पावसाच्या सरीं कोसळताना पाहून अनेकांना आनंद होतो. गारवा देणारी थंड-थंड हवा मनाला सुखावते, पण पावसाळा हा हंगाम अनेक आजारांचे सावट घेऊन येतो. या काळात हवामानातील आर्द्रता आणि तापमानातील चढ-उतार यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या समस्या सहजपणे उद्भवतात. पावसात भिजणे, ओले कपडे अंगावर बराच वेळ ठेवणे किंवा अचानक थंड वाऱ्याच्या संपर्कात येताच सर्दी-खोकला पटकन होतो. काही वेळा परिस्थिती इतकी गंभीर होते की सततच्या खोकल्यामुळे दम लागतो, घसा बसतो आणि व्यवस्थित बोलताही येत नाही.
या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते आणि विषाणूजन्य संसर्ग (व्हायरल इन्फेक्शन) जलदगतीने पसरते. आर्द्रतेमुळे बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य (फंगल व बॅक्टेरिया) वाढीस अनुकूल वातावरण तयार होते. पावसात भिजल्यावर शरीराचे तापमान अचानक खाली जाते, त्यामुळे इम्युनिटीवर परिणाम होतो. म्हणूनच या हंगामात रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. काही लोकांना पावसाळ्यात वारंवार सर्दी-खोकला होतो आणि सततचा खोकला खूप त्रासदायक ठरतो. जर तुम्हालाही बदलत्या हवामानात खोकला, सर्दी आणि तापाचा त्रास होत असेल, तर काही घरगुती उपाय तुमच्या मदतीला येऊ शकतात.
आयुर्वेद तज्ञ आचार्य बालकृष्ण यांच्या मते, काही देशी आणि घरगुती उपाय असे आहेत जे सर्दी-खोकला कमी करतात आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. तज्ज्ञ सांगतात, जर तुम्ही घशातील सर्दीमुळे त्रस्त असाल आणि सतत आवाज बसत असेल, तर दालचिनीचा वापर करा. दालचिनी हा असा मसाला आहे जो घशातील समस्येसाठी रामबाण उपाय आहे. चला तर जाणून घेऊया दालचिनी घशातील खरखर कशी दूर करते आणि हंगामी आजारांपासून कसा बचाव करते.
दालचिनी सर्दी-खोकल्यावर कशी काम करते?
दालचिनी हा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मसाला आहे. याच्या सेवनाने सर्दी-खोकल्यावर आराम मिळतो. दालचिनीमध्ये विषाणूरोधक (अँटी-व्हायरल), जीवाणूरोधक(अँटी-बॅक्टेरियल) आणि दाहशामक / सूज कमी करणारे(अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे शरीराला संसर्गाविरुद्ध लढायला मदत करतात.
दालचिनीतील सिनामल्डिहाइड (Cinnamaldehyde) हे घटक विषाणू आणि जीवाणूंची वाढ थांबवण्यात प्रभावी ठरतात. दालचिनी सेवनाने घशाची सूज कमी होते, खोकला, सर्दी व कफावर नियंत्रण मिळते.
ज्यांना घशाची खरखर जाणवत आहे त्यांनी एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पूड मिसळून प्यावे. हे पाणी घशाचा त्रास कमी करते, बसलेला घसा मोकळा करते आणि सर्दी-खोकल्यावर नियंत्रण ठेवते.
दालचिनीचे सेवन कसे करावे?
सर्दी-खोकल्यापासून वाचायचे असल्यास दालचिनीचा एक छोटा तुकडा चावावा. दालचिनी चघळल्याने खोकला थांबतो आणि घसा मोकळा होतो.ज्यांचा घसा बसला आहे त्यांनी दालचिणीचा तुकडा चघळल्यास फायदा होईल
१ कप गरम पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पूड आणि १ चमचा मध मिसळून प्यावे. हे पाणी गळ्याला आराम देते आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
याशिवाय दालचिनीची वाफ घेतल्याने बंद नाक आणि श्वास घेण्यातील त्रास कमी होतो.