रंगांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱया होळी सणाची देशभर जोरदार तयारी सुरू आहे. लठमार होळीला तर याआधीच सुरूवातही झाली आहे. परंतु, सध्याच्या रसायनयुक्त जगात धुळवड, रंगपंचमीत रायायनिक रंगांपासून त्वचा आणि केसांची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे कोणताही त्रास न होता जल्लोषात होळी साजरी करण्यासाठी काही खास टिप्स..
त्वचेबद्दल काही महत्वाच्या टिप्स-
१. मोहरीचे तेल, खोबरेल तेल, ऑलिव तेल किंवा जमल्यास वॅसलिन त्वचेला लावून होळी खेळावी. यामुळे शरिरावर लागलेले रंग लवकर धुवून निघण्यास मदत होते. तसेच शक्यतो संपूर्ण शरिर झाकले जाईल असे कपडे परिधान करून होळी खेळावी.
२. धुळवड खेळताना नैसर्गिक रंग वापरण्यावर भर द्यावा आणि त्याबद्दल जनजागृतीही करावी. हर्बल, हळद, चहा पाने, हिना, झेंडू फुले यांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग बाजारात उपलब्ध आहेत. अशा नैसर्गिक रंगांचा वापर करावा
३. धुळवड खेळून घरी परतल्यावर भरपूर पाणी प्यावे. त्यामुळे रंगउधळीत चुकून शरिरात गेलेले रासायनिक पदार्थांची बाधा शरिराला होणार नाही.
४. शरिरावरील गुलाल साफ करण्यासाठी शक्यतो पाण्याचा वापर करू नका कारण, पाण्यामुळे गुलाल आणखी पसरतो. त्यामुळे कोरडे हात किंवा कापडाने गुलाल साफ करावा
५. त्वचेवरील रंग साफ करताना त्वचा रगडू नये. तसेच साबणा ऐवजी शक्यतो फेसवॉशचा वापर करावा
६. जर रंगामुळे त्वचेवर परिणाम झाल्याचे जाणविल्यास संबंधित त्वचेचा भाग थंड पाण्याने धुवून काढावा किंवा गरज असल्यास कॅलामायन लोशन वापरावे.
केसांची काळजी घेण्यासाठी टिप्स-
१. मुलींनी केस बांधूनच धुळवड खेळावी. तसेच मुले आणि मुली दोघांनीही धुळवड खेळण्यापूर्वी केसांना खोबरेल तेल लावावे
२. धुळवड खेळून आल्यानंतर केस कंडिशनरने धुवावे
३. धुळवड खेळून आल्यानंतर केस सौम्य शॅम्पू, लेमन ज्यूसनेच धुवावेत. एकाच आंघोळीत रंग काढून टाकण्यासाठी सारखा सारखा शॅम्पूचा वापर करू नये.