Home Remedies for Gas and Bloating: पचनतंत्र व्यवस्थित नसेल तर संपूर्ण शरीराची तब्येत ढासळते. कधी कधी जेवणातील छोटीशी गडबड पोटात खळबळ माजवते. अचानक पोटातून विचित्र आवाज येऊ लागतात, पोट फुगल्यासारखं वाटतं, कळा येतात… आणि क्षणभरात अस्वस्थता वाढते. अनेकदा हे गॅस, ॲसिडिटी किंवा ब्लोटिंगमुळे होतं. चुकीचं अन्न खाल्लं, फूड पॉयझनिंग झालं तरी अशी अवस्था निर्माण होते. पण, काळजी करू नका! काही सोपे घरगुती उपाय केले तर पोट लगेच सेट होईल आणि गॅस-फुगण्यापासून सुटका होईल.

गॅस आणि ब्लोटिंग का होतात?

जास्त प्रमाणात गॅस तयार झाला की पोट फुगण्याची (ब्लोटिंग) समस्या सुरू होते. पचनतंत्रातील स्नायूंमध्ये हालचालींचा अडथळा निर्माण झाला तरी गॅस अडकतो, त्यामुळे पोट फुगतं, दुखू लागतं आणि सतत अस्वस्थ वाटते.

उपाय जे देतील त्वरित आराम

१. तुळशीची पानं

पोट फुगलंय, गॅसने त्रास होतोय तर थोडीशी तुळशीची पानं चघळा. चव न आवडल्यास पानं पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या. तुळशीचा रस पोटातल्या मरोड, अतिसार आणि वेदना कमी करतो.

२. बडीशेप आणि आलं

बडीशेप आणि आलं एकत्र करून चहा तयार करा. त्यात एक चमचा मध टाकलत तर अधिक परिणामकारक ठरेल. बडीशेप पोटातील स्नायूंना रिलॅक्स करून गॅस, ॲसिडिटी आणि ब्लोटिंगपासून सुटका करते.

३. हिंग-ओव्याचं पाणी

एक कप पाण्यात पाव चमचा ओवा पावडर, अर्धा चमचा चमचा सेंधव मीठ, १ चुटकी हिंग, १ चमचा जिरं पावडर आणि चिमूटभरापेक्षा थोडं जास्त चमचा काळं मीठ मिसळा. जेवणानंतर १५ मिनिटांनी हे पाणी प्या. पोट फुगणे, गॅस आणि ॲसिडिटी ताबडतोब कमी होईल.

४. लसूण आणि मध

६ मिली लसणाचा रस काढून त्यात मध मिसळा. गॅस, ब्लोटिंग आणि पोटदुखीत हा उपाय रामबाण ठरतो.

पोटातील खळबळ, गॅस आणि ब्लोटिंगची समस्या तुमच्या दैनंदिन जीवनाला त्रासदायक ठरू शकते. पण तुळस, बडीशेप, आलं, ओवा, हिंग, लसूण आणि मधासारख्या घरगुती उपायांनी हा त्रास सहज दूर होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे या उपायांबरोबर पुरेसं पाणी प्या, कार्बोनेटेड ड्रिंक्स टाळा आणि संतुलित आहार घ्या.

थोडक्यात, पोटात खळबळ माजली तरी घाबरू नका हे उपाय करून बघा आणि काही क्षणांत मिळवा हलकंफुलकं, आरामदायी पोट.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)