How to Peel The Green Peas Fast: थंडीच्या सीझनमध्ये बाजारात येणारे हिरवे वाटणे म्हणजेच मटार हे अनेकांचे फेव्हरेट असतात. या मटारपासून असंख्य रेसिपीज करता येतात. अगदी पराठा, भात, मॅगी, कबाब ते तुम्ही म्हणाल त्या रेसिपीमध्ये मटार घालून एक वेगळीच गोडसर आणि फ्रेश चव येते. पण म्हणतात ना कोणतीही गोष्ट सहज साध्य होत नाही, त्यासाठी मेहनत लागतेच. आता मेहनतीला पर्याय नसला तरी वेळ वाचवण्याचा जुगाड तर नक्कीच शोधला जाऊ शकतो. मटार सोलण्याचा वेग नेहमीपेक्षा दुप्पट आणि मेहनत अर्ध्याहून कमी करण्याचा एक जुगाड आज आपण पाहणार आहोत.

नवरत्न रेसिपी या युट्युब चॅनेलवर मटार सोलण्याचा वेळ कमी करण्याची ही सोपी ट्रिक सांगण्यात आली आहे. यासाठी आपल्याला नेहमीपेक्षा वेगळी पद्धत वापरायची आहे. यासाठी सर्वात आधी भांड्यात पाणी घेऊन गरम करा व त्यात थोडं मीठ घाला, पाणी थोडं गरम झाल्यावर यात मटारच्या शेंगा टाका आणि मग १० मिनिटांनी गॅस बंद करा. आपल्याला मटार पूर्ण उकळायचे नाहीयेत हे लक्षात ठेवा. गॅस बंद केल्यावर पाणी थोडं थंड होऊ द्या. अगदी हाताच्या हलक्या दबावाने सुद्धा आपण या शेंगा सोलून मटारचे दाणे काढून घेऊ शकता.

किंवा मग, या भांड्यात कुस्करल्याच्या पद्धतीने शेंगा व मटारचे दाणे वेगळे करू शकता. याशिवाय एका ताटात मटारच्या शेंगा काढून त्यावर स्टीलचा ग्लास हलक्या दबावाने फिरवून मटारचे दाणे काढू शकता. तुम्हाला पाणी उकळणे ही मेहनतही वाचवायची असेल तर अगदी सोप्या पद्धतीने मटारच्या शेवगा तव्यावर हलक्या भाजून किंवा मायक्रोव्हेवमध्ये गरम करून तुम्ही मटारचे दाणे काढून घेऊ शकता.

हे ही वाचा<<पांढरी की तपकिरी कोणत्या रंगाची अंडी खरेदी करणे आहे फायद्याचे? वेगळा रंग का असतो व त्याचा अर्थ काय?

मटारचे दाणे स्टोअर कसे करावे?

थोडक्यात काय तर तुम्हाला मटारची साल मऊ करायची आहे, पण यासाठी मटार जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवू नका नाहीतर दाणे खराब होऊ शकता. टीप म्हणजे मीठ टाकायला विसरू नका जेणेकरून मटारच्या दाण्यांचा रंग हिरवागार राहील. मग हे दाणे आपण एखाद्या कापडावर पसरवून थोडे थंड होऊ द्या व मग झिपलॉक बॅगमध्ये घालून तुम्ही साधारण वर्षभर हे मटार टिकवून ठेवू शकता