Uric Acid Symptoms: युरिक ॲसिड वाढणे (हायपरयुरिसेमिया) ही आजकालची एक सामान्य समस्या झाली आहे. चुकीचा आहार आणि बिघडलेली जीवनशैली हे त्याचे मुख्य कारणआहे. आपल्या आहारात असलेला प्युरिन नावाचा घटक यासाठी जबाबदार असतो.

प्युरिन शरीरात तुटला की, त्यापासून उप उत्पादन म्हणून युरिक ॲसिड तयार होते. साधारणपणे किडनी युरिक ॲसिड गाळून, ते लघवीद्वारे बाहेर टाकते. पण, रेड मीट, मासे, बीअर, डाळी, मशरूम, पालक यांसारख्या पदार्थांचा जास्त वापर केला, तर शरीरात युरिक ॲसिड वाढू लागते.

पण जेव्हा किडनी नीट काम करू शकत नाही, तेव्हा हे युरिक ॲसिड शरीरातून बाहेर जात नाही आणि रक्तात साठू लागते. हळूहळू ते क्रिस्टल्सच्या रूपात सांधे आणि ऊतींमध्ये साचते, ज्यामुळे वेदना, सूज, लालसरपणा आणि गाऊटसारखी समस्या निर्माण होते.

‘हेल्थलाइन’नुसार युरिक ॲसिडची पातळी तपासण्यासाठी लॅब टेस्ट सर्वोत्तम आहे; पण शरीरात त्याची पातळी जास्त झाल्यावर शरीर आधीच काही संकेत देऊ लागते. ही लक्षणे वेळेवर ओळखल्यास गाऊट आणि किडनीच्या आजारांसारख्या गुंतागुंतीपासून वाचता येते. चला तर मग जाणून घेऊया की, युरिक ॲसिड वाढल्यावर शरीरात कोणती लक्षणे दिसतात.

रात्री अचानक पायाच्या मोठ्या बोटामध्ये (अंगठ्यात) वेदना होणे

युरिक ॲसिड वाढल्याचे सर्वांत ओळखीचे लक्षण म्हणजे पायाच्या मोठ्या बोटात अचानक वेदना होणे, विशेषतः रात्री. हा त्रास अचानक सुरू होतो आणि तो खूप तीव्र असतो, जो तुम्हाला झोपेतूनही उठवू शकतो. वैद्यकीय अभ्यासानुसार युंरिक ॲसिडचे क्रिस्टल्स मोठ्या बोटाच्या सांध्यांत साचतात. कारण- हा भाग शरीराच्या इतर भागांपेक्षा थंड असतो. त्यामुळेच ही गाऊट अटॅकची सर्वांत सामान्य जागा मानली जाते.

घोटा आणि गुडघ्यामध्ये सूज व उष्णता जाणवणे

युरिक ॲसिडची पातळी जास्त झाल्यावर शरीराची प्रतिकारशक्ती त्या क्रिस्टल्सवर जलद गतीने हल्ला करते आणि त्यामुळे घोटा किंवा गुडघ्यात तीव्र वेदना होतात. ज्यांचे वजन जास्त असते, त्यांना सांध्यात सूज, उष्णता आणि कधी कधी लालसरपणा दिसतो. ही सूज साध्या दुखापतीमुळे आलेली नसते, तर युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स साचल्यामुळे ती उदभवते. हे गाऊटशी संबंधित त्रासाचे लक्षण आहे.

टाचा किंवा पायाच्या तळव्यांमध्ये टोचल्यासारख्या त्रासदायक वेदना होणे

कधी कधी युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स टाच किंवा पायाच्या तळव्यांमध्येही साचतात आणि त्यामुळे उभे राहिल्यावर किंवा चालताना टोचल्यासारखा तीव्र त्रास होतो. हा त्रास थकव्यामुळे होणाऱ्या वेदनेपेक्षा वेगळा असतो. हा टोचणारा त्रास अचानक होतो. जर हा त्रास वारंवार होत असेल आणि टोचल्यासारखा वाटत असेल, तर समजा की, युरिक ॲसिडची पातळी वाढली आहे.

वारंवार किडनी स्टोन तयार होणे

ज्यांचे युरिक ॲसिड जास्त असते, त्यांना वारंवार किडनी स्टोनच्या समस्येचा त्रास होतो. लहान स्टोनमुळे कंबरेत किंवा बाजूच्या खालच्या भागात तीव्र वेदना होतात. ही वारंवार होणारी किडनी स्टोनची समस्या हायपरयुरिसेमियाचे मोठे लक्षण असू शकते. डॉक्टरांच्या मते, सुमारे १०–१५% किडनी स्टोन युरिक ॲसिडमुळे तयार होतात.

सांध्यांवर लालसर ठिपके पडणे आणि त्वचा चमकदार दिसणे

युरिक ॲसिड जास्त झाल्यावर सांध्यांची त्वचा लालसर आणि चमकदार दिसते. ही अवस्था युरिक ॲसिड क्रिस्टल्समुळे होते. त्या भागाची त्वचा ताणलेली, गरम व चमकदार झाल्याचे जाणवते, जी साध्या दुखापतीसारखी नसते.