Long-term sleep deprivation risks: आजच्या धावपळीच्या जगात झोपेची कमतरता ही एक सामान्य समस्या बनली आहे. सतत स्क्रीनवर असणे, डूमस्क्रोलिंग, ऑफिसच्या डेडलाईन्स, प्रोजेक्ट्सचा भार किंवा जागं राहून फक्त विचार करणं असो; झोप ही सर्वात आधी बाजूला ठेवली जाणारी गोष्ट आहे. २०२५च्या झोपेच्या आकडेवारीच्या आहवालानुसार, जगभरातील सुमारे एक तृतीयांश प्रौढांना दिलेल्या सल्ल्याच्या सात तासांपेक्षा कमी झोप मिळते. याचे दीर्घकालीन परिणाम आता लक्षात आले नाही तरी थकवा, एकाग्रता कमी होणे आणि मूड स्विंग्स यामुळे संपूर्ण दिवस खराब होतो. त्यामुळे तात्काळ परिणाम टाळता येत नाहीत.
रात्री तुम्ही फक्त दोन तास झोपत असाल तर याचे किती विपरीत परिणाम तुमच्या मेंदूवर आणि शरीरावर काय होत असतील हे जाणून घेण्यासाठी दि इंडियन एक्सप्रेसने पीएसआरआय हॉस्पिटलच्या पल्मोनोलॉजी, क्रिटिकल केअर आणि स्लीप मेडिसिनच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. नीतू जैन यांच्याशी संवाद साधला. दीर्घकाळ झोपेचा अभाव उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, नैराश्य आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका वाढवतो.
मेंदू आणि शरीरावरील परिणाम
रात्री फक्त दोन तास झोपल्याने मेंदूचे कार्य करण्याची क्षमता गंभीररित्या बिघडते. यावर डॉ. जैन स्पष्ट करतात की, त्याचे सर्वात तात्काळ परिणाम म्हणजे थकवा, एकाग्रता कमी होणे, प्रतिक्रिया वेळ कमी असणे आणि चिडचिड होणे. त्यांच्या मते मेंदू माहिती कार्यक्षमतेने प्रक्रिया करण्यास संघरष करतो. त्यामुळे स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करणे कमी होते. शरीरात हार्मोनल असंतुलन होते. कोर्टिसॉलची पातळी वाढते, ताण वाढतो, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. डॉ. जैन यांनी इशारा दिला की, रात्रीची झोप कमी झाल्याने सौम्य अल्कोहोलच्या नशेप्रमाणे समन्वय आणि निर्णय क्षमता बिघडू शकते.
भावनिक नियमन आणि निर्णय क्षमतेवर परिणाम
डॉ. जैन यांनी सांगितले की, झोपेच्या तीव्र कमतरतेमुळे प्रीफ्रंटल कॉर्टेक्समधील हालचाल कमी होते. तो तर्कशास्त्र, निर्णय आणि आवेग नियंत्रणासाठी जबाबदार भाग आहे. तसंच राग आणि भीतीसारख्या भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या अमिगडालाला जास्त उत्तेजित करतो. लोक भावनिकदृष्ट्या अधिक प्रतिक्रियाशील, चिंताग्रस्त आणि मूड स्विंग होण्याची शक्यता असते. निर्णय घेण्याची क्षमता आवेगपूर्ण होते आणि त्यांना संघर्ष किंवा ताण शांतपणे व्यवस्थापित करणं कठीण जातं.
त्वचा आणि वजनावर परिणाम
झोपेच्या कमतरतेची दृश्यमान लक्षणे काही दिवसांतच दिसू शकतात. डॉ. जैन यांनी सांगितले की, कोलेजनचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्वचा निस्तेज होते आणि डोळ्यांखालील रक्तवाहिन्या अधिक ठळक होतात. त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होतात. हार्मोनल असंतुलनामुळे वजनात चढ-उतार होऊ शकतो. कारण झोपेचा अभाव भूकेचे हार्मोन्स वाढवतो आणि तृप्तीचे हार्मोन्स कमी करतो. त्यामुळे जास्त पदार्थ खाल्ले जातात.
हृदय, मेंदू आणि मानसिक आरोग्यासाठी दीर्घकालीन धोके
डॉ. जैन याबाबत सावध करतात की, दीर्घकाळ झोपेचा अभाव उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, नैराश्य आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका वाढवतो. त्या स्पष्ट करतात की, विषारी पदार्थ काढून टाकण्याची मेंदूची श्रमता कमी होते, त्यामुळे संज्ञानात्मक घट होऊ शकते आणि अल्झायमरसारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह विकारांचा धोका वाढू शकतो. झोपेचा दीर्घकालीन अभाव भावनिक लवचिकता देखील कमकुवत करतो आणि चिंता, बर्नआउटचा धोका वाढवतो.
कमी वेळ झोपण्याशिवाय पर्याय नसेल तर त्यावर मार्ग काय?
२० ते ३० मिनिटांच्या कमी झोपा, हायड्रेशन, संतुलित आहार आणि नैसर्गिक प्रकाशाचा संपर्क या गोष्टी तात्पुरते सतर्क राहण्यास मदत करतात. मात्र, हे मार्ग केवळ तात्पुरते धोके टाळण्याचे उपाय आहेत, ते योग्य झोपेची जागा घेऊ शकत नाहीत.
फक्त दोन तास झोप होत असेल तर काय करावे?
अशावेळी डॉ. जैन यांनी सल्ला दिला की, ज्यांची रोज केवळ दोनच तास झोप होते, त्यांनी दररोज हळूहळू कालावधी ३० ते ६० मिनिटांनी वाढवावा, झोपण्याच्या वेळेत सातत्य ठेवावे आणि झोपण्यापूर्वी कॅफिन किंवा स्क्रीनचा वापर टाळावा. याबाबत झोपेच्या बाबतीतील तज्ज्ञांचा सल्ला योग्य ठरू शकतो.
