Tests needs to be done before joining Gym: अलिकडे तरूणांमध्ये फिट दिसण्यासाठीची क्रेझ प्रचंड वाढली आहे. मात्र, ते फिट दिसत असलेल्या व्यक्तींमध्ये अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. आपण कायम म्हणतो की नियमित व्यायाम आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, ह्रदयाचं आरोग्य लक्षात न घेता कुठल्याही पद्धतीने व्यायाम करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे फिट राहण्यासाठी जर तुम्ही जिममध्ये व्यायाम करायला सुरूवात करत असाल तर त्याआधी काही चाचण्या करून घेणं गरजेचं आहे. कोणत्या चाचण्या करून घेणं गरजेचं आहे?
इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG)
ईसीजी चाचणी ही ह्रदयाच्या हालचालींचे मोजमाप करते. तसंच कुठलीही अनियमितता असेल तर यामार्फत जाणून घेता येते. तुम्ही निरोगी आहात असं जरी तुम्हाला वाटत असेल, तरी या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. भविष्यात ह्रदयासंबंधी काही तक्रार उद्भवल्यास या चाचणीचा संदर्भ बिंदू म्हणून वापर केला जाऊ शकतो.
इकोकार्डियोग्राम
हा ह्रदयाच्या अल्ट्रासाउंडचा एक प्रकार आहे. ह्रदयाच्या पंपिंगबाबत सविस्तर चाचणी यामध्ये केली जाते. ह्रदयाच्या संरचनात्मक बिघाड शोधण्याची क्षमता असते. यामध्ये हायपरट्राफिक कार्डियोमायोपॅथी (खेळाडूंमध्ये अचानक ह्रदयविकाराने मृत्यू होणं) पंपिंगमधील समस्या ओळखल्या जाऊ शकतात.
ट्रेडमिल स्ट्रेबस टेस्ट
याला स्ट्रेबस टेस्ट असंही म्हटलं जातं. ही शारीरिक हालचालींच्या संदर्भात ह्रदयाची तपासणी आहे. ट्रेडमिलवर चालणे किंवा धावणे यामुळे एखाद्याच्या लक्षात न आलेले कोरोनरी व्हेन ब्लॉकेज या चाचणीद्वारे शोधता येतात. तसंच ही चाचणी केल्यास एखाद्याची व्यायाम क्षमता निश्चित करता येते. ह्रदयरोगाच्या समस्या आनुवांशिक असलेल्या व्यक्तींसाठी ही चाचणी सुचवली जाते.
लिपिड प्रोफाइलर आणि रक्तातील साखरेची चाचणी
किशोरवयीन मुले आणि तरूण मुले कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तातील साखरेच्या स्थितीकडे फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांनी जिममध्ये अति क्षमतेचा व्यायाम केल्यास रक्तवाहिन्यांना हानीकारक ठरू शकते. उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह किंवा प्री-डायबिटीजची मुलभूत रक्त चाचणी तपाणी आणि रक्तदाब तसंच रक्तातील साखरेच्या पातळीच्या महत्त्वाच्या पॅरामीटर्सची तपासणी हे ह्रदयरोगासाठी काही महत्त्वाचे घटक आहेत. ते गरज पडल्यास आहार, व्यायाम आणि औषधोपचारांनी बदलले जाऊ शकतात.
अतिसंवेदनशीलता ह्रदयरोगाच्या जोखमीचे मार्कर
अति संवेदनशीलता सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन (एचएस-सीआरपी), लिपोप्रोटीन (ए) आणि होमोसिस्टीन पातळी या चाचण्या आहेत ज्या जळजळ किंवा काही अनुवंशिक दोष शोधण्यासाठी वापरल्या जातात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला अचानक ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. ह्रदयाच्या स्थितीकडे दुर्लक्ष करत व्यायाम करणे धोकादायक ठरू शकते.
ह्रदय हे तुमच्या शरीराचे मूळ इंजिन आहे. त्याप्रमाणे जर तुम्ही त्याची काळजी घेतली नाही तर त्याच्या कामात अडथळा येऊ शकतो. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, धूम्रपान आणि बैठी जीवनशैली हे यातील मोठ्या जोखमीचे घटक आहेत. असंतुलित आहार, अति प्रमाणात मद्यपान, ताण आणि पुरेशी झोन न झाल्यास तुमचे ह्रदय जास्त वेळ काम करू लागते. पोटाची चरबी किंवा मधुमेह यासारख्या समस्यांमुळेही तुमच्या ह्रदयावर ताण येऊ शकतो. व्यायाम, संतुलित आहार, धूम्रपान सोडणे आणि ताणतणावाचे व्यवस्थापन तुमचे ह्रदय आनंदी आणि निरोगी ठेवू शकते. त्यामुळे या सर्व गोष्टी विचारात घेऊन मगच जिममध्ये व्यायाम करणं सुरू करा.