रास काही दिवसांनी पुन्हा सुरू होतो. अशा परिस्थितीत टाचांना भेगा पडू नयेत असे वाटत असेल तर थंडी पडण्याच्या आधीपासूनच पायांची काळजी घेणे सुरू करा.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेरून आल्यानंतर पाय स्वच्छ धुवा. मातीपासून पायांचे संरक्षण करा. अशावेळी थंडीत पायांची काळजी घेण्यासाठी खालील काही सोपे घरगुती उपाय फॉलो करा.
१) गरम पाण्यापासून दूर राहा
हिवाळ्यात अनेकांना गरम पाण्याने अंघोळ करायला आवडते. गरम पाण्याने अंघोळ करणे खूप आरामदायी असले तरी ते त्वचेसाठी खूप वाईट मानले जाते. कारण यामुळे त्वचा निर्जीव होते. मृत त्वचेपासून मुक्त होण्यासाठी कोमट पाण्याने अंघोळ करा, कोमट पाणी पाय स्वच्छ करण्यासाठीदेखील चांगले आहे.
२) क्लिंझरचा करा वापर
हिवाळ्यात पायांच्या टाचा स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हाला रुटीनमध्ये काही बदल करावे लागतील. उदाहरणार्थ, टाचा स्वच्छ करण्यासाठी फूट क्लीन्सर वापरा. नॅचरल क्लीन्सर वापरण्याचा प्रयत्न करा, ज्यामध्ये केमिकलचे प्रमाण कमी असते.
३) फूट क्रीमचा वापर करा
टाचा स्वच्छ केल्यानंतर चांगल्याप्रकारे मॉइश्चराइज्ड करा. टाचांमध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी फूट क्रीम वापरा. यामुळे टाचांभोवतीची त्वचादेखील मॉइश्चरायझ राहते. दररोज अंघोळीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून मग फूट क्रीम, लोशन किंवा मॉइश्चरायझर क्रीम लावा.
४) मोजे वापरा
थंडीत पायांच्या संरक्षणासाठी सुती मोजे वापरा. यामुळे पाय धूळ आणि मातीच्या संपर्कात येणार नाहीत.