Morning Bloating Remedies: अपचन, तेलकट/मसालेदार अन्न, रात्री उशिरा जेवण आणि कमी शारीरिक हालचाल यांमुळे पचनसंस्थेवर ताण येतो, ज्यामुळे सकाळी पोटात गॅस जमा होऊन पोट फुगते. या सवयींमुळे अपचन, जळजळ आणि पोट फुगण्याची समस्या होते, ज्यामुळे सकाळच्या वेळी खूप अस्वस्थ वाटते.
सकाळी उठताच पोट फुगलेलं, आतून जड झाल्यासारखं वाटणं आणि गॅसचा त्रास होणं ही समस्या आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना भेडसावते. अपचन, जास्त तेलकट किंवा मसालेदार अन्न, रात्री उशिरा जेवण व कमी हालचाल या सगळ्या सवयी पचनसंस्थेवर जबरदस्त ताण टाकतात. परिणामी सकाळीच पोटात गॅस साचतो आणि पोट फुगून जड होतं.
ही समस्या केवळ त्रासदायकच नाही, तर ती मानसिक ताणही निर्माण करते. पण, हीच समस्या काही साध्या आणि नैसर्गिक पेयांनी सहज दूर होऊ शकते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला जाणून घेऊया ‘ही’ चार जादुई पेयं, जी तुमचं पोट हलकं, मन प्रसन्न आणि शरीर ताजंतवानं करतील!
१. कोमट पाण्यात लिंबाचा रस
दररोज सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून प्या. लिंबामधील मुख्यत्वे सायट्रिक अॅसिड व मॅलिक अॅसिड ही नैसर्गिक आम्ले पचनरसांना सक्रिय करतात, ज्यामुळे गॅस कमी होतो आणि आतड्यांतील विषारी घटक बाहेर पडतात. लिंबाचे हे पेय शरीरातील मळभ, फुगलेपणा व सूज कमी करण्यात प्रभावी ठरतं. नियमित सेवन केल्यास पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोटातील जळजळ किंवा जडपणा नाहीसा होतो.
२. जिऱ्याचं पाणी – पचनाचं रामबाण औषध
जिरा हा आपल्या स्वयंपाकघरात असलेला छोटा, पण प्रभावी मसाला आहे. जिऱ्याचं पाणी पचनाशी निगडित जवळजवळ सर्व त्रासांवर उपाय आहे. एक चमचा जिरं घ्या, थोडं भाजून एक कप पाण्यात पाच ते सात मिनिटं उकळा. नंतर ते गाळून कोमट असतानाच पिण्यास घ्या. जिरं पचनाच्या एन्झाइम्सना सक्रिय करतं, त्यामुळे गॅस, फुगलेपणा व पोटदुखी यांवर झटपट आराम मिळतो.
३. आलं-तुळशीचं काढा – दुहेरी परिणाम
आलं आणि तुळस या दोन्ही वनस्पतींमध्ये मुबलक प्रमाणात औषधी घटक असतात. ताज्या आल्याचा एक छोटा तुकडा कापून, एक कप पाण्यात उकळा आणि त्यात पाच-सहा तुळशीची पानं टाका. १० मिनिटं उकळून हे पेय गाळून घ्या आणि कोमट प्या. आलं पचनक्रिया सुधारतं आणि आतड्यातील सूज कमी करतं, तर तुळस शरीरातला ताण कमी करते आणि पोट शांत ठेवते. या दोघांचं मिश्रण म्हणजे पोटदुखी, फुगलेपणा आणि अपचन यावरचा नैसर्गिक इलाज.
४. हिंगाचं पाणी – पोट हलकं करण्याचा गुप्त उपाय
हिंग हा फक्त स्वयंपाकात सुगंध वाढवणारा मसाला नाही, तर ती पचनसंस्थेसाठी ‘संजीवनी बुटी’ आहे. एका ग्लास कोमट पाण्यात एक चिमूट हिंग घालून दररोज सकाळी प्या. हिंगामध्ये असलेले विशेष घटक आतड्यात साचलेली गॅस कमी करतात आणि फुगलेपणातून तत्काळ आराम देतात. दिवसातून दोन वेळा हे पाणी घेतल्यास फरक जाणवतो.
लक्षात ठेवा
ही सर्व पेयं नैसर्गिक असून, कोणतेही दुष्परिणाम करीत नाहीत. पण, समस्या वारंवार होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
