Best Formula For Sleep Quality : आजकाल अनेकांचे दैनंदिन जीवन इतके धावपळीचे झाले आहे की, त्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. कामाचा ताण, कुटुंबातील समस्या, ताणतणाव आणि वेळी-अवेळी खाणं अशा अनेक कारणांमुळे झोपेवरही परिणाम होत आहे. रोजच्या या जीवनशैलीमुळे अनेकांना झोपेसंबंधित आजारांचा सामना करावा लागतोय. अशा परिस्थितीत तुम्हाला झोपेची गुणवत्ता सुधारायची असेल आणि दिवसभर एकदम ताजेतवाने राहायचे असेल, तर तुम्ही तज्ज्ञांनी सांगितलेला १०-३-२-१ फॉर्म्युला नक्की ट्राय करू शकता. पण, हा फॉर्म्युला नेमका कसा आहे आणि तो कशा प्रकारे अमलात आणायचा याविषयी सविस्तर जाणून घेऊ..
झोपेच्या कमतरतेमुळे डोळ्यांत जळजळ वाढते आणि प्रोटेक्टिव्ह सायटोकिन्सचे उत्पादन कमी होते. अशा परिस्थितीत रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी रात्री सात ते नऊ तास झोपणे गरजेचे आहे, अशी माहिती बंगळुरूमधील इन्फंट्री रोड येथील स्पर्श हॉस्पिटलचे कन्सल्टंट न्यूरोलॉजी डॉ. निखिल बी. यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

१०-३-२-१ फॉर्म्युला नेमका कसा आहे?

१० – झोपण्यापूर्वी १० तास आधी कॅफिन सेवन बंद करा.

कॅफिन तुमच्या शरीरात १० तासांपर्यंत राहू शकते, ज्यामुळे तुमच्या झोपेच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यासाठी तुम्हाला कॉफी, चहा, सोडा आणि चॉकलेट खाणे टाळावे लागेल.

३ – झोपण्यापूर्वी तीन तास आधी खाणे बंद करा.

उशिरा जेवल्याने पचनक्रिया आणि झोपेच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी तुमच्या शरीराला अन्न प्रक्रिया करण्यासाठी वेळ द्या. असे डॉ. निखिल म्हणाले.

२ – ताण कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी दोन तास आधी काम करणे थांबवा.

कामाशी संबंधित ताण आणि मानसिक उत्तेजनामुळे आराम करणे कठीण होऊ शकते . तुमच्या मेंदूला विश्रांतीच्या स्थितीत आणण्यासाठी ऑफिसचे काम, ईमेलपासून दूर रहा, असेही डॉ. निखिल म्हणाले.

१ – झोपण्यापूर्वी एक तास आधी स्क्रीन नाही

डॉ. निखिल यांच्या मते, फोन, टीव्ही आणि लॅपटॉपमधून येणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे झोपेसंबंधित मेलाटोनिन हार्मोन्सवर दाब येतो. त्यामुळे स्क्रीन बंद करा आणि वाचन किंवा ध्यान यांसारख्या आरामदायी क्रियाकलापांचा पर्याय निवडा.

हा फॉर्म्युला खरंच फायदेशीर ठरतो का?

हा फॉर्म्युला रोज फॉलो केल्यास तुमच्या मनाला आणि शरीराला आरामदायी वाटेल. तसेच, स्वत:ला एक चांगला, आवश्यक वेळ देता येतो, असे परळ येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिनचे सीनियर कन्सल्टंट डॉ. मंजुषा अग्रवाल म्हणाल्या.

तसेच थकवा, अस्वस्थता कमी करीत चांगलं आरोग्य जगता येतं. झोपेच्या चांगल्या सवयींसाठी हा एक उत्तम फॉर्म्युला आहे. त्यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते. झोपेला प्राधान्य दिल्याने पुढचा दिवस फ्रेश जाऊ शकतो. पुरेशी झोप घेतल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी उत्साही आणि अधिक सक्रिय वाटू शकते,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले.

डॉ. निखिल यांनी असेही सांगितले की, हा फॉर्म्युला फॉलो करण्याव्यतिरिक्त तुम्ही नियमित हायड्रेटेड राहणे, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करणे, दररोज व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणेही महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केल्याप्रमाणे आठवड्यातून १५० मिनिटे मध्यम प्रकारचे व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर तुम्हाला झोपेसंबंधित काही समस्या जाणवत असतील, तर वेळीच तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेत उपचार घेणं आवश्यक आहे, असेही डॉ. अग्रवाल पुढे म्हणाले.