Osteoporosis Symptoms : ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis) म्हणजेच हाडे ठिसूळ आणि कमकुवत होण्याचा आजार. याला ‘साइलेंट बोन डिसीज’ असंही म्हटलं जातं कारण ही व्याधी हळूहळू वाढत जाते आणि सुरुवातीला याची लक्षणं फारशी जाणवत नाहीत. अनेकदा लोकांना या आजार झाल्याचे तेव्हा कळते तेव्हा एखादे हाड तुटते. पण खरं म्हणजे शरीरात काही संकेत सुरुवातीपासूनच दिसतात जे हाडे ठिसूळ आणि कमकुवत झाल्याचा इशारा देतात.
बंगळुरू येथील शेषाद्रीपुरमधील अपोलो हॉस्पिटलच्या, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. शशिकिरण आर. यांच्या मते,”ऑस्टिओपोरोसिसचे वेळेवर निदान झाले तर त्यावर उपचार शक्य आहेत. त्यामुळे अपंगत्वापासून बचाव होतो आणि जीवनाची गुणवत्ता सुधारते.”
चला, जाणून घेऊ या या आजाराची सुरुवातीची लक्षणं आणि त्यावर उपाय काय आहेत?
मनगट किंवा हात वारंवार फ्रॅक्चर होणे (Repeated Wrist or Hand Fracture)
मनगट आणि हातातील लहान हाडं सर्वाधिक प्रभावित होतात. अगदी हलक्या पडझडीने किंवा स्वतःला सावरताना हात किंवा मनगट फ्रॅक्चर होणे हे हाडे कमकुवत झाल्याचं लक्षण असू शकते. जर छोट्याशा धक्क्याने हाडं तुटत असतील, तर ते ऑस्टिओपोरोसिसचे सुरुवातीचे चिन्ह आहे. वारंवार फ्रॅक्चर झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
हातांची पकड कमी होणे आणि जखडणे (Weak Grip and Stiffness in Hands)
हातांतील पकड कमी होणं हे फक्त वय वाढल्यामुळे होतं असं नाही. संशोधनानुसार, ग्रिप स्ट्रेंथचा थेट संबंध हाडांच्या घनतेशी (Bone Density) आहे. जर बाटली उघडताना, बॅग उचलताना किंवा वस्तू घट्ट पकडताना त्रास होत असेल, तर ही हाडांच्या कमकुवतपणाची खूण असू शकते.
नितंब किंवा पायांमध्ये वेदना व अचानक फ्रॅक्चर होणे (Hip or Leg Pain and Sudden Fracture)
नितंबाची हाडे (Hip Bone) ऑस्टिओपोरोसिसमुळे सहज तुटू शकतात. टाच, जांघ किंवा पिंडरीच्या हाडांमध्ये हलक्याशा धक्क्याने फ्रॅक्चर होणं हे गंभीर लक्षण आहे. ही आजार हाडांचा घनत्व कमी करून शरीराचं संतुलन बिघडवते.
उंची कमी होणे आणि पाठीला बाक येणे (Decreasing Height or Curved Posture)
मणक्यातील हाडांमध्ये सूक्ष्म फ्रॅक्चर (Micro-fractures) झाल्याने पाठीला बाक येऊ शकतो. उंची कमी होते आणि चालण्यातही अस्थिरता जाणवते. हे फक्त वृद्धत्वाचं लक्षण नाही, तर मणक्यातील हाडे कमकूवत झाल्याचे संकेत आहेत.
हिरड्या आणि दात सैल होणं (Receding Gums and Loose Teeth)
जबड्याची हाडं सुद्धा ऑस्टिओपोरोसिसमुळे प्रभावित होतात. त्यामुळे दातांना आधार देणारी हाडं कमजोर होतात. हिरड्या मागे जाणे, दात सैल होणे हे सगळं हाडं कमकूवत असल्याचा इशारा आहे.
पायांच्या नख तुटणे आणि पायात वेदना होणे (Brittle Toenails and Foot Pain)
पायांच्या लहान हाडांमध्येही ऑस्टिओपोरोसिसचा परिणाम दिसतो. त्यामुळे स्ट्रेस फ्रॅक्चरचा धोका वाढतो. खनिजांचं प्रमाण कमी झाल्याने नखं नाजूक होतात आणि सहज तुटतात. चालताना पायात वेदना होणं, नखं तुटणे किंवा हाडं दुखणं हे सर्व या आजाराचे इशारे आहेत.
जर अशी लक्षणं जाणवली तर काय करावे? (What To Do If You Notice These Signs?)
- त्वरित ऑर्थोपेडिक किंवा एंडोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- DEXA स्कॅन करून घ्या – हे टेस्ट हाडांच्या घनतेचं मोजमाप करतं आणि आजाराची पुष्टी करतं.
- कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची पूर्तता करा.
- जीवनशैलीत बदल करा – वेट-बेअरिंग एक्सरसाइज करा, धूम्रपान व मद्यपान टाळा आणि संतुलित आहार घ्या.
- गरज असल्यास डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधांचा आणि हार्मोन थेरपीचा अवलंब करा.
हाडं मजबूत ठेवण्यासाठी हे करा (Tips To Keep Bones Strong)
- सूर्यप्रकाशात नियमित वेळ घालवा.
- दूध, दही, अंडी, बदाम आणि हिरव्या भाज्या आहारात घ्या.
- नियमित व्यायाम आणि योगासने करा.
- दीर्घकाळ बसून राहणं टाळा.
