आपण भारतीय कर्मचारी किती काम करतो ना? एकीकडे काहींना ऑफिसमध्ये बसून काही कामच नसते तर दुसरीकडे मात्र अनेकजण असे आहेत की जे बिचारे आठ तासांऐवजी १०-१० तास तर कधीतरी १२-१२ तास ऑफिसमध्ये काम करत असतात. आपली शिफ्ट कागदोपत्री जरी आठ तासांची असली तरी डबल मेहनत करणं जणू काही आपल्या पाचवीलाच पुजलं आहे अशी मानसिकताच तयार झाली आहे आणि आपल्यालाही याचं फारसं काही वाटत नाही. पण अनेकदा असं होतं की आपल्यासोबत काम करणारे अनेक कर्मचारी आजारी पडल्याचे कारण सांगून दांड्या मारतात. आपणही ”अरे हा बॉस सुट्ट्या देत नाही म्हणून खोटं कारण सांगतो आहे” असं म्हणत वारंवार आजारी पडणा-यांची टेर खेचतो. पण तुम्हाला माहितीय जगाच्या तुलनेत भारतीय कर्मचारी आजारी पडण्याचे प्रमाण जरा अधिकच आहे आणि याला जबाबदार आहेत ते कामाचे तास. कामाच्या तासांमुळे भारतीय कर्मचारी अधिका अधिक आजारी पडतात असे एका संधोशनातून समोर आले आहे. भारतीय कर्मचारी त्यांच्या कामाच्या सरासरी तासांपेक्षाही जास्त काम करतात. याचमुळे त्यांना वारंवार थकवा येणं, मधुमेह, रक्तदाब, तणाव, वजन वाढणं यासारखे त्रास होतात असे या संशोधनातून समोर आले आहे.

”मिंथेल”मध्ये प्रकाशित झालेल्या एक अहवालात म्हटल्या प्रमाणे भारतीय कर्मचारी हे कामाच्या अधिकाअधिक तासांमुळे वारंवार आजारी पडतात. यात वारंवार थकवा जाणवण्याचे प्रमाणे हे सर्वाधिक आहे. त्यातूनही यातल्या सर्वाधिक महिला कर्मचा-यांना हा त्रास अधिक होतो. काम करणा-या भारतीय महिला कर्मचा-यांना इतर कोणताही त्रास कमी अधिक प्रमाणात असला तरी वरचेवर थकवा जाणवणे ही मूळ आरोग्य समस्या असतेच. भारतीय कर्मचारी वर्षाला सरासरी २ हजार १९५ तास काम करतो, हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. अधिक तास काम केल्याने आरोग्याच्या या समस्या होताताच पण त्याचबरोबर शरिरातली रोगप्रतिकारक शक्तीही कमी होत असल्याचे म्हटले आहे आणि याच कारणाने एखादा कर्मचारी वारंवार आजारी पडून दांड्या मारत असल्याचे समोर आले आहे.