कधी दिवसभर एकाच जागेवर बसून तर कधी आणखी काही कारणांनी अनेकांना अंगदुखीचा त्रास होत असतो. पण दुखणे अंगावर काढण्याची सवय असल्याने या समस्येबाबत फारशी वाच्यता केली जात नाही. थोडा ताप आला असेल किंवा थकवा आला असेल असे म्हणून या अंगदुखीकडे दुर्लक्ष केले जाते. पण सामान्य कारणांच्या पलिकडे जात अंगदुखीसाठी आणखीही काही गोष्टी कारणीभूत ठरु शकतात. नेमकी काय कारणे असतात आणि त्यावर कोणते उपाय करायला हवेत याविषयी वेळीच माहिती करुन घेतलेली चांगली नाहीतर त्यातून वेगळीच समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
- अधिक व्यायाम – आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम केल्यास स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना होतात. त्यामुळे आपल्या शरीराला मानवेल तितकाच व्यायाम केला पाहिजे. अन्यथा अंगदुखीची समस्या सतावते.
- सांधेदुखी – या आजारात सांधे, डोकं आणि हाडं दुखायला लागतात.
- तणाव – सततच्या तणावामुळेही डोकेदुखीचा त्रास होतो. झोपेची कमतरता, थकवा, स्नायू किंवा छातीत दुखणं यांसारख्या कारणांमुळे शरीरावर ताण पडतो आणि त्यातून अंगदुखीचा त्रास सुरू होतो.
- टीबी – ट्युबरक्युलेसिस अर्थात क्षयरोग हा तसा फुप्फुसाचा विकार आहे; परंतु टीबीमुळे अनेकदा शरीराच्या इतर भागांतही वेदना होतात.
- गाठ – शरीराच्या एखाद्या भागात गाठ असेल, तर प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे शरीरातील पेशींवर सूज येते. या पेशी दुखावल्या गेल्यामुळे शरीरात वेदना होतात.
- डेंग्यू, चिकनगुन्या – डेंग्यू किंवा चिकनगुन्यामध्ये येणाऱ्या तापामुळेही अंगदुखीची समस्या भेडसावू शकते.
- जीवनसत्त्वांची कमतरता – शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असेल तरीही अंगदुखी होते. अशावेळी डॉक्टर व्हिटॅमिन्सच्या तपासण्या करण्याचा सल्ला देतात.