Summer Health Tips : भयंकर उन्हाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे घराबाहेर पडणे अवघड होत आहे. अनेकांना उन्हात फिरल्यानंतर घसा कोरडा पडणे, अति घाम येणे व शरीर जळजळणे अशा समस्यांचा सामना करावा लागतोय. अशा परिस्थितीत लोक उन्हाने त्रस्त होऊन घरी पोहोचतात, तेव्हा आराम मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण, हे उपाय करताना काही चुकांमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.
उदा. गरम काचेवर पाणी टाकल्यावर तिला पटकन तडे जातात. अगदी त्याचप्रमाणे उन्हातून आल्यानंतर शरीर अगदी उष्ण झालेले असते, अशावेळी थंड पाण्याने अंघोळ केल्यास, अथवा फ्रीजमधले थंड पाणी प्यायल्यास त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यावेळी आपल्या काही सवयी उन्हाळ्यात आपल्याला आजारी पाडू शकतात. पण उन्हाळ्यात नेमक्या कोणत्या चुकीच्या सवयी बदलणे गरजेचे आहे, त्याबाबत जाणून घेऊ…
चूक क्रमांक १ – फ्रीजमधील थंड पाणी
बऱ्याचदा लोक कडक उन्हातून घरी परतताच थोडा वेळही जाऊ न देता आधी फ्रीजमधून थंड पाणी काढून पिण्यास सुरुवात करतात. असे केल्याने तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. कारण- असे केल्याने उष्ण शरीरात अचानक थंडावा निर्माण होतो.
म्हणून उन्हातून घरी आल्यानंतर शरीराचे तापमान घराच्या तापमानाएवढे स्थिर होण्याची वाट पाहा. तसेच उन्हातून आल्यानंतर थोडा वेळ एका जागी शांतपणे बसा आणि थंड पाण्याऐवजी साधे पाणी प्या.
चूक क्रमांक २ – एसीची थंड हवा
कित्येक जण दुपारच्या कडक उन्हातून घरी पोहोचताच आराम मिळविण्यासाठी लगेच एसी चालू करतात. तुम्ही ही चूक करू नका. एसीच्या थंड हवेने तुम्हाला आरामदायी वाटेल; पण त्यामुळे तुम्ही आजारी पडण्याचा धोकाही वाढेल. म्हणून जेव्हाही तुम्ही उन्हातून घरी किंवा ऑफिसमध्ये पोहोचाल तेव्हा शरीराचे तापमान सामान्य होण्यासाठी थोडा वेळ द्या आणि नंतर कूलर किंवा एसीसमोर बसा.
चूक क्रमांक ३: घरी येताच अंघोळ करणे
उन्हात फिरताना अनेकांना खूप घाम येतो. अशा वेळी लोक घरी पोहोचताच आधी बॅग ठेवून बाथरूममध्ये पळतात आणि अंघोळ करतात. पण या सवयीमुळे तुम्ही आजारी पडू शकता. कारण- जेव्हा तुम्ही कडक उन्हात फिरत असता तेव्हा तुमच्या शरीराचे तापमान खूप वाढते. अशा परिस्थितीत थंड पाण्यामुळे अंघोळ केल्यास शरीराचे तापमान अचानक कमी होते. अशाने तुमची तब्येत बिघडू शकते. तुम्हाला सर्दी होऊ शकते.
चूक क्रमांक ४: जेवायला बसणे
उन्हात खूप वेळ राहिल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. शरीरात डिहायड्रेशन झाल्यामुळे अनेकांना खूप भूक लागते. अशा परिस्थितीत लोक घरी पोहोचताच काहीतरी खायला सुरू करतात. पण, या सवयीमुळेही तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे उन्हातून घरी आल्यानंतर तुम्ही लगेच फ्रिजमधून काहीही बाहेर काढून ते खाऊ नये.