एखाद्या व्यायामपटूला पाहिल्यावर आपलेही शरीर असे पिळदार असावे असे अनेकांना वाटते. पण यासाठी नेमके काय करायचे त्याची माहिती नसल्याने हा विचार केवळ डोक्यातच राहतो. ही गोष्ट अवघड असली तरीही अशक्य नक्कीच नाही. त्यासाठी जिममध्ये जाऊन प्रशिक्षित ट्रेनरच्या हाताखाली सातत्याने, आपल्या उद्दिष्टावर मन पूर्णपणे फोकस करून, योग्य टेक्निक वापरत वर्कआउट्स करावे लागतात. तुमचे शरीरसौष्ठव सर्व जगाच्या नजरेत भरेल असे बनावे ही इच्छा कोणत्याही तरुणाने बाळगायला हरकत नाही. पण त्यासाठी खालील गोष्टी नक्की कराव्यात-

* वैद्यकीय तपासणी- काही वेळेस काही आजार किंवा विकृती आपल्या शरीरात जन्मजात असू शकते, किंवा मागील काही वर्षात निर्माण झालेली असते. क्वचितप्रसंगी एखाद्याचे ब्लडप्रेशर जास्त असते, किंवा पाठीच्या कण्यात काही दोष असतात. यासाठी ‘मला शरीर कमावण्यासाठी खूप व्यायाम करायचाय’ असे डॉक्टरांना सांगून, त्यासाठी लागणाऱ्या तपासण्या सर्वात प्रथम करून घ्याव्यात. डॉक्टरांनी तुम्हाला त्या उद्देशासाठी तुम्ही फिट आहात, असे सांगितल्यावरच तुम्ही पुढचे प्रयत्न सुरू करा.

* जिमची निवड- सर्व अद्ययावत सोयी, चांगले वातावरण आणि उत्तम इन्स्ट्रक्टर असलेली जिमच आपण निवडावी. यासाठी जाहिरातींचा नव्हे तर अनुभवी व्यायामपटूंचा सल्ला घ्यावा.

* आपल्याला बलदंड होण्यासाठी योग्य गोल्स आणि दरमहा करावयाची प्रगती याचा एक तक्ता ट्रेनरच्या सल्ल्याने तयार करावा, यामध्ये व्यायामासाठी वेळ कसा काढावा, वजने केंव्हापासून उचलायची, त्यात कशी व कितपत वाढ करत जायचे, कोणत्या दिवशी कुठल्या स्नायूंसाठी व्यायाम करायचा याबाबत लक्षपूर्वक जाणीव ठेवावी.

* खूप भारी वजने उचलण्याची घाई न करता प्रथम स्नायू बळकट करणारे व्यायाम सुरू करावेत. व्यायाम केल्यावर अंग दुखणे बंद झाले की वजने उचलण्याचे व्यायाम सुरू करावेत.

* शक्यतो आपल्याबरोबर सुरुवातीपासूनच एक ट्रेनिंग पार्टनर निवडावा. म्हणजे दोघेही एकमेकांमधील प्रगती, त्रास रोजच्या रोज निरखू शकता.

* आपल्याला कुठलाही शारीरिक त्रास जाणवू लागल्यास त्वरित ट्रेनरचा सल्ला घ्यावा. यासाठी काही काल विश्रांती घ्यावी लागते.

* वर्कआउट करण्याआधी स्ट्रेचिंग, वॉर्मिंगअप आणि झाल्यावर वॉर्मिंग डाऊन सेशन्स करावीत.

* व्यायाम करताना श्वासोच्छवास योग्यपद्धतीने करावा. यामुळेच व्यायामाचे शारीरिक फायदे मिळू शकतात.

* दररोज सात ते आठ तास ठराविक वेळेस झोप मिळालीच पाहिजे. शरीराची झीज भरून येऊन स्नायूंची वाढ व्हायला या विश्रांतीची नितांत गरज असते.

* स्नायूंच्या आकारमानात आणि ताकदीत वाढ होण्यासाठी यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त पाहिजे. बाजारातील प्रोटीन पावडर्स घेण्याऐवजी, मांसाहार, अंडी, सोयाबीन यांचा वापर करावा.

* व्यायामामध्ये शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे दिवसभरात ३-४ लिटर पाणी प्यावे.

* कुठलीही शारीरिक इजा, विशेषतः सांध्यांना किंवा मांसल भागाला झाल्यास, कोणत्याही अवयवाच्या सतत वेदना होऊ लागल्यास दुर्लक्ष न करता वैद्यकीय उपचार करावेत.

-डॉ.अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन