How to Reduce Uric Acid Naturally: आपलं शरीर जरी निरोगी दिसत असलं तरी हळूहळू काही गोष्टी त्याला आतून गिळायला सुरुवात करतात. अशाच एका घातक समस्येचं नाव आहे युरिक ॲसिड. हे नाव ऐकलं की, अनेकांना वाटतं की, ही फक्त वृद्ध व्यक्तींची किंवा संधिवात असणाऱ्यांची समस्या आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की, आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांच्या बाबतीतही युरिक ॲसिड वाढण्याचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.

काय आहे युरिक ॲसिड?

युरिक ॲसिड म्हणजे शरीरात तयार होणारं एक वेस्ट प्रॉडक्ट. हे ‘प्युरिन’ नावाच्या घटकाच्या विघटनामुळे तयार होतं, जे आपल्या रोजच्या अन्नपदार्थांमध्ये मटण, डाळी, काही फळं व ड्रायफ्रुट्समध्ये आढळतं. सामान्यतः रक्त हे युरिक ॲसिड मूत्रपिंडांपर्यंत पोहोचवतं आणि मूत्रपिंड मूत्राद्वारे बाहेर टाकतं. पण, जेव्हा शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त होतं किंवा ते व्यवस्थित बाहेर टाकलं जात नाही, तेव्हा ते रक्तात साठू लागतं आणि मग ते युरिक ॲसिड शरीरावर ‘सायलेंट अटॅक’ करायला सुरुवात करते.

वाढत्या युरिक ॲसिडमुळे काय होतं?

ही स्थिती म्हणजेच हायपरयुरिसेमिया. त्यामुळे शरीरात युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स तयार होतात, जे सांध्यांमध्ये साचतात. परिणामी तीव्र वेदना, सूज, हालचालींमध्ये अडथळा आणि गुडघेदुखी सुरू होते. फक्त एवढंच नाही, मूत्रपिंडात खडे (किडनी स्टोन) तयार होऊ शकतात आणि त्यामुळे तीव्र पोटदुखी, उलट्या व मूत्रामध्ये जळजळ अशा त्रासांनाही सामोरं जावं लागतं.

रोज खा ‘या’ ४ गोष्टी युरिक ॲसिड होईल कमी

१. केळी

केळीतील पोटॅशियम आणि कमी प्युरिन असते. त्यामुळे रक्तातील युरिक ॲसिडचं प्रमाण घटतं. संधिवाताने त्रस्त असणाऱ्यांसाठी हे सर्वोत्तम फळ आहे. दररोज एक केळे खाल्ल्यास फरक जाणवतो.

२. सफरचंद

सफरचंदात असलेले डाएटरी फायबर आणि मॅलिक ॲसिड हे रक्तातील अतिरिक्त युरिक ॲसिड शोषून घेतं आणि शरीरातून बाहेर टाकतं. दररोज एक सफरचंद खाल्ल्यास शरीरातील ‘ॲसिडिक’ प्रभाव कमी होतो.

३. आंबट फळं – संत्रं आणि लिंबू

व्हिटॅमिन सी हे युरिक ॲसिडविरोधी शस्त्र आहे. संत्रे, लिंबू, मोसंबी यांसारखी फळं शरीरातून अतिरिक्त युरिक ॲसिड बाहेर टाकण्यास मदत करतात. सकाळी कोमट पाण्यातून लिंबाचा रस घेतल्यास परिणाम अधिक लवकर दिसतो.

४. ग्रीन टी – नैसर्गिक ‘डिटॉक्स ड्रिंक’

ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरात युरिक ॲसिड तयार होण्याची प्रक्रिया कमी करतात. रोज सकाळ-संध्याकाळ ग्रीन टी घेतल्यास सांधेदुखी आणि सूज या त्रासांपासून आराम मिळतो.

निष्कर्ष

युरिक ॲसिडमुळे होणाऱ्या छोट्या छोट्या त्रासांकडे दुर्लक्ष केले, तर मग ही समस्या मोठं रूप धारण करते. औषधांपेक्षा आहार आणि जीवनशैलीतील छोटा बदलच या समस्येवर कायमचा उपाय ठरू शकतो. म्हणूनच आजपासूनच या चार गोष्टी आपल्या आहारात जोडा आणि शरीराला या ‘मूक शत्रूपासून’ सुरक्षित ठेवा.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)