Dinner Timing and Sleep Quality Health Effect: अनेक जण रात्री उशिरा झोपतात किंवा कामावरून थकून घरी आल्यावर मग उशिरा जेवतात. बऱ्याचदा रात्री आठनंतरच. काहींना नऊ वाजता जेवणंही सामान्य वाटतं. पण सतत तुम्ही उशिरा जेवत असाल तर फक्त तुमच्या झोपेवरच परिणाम होणार नाही, तर हळूहळू पचनक्रिया, चयापचय (metabolism) आणि एकूण आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

कोणत्या वेळी आपण जेवतो आणि ते अन्न शरीर कसे पचवते त्यातही बदल होत असतात. झोपण्याच्या अगोदर खाल्ल्याने रक्तातील साखरेचे नियमन, चरबी साठवण्याची प्रक्रिया आणि सार्केडियन रिदम म्हणजेच जैविक घड्याळ यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे वजन वाढणे, झोपेमध्ये व्यत्यय येणे आणि काही चयापचयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.

या सवयीचा परिणाम तुम्हाला काही दिवसांत दिसणार नाही, पण काही ठराविक महिन्यांनंतर नक्कीच दिसू लागेल. जर एखादी व्यक्ती साधारण सहा महिन्यांपर्यंत दररोज रात्री ८ नंतर जेवत असेल शरीरात नेमके काय बदल घडतात, याबाबत तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घ्या.

फिटनेस डाएटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट अश्लेषा जोशी यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली आहे. त्या सांगतात की, “जेव्हा आपण रात्री उशिरा जेवतो, तेव्हा शरीराची नैसर्गिक चयापचयाची क्रिया (metabolic) विस्कळीत होते. सूर्यास्तानंतर पचनक्रिया मंदावते आणि ग्लुकोज सहनशीलता कमी होते. त्यामुळे एखादी व्यक्ती सतत रात्री उशिरा जेवत असेल, तर त्या अन्नातील ऊर्जा बर्न होण्याऐवजी चरबी म्हणून शरीरात साठवली जाण्याची शक्यता असते.”

या सवयीमुळे कालांतराने वजन वाढणे, रक्तातील साखर वाढणे, एलडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे आणि फुगणे, आम्लपित्त यासारख्या पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. दीर्घकाळात हे शरीराच्या सार्केडियन संतुलनामध्ये (circadian alignment) अडथळा आणते आणि हे थेट चयापचयाच्या आरोग्याशी जोडलेले असते.

रात्री उशिरा जेवल्याने हार्मोन्सवर परिणाम

डॉ. जोशी सांगतात की, “उशिरा जेवण केल्याने हार्मोन्सवर लक्षणीय परिणाम होतो. रात्री इन्सुलिन संवेदनशीलता नैसर्गिकरित्या कमी होतो. त्यामुळे शरीराला रक्तातील साखरेचे नियमन करणे कठीण जाते. लेप्टिन हा भूक भागल्याचा संकेत देणारा हार्मोन असतो, पणा रात्री त्याची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे जास्त खाण्याची प्रवृत्ती वाढते.

दुसरीकडे, कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन उशिरा जेवल्याने जास्त काळासाठी वाढलेले राहते. या तिन्हींच्या एकत्रित परिणामामुळे चरबी साठवली जाते, भूक भागल्याचे नियमन बिघडते आणि मेटाबॉलिक डिसॉर्डरचा धोका वाढतो. काही महिन्यांनंतर हा हार्मोनल बदल साखरेची वाढ, झोपेतील व्यत्यय आणि वजन कमी होण्याचा वेग मंदावणे किंवा वजन वाढणे यांसारखे दुष्परिणाम निर्माण करतात.

चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम

कामाच्या ठिकाणी किंवा जीवनशैलीच्या टाळता न येणाऱ्या मर्यादांमुळे रात्री उशिरा जेवणे टाळता येत नाही, तर त्याचे नकारात्मक परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. डॉ. जोशी सांगतात की, “अशा परिस्थितीत काही सोपे बदल मदत करू शकतात. हलका आहार घ्या, ज्यामध्ये कमी चरबी, अधिक लीन प्रोटीन, भाजीपाला आणि फायबरयुक्त पदार्थ असतील. रात्री जास्त फॅट किंवा रिफाइंड कार्बोहायड्रेट्स टाळा, कारण ते पचवायला अवघड असतात.

“जेवण आणि झोप यामध्ये किमान दोन तासांचा फरक ठेवा. जेणेकरून पचन व्यवस्थित होईल. वेळेत सातत्य ठेवा. याचा अर्थ जेवण उशिरा असले तरी दररोज एका ठराविक वेळेला घ्या, त्यामुळे तुमचे सर्केडियन संतुलन राखले जाते. दिवसभर पुरेसे पाणी प्या, कॅफीनचे सेवन नियंत्रित ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पौष्टिक नाश्ता करा. यामुळे हार्मोन्स संतुलित राहतात आणि ऊर्जा स्थिर राहते”, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.