ऊर्जा अर्थात विजेचे महत्त्व अनन्यसाधारण असून देशाच्या प्रगतीसाठी ऊर्जेची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु ऊर्जेची निमिर्ती व मागणी यामध्ये तफावत येत असल्यामुळे ऊर्जेचा तुडवडा जाणवू लागला आहे. यावर काही अंशी मात करण्यासाठी ऊर्जेची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. ऊर्जेची बचत हीच ऊर्जेची निर्मिती आहे. उन्हाळी हंगाम सुरू झाला असून लोक त्यांच्या घरात एसी आणि कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. एसी आणि कुलर जास्त चालत असल्याने अचानक वीज बिलात वाढ होत आहे. तुम्हीही उन्हाळ्यात तुमच्या घराच्या वाढत्या वीज बिलामुळे हैराण असाल, तर आम्ही दिलेल्या काही सोप्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही वीज बिल कमी करू शकता.

एलईडी दिवे: वीज बचतीचा सर्वात सोपा, सहज, सर्वाना परवडण्याजोगा व प्रभावी उपाय म्हणजे एलईडी दिव्यांचा वापर करणे. एलईडी म्हणजे ‘लाइट इमिटिंग डायोड’. हे खरे तर नेहमीच्या दिव्यांसारखे दिवे नसून एक इलेक्ट्रॉनिक उपकरणच म्हणायला हवे. पण याचा उपयोग मात्र खूपच परिणामकारक होतो. एलईडी दिवे हे नेहमीच्या पारंपरिक दिव्यांचे म्हणजे सीएफएल, बल्ब, टय़ुब, सोडियम व्हेपर, मक्र्युरी व्हेपर, हॅलोजन अशांपेक्षा खूपच कमी प्रमाणात विजेचा वापर करतात.

दिवसा दिवे बंद ठेवा: जर दिवसा तुमच्या घरात पुरेसा सूर्यप्रकाश येत असेल तर अशा वेळी लाईट बंद ठेवा. यामुळे तुमच्या वीज बिलात कपात होईल. तुम्ही वापरत नसलेली इलेक्ट्रॉनिक उत्पादने बंद करा.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे रेटिंग: आजकाल ग्राहक कोणतेही इलेक्ट्रॉनिक उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्याचे रेटिंग तपासतात. या रेटिंगचा अर्थ आहे की तुमचे इलेक्ट्रॉनिक उत्पादन किती कमी वीज वापरते. ५ स्टार रेटिंग असलेल्या उत्पादनांद्वारे सर्वात कमी वीज वापर केला जातो. अशा परिस्थितीत, जास्तीत जास्त रेटिंगसह उत्पादने खरेदी करण्याचा प्रयत्न करा.

प्रिंटेड सोलार पॅनेलच्या मदतीने टेस्लाची कार धावणार १५,००० किमी! ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ प्रयत्नशील

एसी तापमान: तुम्हाला उन्हाळ्यात तुमच्या घराचे वीज बिल कमी करायचे असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही २४ डिग्री तापमानात चालवावे. आजच्या काळात विंडो एसी असो की स्प्लिट एसी, बहुतेकांचा वापर सुरू झाला आहे. २४ डिग्री तापमानात आपण दीर्घकाळ कमी वीज वापरून कुलिंगचा फायदा घेऊ शकता.

उपकरणे मेन स्वीचवरून बंद करा: बहुतांश वेळा एसी, टीव्ही रिमोटने बंद केले जातात. पण मेन स्विच बंद करण्यास टाळाटाळ केली जाते. असे न करता रिमोटने टीव्ही, एसी बंद केल्यानंतर लगेचच मेन स्विच बंद करावा.