लहान मुलांमधील वाढणाऱ्या चिडचिडीला व्हिडीओ गेम्स, टीव्ही, सिनेमानुकरण अशा अनेक नव्या तांत्रिक घटकांना जबाबदार धरण्याची ‘फॅशन’ बाद करण्याची वेळ आली आहे. ‘कानफाटे’ बनलेल्या तंत्रविश्वाला ‘क्लीन चिट’ देणारा अहवाल कॅनडातील माँट्रियल विद्यापीठाने तयार केला आहे.
या अहवालाच्या मते लहान मुले चिडचिडी, आक्रमक आणि अंतिमत: हिंसक बाह्य़ संस्कारित घटकांमुळे होत नसून त्यांच्यात असलेल्या जनुकीय दोषांमुळे आक्रमक बनतात. मुले जेव्हा दुसऱ्यावर आक्रमण करतात तेव्हा त्यात जनुकीय कारणे असतात, त्यात त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा फार कमी परिणाम असतो. जसे टीव्ही किंवा चित्रपटांतील हिंसाचार पाहून मुले आक्रमक बनतात, असे आपण म्हणतो, पण त्याला जनुकीय कारणेही आहेत.
संशोधन काय?
कॅनडातील माँट्रियल विद्यापीठाच्या एरिक लॅकोर्स यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या संशोधनानुसार सारख्या व सारख्या नसलेल्या जुळ्या मुलांच्या आईवडिलांना या संशोधनात सहभागी करण्यात आले होते. यात त्या मुलांचे वर्तन, त्यांच्या भोवतीचे वातावरण व जनुकशास्त्र या घटकांचा अभ्यास करण्यात आला. जनुकीय विश्लेषणात असे दिसून आले की, काही विशिष्ट जनुकीय दोषांमुळे मुले आक्रमक बनतात व ते दोष नसलेली मुले तुलनेने शांत असतात. माँट्रियल येथे एप्रिल १९९५ ते डिसेंबर १९९८ दरम्यान जन्मलेल्या जुळ्या मुलांच्या पालकांना सहभागी करून हे संशोधन करण्यात आले, ते ‘सायकॉलॉजिकल मेडिसिन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. यात मुलांच्या मातांना त्यांच्या जुळ्या मुलांचे वर्तन कसे आहे यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते.  
२०, ३२, ५० महिने या वयोगटांतील या मुलांचे वर्तन ठोसे लगावणे, मारामारी करणे, चावणे या मुद्दय़ांवर तपासण्यात आले. लॅकोर्स व त्यांच्या सहकाऱ्यांना मुलांच्या शारीरिक आक्रमणाच्या प्रवृत्तीच्या विकसनात तीन प्रकारचे पॅटर्न दिसून आले. एक म्हणजे त्यांच्यावर प्रभाव टाकणारे घटक सगळीकडे सारखेच असतील, तर ते मुलांच्या शारीरिक आक्रमणाच्या वृत्तीत स्थिरता आणतात. दुसऱ्या प्रारूपानुसार काही जनुकीय घटक मुलांना नेहमीच शारीरिक आक्रमणास प्रवृत्त करतात, त्याला ‘जेनेटिक सेट पॉइंट मॉडेल’ म्हणतात. तिसऱ्या ‘जेनेटिक मॅच्युरेशन’ या मॉडेलनुसार वयानुसार मुलांवर परिणाम करणारे जनुकीय व आजूबाजूच्या परिस्थितीशी निगडित घटक वयपरत्वे वाढत जातात. जेनेटिक मॅच्युरेशन म्हणजे जनुकीय परिपक्वता गृहीतकानुसार मुलांना आक्रमक बनण्यास प्रवृत्त करणारे आजूबाजूच्या परिस्थितीशी निगडित घटक जनुकीय घटकांच्या तुलनेत कमी असतात.
अभ्यास उपयोग
मुलांच्या आक्रमक प्रवृत्तीतील व्यक्तिगत फरकाचे स्पष्टीकरण जनुकीय घटकांच्या आधारे करता येते. सभोवतालच्या परिस्थितीतील घटक मुलांच्या वर्तनात फरक करण्यात फार मर्यादित भूमिका पार पाडतात, असे आमचे म्हणणे असले तरी, एक मूल असलेल्या आईवडिलांच्या बाबतीत कौटुंबिक व आईवडिलांच्या पातळीवरील घटक हे त्या मुलांच्या शाळाप्रवेशापूर्वीच्या काळातील आक्रमक वृत्तीशी संबंधित असू शकतात. त्यामुळे जुळे व एकटे मूल असणाऱ्या कुटुंबांच्या अभ्यासातील निष्कर्ष हे एकमेकांना छेद देणारे असू शकतात. त्यामुळे आपली मुले केवळ त्यांच्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीतील घटकांच्या परिणामामुळे आक्रमक किंवा हिंसक बनतात हा पूर्वीचा विचार एकतर्फी आहे, असे आमचे या संशोधनाअंती मत आहे, असे लॅकोर्स यांनी म्हटले आहे.