Spinal TB Symptoms: आजच्या काळात अस्वस्थ जीवनशैली आणि शारीरिक हालचालींच्या कमतरतेमुळे कमी वयातच लोक अनेक आजारांनी त्रस्त होत आहेत. आजकाल कमी वयातच लोकांची हाडं कमजोर होत आहेत, ज्यामुळे उठण्या-बसण्यात त्रास होतो. दरवर्षी १६ ऑक्टोबरला “जागतिक मणक्याचा दिवस” साजरा केला जातो, ज्यामधून लोकांना पाठीच्या कण्याच्या आरोग्याबद्दल जागरूक केले जाते.
पाठीचा कणा हा आपल्या शरीराचा आधार आहे, जो आपल्याला सरळ उभं राहायला, चालायला आणि वाकायला मदत करतो. पण, जेव्हा या कण्याला टीबीचा संसर्ग होतो, तेव्हा ती एक गंभीर स्थिती बनते. याला “स्पायनल टीबी” किंवा “पॉट्स डिसीज” असं म्हणतात. डॉक्टरांच्या मते, जर हा आजार वेळेत ओळखला आणि उपचार केला नाही, तर तो लकव्याचं कारणही बनू शकतो.
स्पायनल ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय?
स्पायनल टीबी तेव्हा होतो, जेव्हा टीबीचे जंतू फुप्फुसांमधून किंवा शरीराच्या दुसऱ्या भागांतून रक्ताद्वारे पाठीच्या कण्यापर्यंत पोहोचतात. हा संसर्ग हळूहळू हाडं कमजोर करतो, ज्यामुळे तीव्र वेदना, पाठीला पोक येणे आणि कधी-कधी पायात कमजोरी किंवा मुंग्या येऊ शकतात.
हेल्थ एक्स्पर्ट डॉ. गिरी यांच्या मते, अशी चार मुख्य लक्षणं किंवा स्थिती आहेत, जी वेळेत ओळखली नाहीत तर व्यक्तीला स्पायनल टीबी होण्याचा धोका वाढतो.
उपचार न केलेला फुप्फुसांचा टीबी
टीबीचा आजार बहुतेक वेळा फुप्फुसांपासून सुरू होतो. जर फुप्फुसांच्या टीबीचा उपचार अर्धवट राहिला किंवा औषधं मध्येच थांबवली, तर हा संसर्ग रक्ताद्वारे पाठीच्या कण्यापर्यंत पोहोचू शकतो. टीबीचे जंतू पाठीच्या हाडांच्या सांध्यांना नुकसान पोहोचवतात, ज्यामुळे हालचाल कमी होते, नसांवर ताण येतो आणि तीव्र पाठदुखी किंवा पायात कमजोरी अशी लक्षणं दिसू लागतात.
वारंवार होणारे संसर्ग किंवा जुने (दीर्घकालीन) आजार
कधी कधी शरीरात हलका ताप, थकवा किंवा अचानक वजन कमी होणं हे एखाद्या लपलेल्या संसर्गाचं लक्षण असू शकतं. डॉ. गिरी यांच्या मते, लिम्फ नोड, मूत्रपिंड किंवा पोटात असलेले टीबीचे जंतू रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यावर पुन्हा सक्रिय होऊ शकतात. जर खूप दिवसांपासून थकवा, भूक न लागणं किंवा ताप असं काही होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या, म्हणजे लपलेला संसर्ग वेळेत थांबवता येईल.
हाडं किंवा सांध्यांकडे दुर्लक्ष केलेला टीबी
बरेच लोक हाडं किंवा सांध्यांमधला सततचा त्रास सामान्य समजून दुर्लक्ष करतात, पण हे हाडांच्या सुरुवातीच्या टीबीचं लक्षण असू शकतं. डॉ. गिरी यांच्या मते, जर बोन टीबीचा उपचार केला नाही, तर तोच संसर्ग पाठीच्या कण्यापर्यंत पसरू शकतो आणि स्थिती गंभीर बनू शकते. सततचा सांध्यांचा किंवा पाठीचा त्रास, सूज येणं, चालताना त्रास होणं आणि साध्या वेदनाशामक गोळ्यांनी आराम न मिळणं- ही सगळी लक्षणं या आजाराचा धोका वाढवू शकतात.
कमजोर रोगप्रतिकारक शक्ती आणि खराब आहार
कमजोर रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) हे स्पाइनल टीबीचे एक मोठे कारण आहे. ज्यांना मधुमेह (शुगर) आहे, एचआयव्ही/एड्सचे रुग्ण आहेत किंवा ज्यांच्या शरीरात पोषण व प्रोटीनची कमतरता आहे, त्यांना या आजाराचा धोका जास्त असतो. डॉ. गिरी यांच्या मते, संतुलित आहार, पुरेसं प्रोटीन आणि जीवनसत्त्वांनी भरपूर अन्न खाल्ल्याने इम्युनिटी मजबूत होते आणि टीबीसारख्या संसर्गांपासून बचाव होतो.