scorecardresearch

२०२० मध्ये आफ्रिका खंडातून हिवतापाचे समूळ उच्चाटन

दक्षिण आफ्रिका आणि स्वाझिलँड या सहा देशांमध्ये हिवताप या विकाराने थमान घातले आहे.

२०२० मध्ये आफ्रिका खंडातून हिवतापाचे समूळ उच्चाटन

जागतिक आरोग्य संस्थेचा दावा
कुठलाही विकार हा आफ्रिका खंडातूनच अन्य देशांमध्ये पसरतो. त्यामुळे या विकारांचे समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. आफ्रिका खंडातील सहा देशांमध्ये हिवतापाने (मलेरिया) थमान घातले असून या विकाराचे समूळ नष्ट करण्यासाठी जागतिक आरोग्य संस्थेने पावले उचलली आहेत. २०२० पर्यंत या सहा देशांमधून हिवतापाचे समूळ उच्चाटन होणार आहे, असा दावा जागतिक आरोग्य संस्थेने केला आहे.
अल्जेरिया, बोत्स्वाना, केप वर्डे, कोमोरोस, दक्षिण आफ्रिका आणि स्वाझिलँड या सहा देशांमध्ये हिवताप या विकाराने थमान घातले आहे. या देशांमध्ये हिवतापाचे असंख्य रुग्ण आहेत. त्यामुळे या देशांमधून हा विकार समूळ नष्ट करणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले.
हिवतापाच्या उच्चाटनासाठी जागतिक आरोग्य संस्थेने २०१६-२०३० या कालावधीमध्ये हाती घेतलेल्या कार्यक्रमाअंतर्गत या दशकाच्या अंती किमान १० देशांमधून हा आजार हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे, तर जागतिक आरोग्य संस्थेच्या अनुमानानुसार या आजाराचे सर्वात जास्त प्रभाव असणाऱ्या आफ्रिकेतील या सहा देशांसोबतच अन्य २१ देश तरी हे लक्ष्य करू शकतात, असे मत संस्थेच्या जीनेव्हा येथील कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेत हिवतापाच्या उच्चाटनाला प्राथमिकता देण्यात आली आहे. २००० या वर्षांत या देशामध्ये हिवतापाचे ६४,००० रुग्ण होते. आता मात्र ही संख्या रोडावली असून या देशामध्ये २०१४ रोजी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार हिवतापाचे केवळ ११,७०० रुग्ण आहेत. या देशामधील हिवतापाचे अनेक रुग्ण झिम्बाब्वे, स्वाझिलँड आणि मोझांबिक या देशांच्या सीमाभागातील आहेत. दक्षिण आफ्रिकेतून हिवतापाचे समूळ उच्चाटन करण्याकरिता पावले उचलण्यात आली असून २०२० पर्यंत हा देश हिवतापमुक्त होईल, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. चीन, नेपाळ, मलेशिया, दक्षिण कोरिया, कोस्टा रिका, मेक्सिको, अर्जेटिना, पॅराग्वे, इक्वेडोर आदी देशांमध्येही जागतिक आरोग्य संघटना हिवताप निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेणार आहे. गेल्या वर्षी जगभरात २१ कोटी ४० लाख रुग्णांना हिवतापाची लागण झाली होती, असे जागतिक आरोग्य संस्थेचा अहवाल सांगतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-04-2016 at 05:17 IST
ताज्या बातम्या